अपेक्षा


काल संध्याकाळी माझ्या काकाने मला घरी येताना माझी पत्रिका आणि एक फोटो आणायला सांगितला. घरी गेलो तर एक गृहस्थ आले होते. माझी पत्रिका आणि फोटो घेतला. असो, माझ्याकरिता त्यांनी एक स्थळ आणल होत. माझ्याबद्दल माहिती विचारली. सगळ झाल्यावर तुमची मुली बद्दलची अपेक्षा काय अस विचारलं. काय बोलणार, त्यांना म्हणालो की ‘विश्वास’ ठेवता यायला हवा. ते म्हणाले ‘विश्वासावरच सगळ चालत. अजून काही अपेक्षा असतील ना?’ त्यांना म्हटलं ‘माझ्या फार काही अपेक्षा नाही’. ते ‘बर’ म्हणून निघून गेले. याआधीही असच, ते आधी आलेले स्थळ देखील  ‘अपेक्षा काय?’ आता या सगळ्यांच्या अपेक्षेचा अर्थ असा की, मला मुलगी दिसायला गोरी हवी? किंवा ती नोकरी करणारी हवी? मग नोकरी करत असेल तर पगाराची अपेक्षा काय? मग हे नाही तर तिला स्वयंपाक, तीच शिक्षण, तिची शरीरयष्टी, तिला चष्मा हवा की नको? हे असले प्रश्न मी ऐकले की वाटत मला एखादी वस्तूच विकत घ्यायची आहे. आणि ते मला वस्तू कशी हवी अस विचारात आहेत.

माझी एवढीच अपेक्षा आहे की ती जी कोणी असेल तिच्यावर मला ‘विश्वास’ ठेवता यावा. वडिलाची अपेक्षा अशी आहे ती नोकरी करणारी हवी. माझ्या लहान बहिणीची अपेक्षा आहे की ती खूप छान असायला हवी. माझ्या मोठ्या बहिणाबाईची अपेक्षा आहे की तिने माझ ऐकायला हव. आईची अपेक्षा अशी आहे की ती जातीतील हवी.  कधी कधी वाटत या अपेक्षांचे जरा जास्तच ओझे होते आहे. उद्या मला गावी बोलावले आहे. तस आता बोलावण्याचा उदेश्य स्थळ हाच आहे. वडिलाच्या बोलण्यातून समजलं. या ‘अपेक्षा’ कधीही न संपणाऱ्या आहेत. तिच्याही माझ्याबद्दल अशाच अपेक्षा असतील. तीच्या आई वडिलांच्या, भाऊ बहिणीच्या आणि नातेवाईक यांच्याही माझ्याकडून अपेक्षा असतील. ‘अपेक्षा’ वाईट नाहीत. पण आपण अपेक्षा करून त्या पूर्ण नाही झाल्या तर त्याच्या वेदना होतात. आणि मी तर आता दुसऱ्याकडून काहीच अपेक्षा ठेवत नाही. चांगलेच अनुभव आलेले आहेत.

दोन महिन्यापूर्वी त्या ‘मराठी मेट्रोमनी’ वर माझी एक प्रोफाइल बनवली. आणि मला योग्य अशा मुली शोधल्या तर त्यांच्या अपेक्षा खुपच वेगळ्या. मग ते पाहिल्यावर ‘दे दना दन’ मधील गाणे आठवले. बाकी काहींच्या तर उच्च शिक्षण ही अपेक्षा. ते त्या दिवशी पाहिलं आणि परत त्या वेबसाईटवर गेलोच नाही. पैसा आणि शिक्षण महत्वाच आहे पण मुलापेक्षा किंवा मुलीपेक्षा अधिक महत्वाच कस असू शकेल? असो प्रत्येकाची आपापली ‘अपेक्षा’. आईच्या एका मैत्रिणीने सांगितली की कर्क रास खूप चांगली आहे. तुम्ही मुलगी पाहताना ‘कर्क’ राशीचीच पहा. आईने घरी येऊन मला सांगितले. तिला म्हणालो जर मुलगी कर्क राशीची असेल आणि आपल्या जातीतील नसेल तर चालेल का? मग काय आई साहेबांचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता. ‘नाही’ म्हणाली. प्रत्येकाची ‘अपेक्षा’ प्रत्येकाला पूर्ण व्हावी असच वाटत. यात काही गैर नाही. परवा कळेलच त्या नवीन स्थळाच्या ‘अपेक्षा’


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.