अधांतरी


एक गुड न्यूज आहे. मी वन बीएचके बुक केला. फार मोठा नाही. पाचशे स्क़ेअर फुटाचा आहे. परवा वडील आलेले. त्यांनाही पसंत पडला. माझ्याच इमारतीत आहे. पुढच्या महिन्यात ताबा मिळेल. आता हा जो माझा आताचा वनरूम किचन आहे. हा विकून येईल त्या रकमेत दीड लाखाची भर टाकावी लागणार. आणि मुळात एक लाखाची रक्कम त्या बिल्डरला दिली आहे. आता अर्धा लाख उरले आहेत. थोडेफार जे बदल आणि काही गोष्टी घ्याव्या लागतील. पण काही हरकत नाही. होईल ते देखील. चला अर्धे काम झाले. आता ह्या कंपनीच्या पे रोल चा विषय राहिला. ते देखील होईल. त्याची इतकी चिंता नाही.

बस ते झाले की मी तिला माझ्या मनातलं सांगून टाकील. अरे! मी तिचा विषय काढायचा नाही अस ठरवलेलं. पण काय करू? माझ्या डोक्यात हाच एक विषय कायम घोळत असतो. असो, मला तिचे उत्तर माहिती आहे. ‘मी असा विचार कधी केलाच नाही तुझ्याबद्दल’. नाहीतर रागावेल. पण मी तिला होकार किंवा नकार काहीच विचारणार नाही. फक्त माझ्या मनातलं सांगेल. सोडा जे होईल ते होईल. वडिलांनी पुन्हा एकदा, खर तर दोन महिन्यांनी माझ्याशी लग्नाविषयी बोलले. तो विषय सोडला तर बाकी हे दोन दिवस एकदम मस्त मस्त गेले. याआधी माझ्यासाठी वडिलांना दीड वर्षापूर्वी वेळ मिळालेला. सोन्याचे दिवस असतात वडील सोबत असल्यावर. ते कायम कामात. मी गावी गेलो तरी त्यांना फार फार तर दिवसातून तास, अर्धा तास वेळ मिळतो.

मला म्हणाले, दिवाळी नंतर अजून काही स्थळे आली आहेत. ती पाहूयात. डिसेंबरपर्यंत निर्णय दे. फार उशीर करून आता चालणार नाही. पुढच्या मे मध्ये व्हायायालाच हवं. त्यांना मी माझ्या जॉबचे कारण समोर केल. म्हणून तरी डिसेंबर पर्यंत मुदत वाढ मिळाली. आता यार वेळ संपत आलेला आहे. बस इथे कन्फर्मेशनचे झाले की, मी तिला सांगेल. ती रागावली किंवा नाराज झाली. तर मग नवीन कंपनी शोधील. हसली किंवा विचार करेल बोलली तर मग नाही सोडणार. ‘हो’ ची शक्यता नाहीच्याच बरोबर आहे. एकतर मी इतका ‘शूरवीर’, आणि त्यात मी दिसायला सुद्धा इतका ‘सुंदर’ त्यामुळे तिचा ‘हो’ ची अपेक्षा न करणेच योग्य होईल. म्हणजे आधीच दुख: सहन करायची तयारी असली म्हणजे डोंगर एवढे दुख: फार वाटणार नाही. काय माहित काय होईल.

आज ती कुठे गेली आहे कुणास ठाऊक, अजून आलेली नाही. यार मला खूप आठवण येत आहे तिची. दोन दिवस वडील होते म्हणून इतक काही वाटल नाही. पण काल रात्री, यार ही रात्र लवकर संपतच नाही. खूपच वेदना देते. काल रात्री वाळलेले कपडे काढावे म्हणून रात्री गच्चीवर गेलो. तो गार वारा भावना भडकावतो. अंगावर शहारे आणतो. स्वतःवर कंट्रोल ठेवण किती अवघड असते. त्यात हे मनाच्या इच्छा अजूनच वाढतात. असो, काल मी ‘गणित’ विषयाचा पेपर होता. नाही गेलो. म्हणजे सगळा वेळ त्या घराच्या बुकिंगमध्ये गेला. त्यामुळे, पण पुढील विषयाचा पेपर नक्की देईल. आजकाल मी भविष्याची चिंता फार करतो आहे अस वाटत आहे. पण काय करू, हे विचारच संपत नाही. आणि रात्री झोप देखील त्यामुळे येत नाही. कधी वाटते सगळ सोपं. आणि त्याच्याच पुढच्याच सेकंदाला सगळ अवघड. कधी वाटते ती माझी होईल. ती माझ्यासाठीच आहे. आणि पुन्हा वाटते कस शक्य आहे. मन आणि मेंदू तिच्या कोणत्याही गोष्टीचा धागा पकडून विचार करीत बसतात. आणि उत्तर काहीच नाही. पण मग सगळाच अधांतरी आहे असे वाटते. काय यार. अजून नाही आली ती.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.