अप्सरा आली


आज सकाळी तिच्याशी बोललो. हुश्श! श्वास सोबतच देत नाही आहे. किती वाट पाहायला लावली तिने. चार दिवस! जातच नव्हते. काय सांगू? आज तिची ओढणीचा आणि माझ्या शर्टचा रंग एकच आहे. खूप छान वाटले. बोलतांना अस वाटत होते की, जवळपास चार वर्षांनी भेट झाली. आज ज्यावेळी ती सकाळी आली त्यावेळी नेहमीप्रमाणे तिच्याकडे पाहण्याची हिम्मतच होत नव्हती. कॅन्टीनमध्ये जाऊन आल्यावर तिच्या डेस्कपासून जातांना ती माझ्याकडे पाहत होती. मग केली हिम्मत बोलायची. आज पण ती किती छान दिसते आहे. यार, मी तिच्याबद्दल बोलण्यापेक्षा तीच माझ्या बद्दल विचारात असते. नेहमी मी कुठे राहतो हे विचारते.

आजही, मी तिला ‘काय म्हणते गोवा?’ अस विचारले. तर ती ‘काही नाही, आज सकाळी आले’. तिला म्हटले ‘कशाला यायची घाई करायची. मस्त पैकी आराम करायचा. मला तर वाटले की तू पुढच्या आठवड्यात येशील’. मग ती म्हणाली ‘नाही, काम जास्त होते. आणि इतरांची घरे किती लांब आहेत. आणि माझे जवळ आहे’. मग मी पुन्हा तिला ‘किती वेळ लागतो तिथून इथे यायला?’. तर ती बोलली ‘एक रात्र’. तिला मी म्हटले ‘म्हणजे बारा तास?’. तर ती ‘हो’ बोलली. तिला म्हटले की, ‘मी देखील नेहमी चिपळूणला जात असतो. तिथे माझा काका राहतो’. तर मग ती म्हणाली, ‘तुमचे गाव कुठले?’. मग यावेळी सांगितले की ‘माझे मूळ गाव रत्नागिरी मधील शिपोशी. म्हणजे माझे पणजोबा पर्यंत सर्व तिकडे होते. आणि आजोबा चिंचवडमध्ये आले. माझ्या वडिलांचा जन्म चिंचवडचा. माझे वडील नोकरी निमित्त नगरला आले. माझा जन्म नगराचा. आणि मी नोकरी निमित्त चिंचवडमध्ये आलो’. तिचे आपले ‘अच्छा, अच्छा’ चालू होते.

तिला म्हटले, ‘मग तू डायरेक्ट ऑफिसात आलीस?’. तर मग ती बोलली ‘नाही, मी सकाळी साडे सहाला पोहोचले. रूमवर गेले. आणि मग ऑफिसात आले’. बोलतांना किती छान दिसते ती! नुसत तिने बोलत रहाव आणि मी ऐकत असच वाटत होते. मग जरा इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर ‘बाय’ करून डेस्कवर आलो. काय सांगू किती छान आहे ती! अगदी स्वप्नात असल्यासारखे वाटत आहे. तिचे विचार अगदी मला हवी आहे तसे. खूप छान आहे ती! मला ना, खरंच आता  दुसरे कोणी नको. असो, पण काल मी माझ्या मैत्रिणीशी बोललो. रक्षाबंधनाला म्हणून गेलो होतो बहिणीकडे. मग काय बाई साहेबांचे घर शेजारीच. कस कळलं तिला कुणास ठाऊक! लगेच आली. मला म्हटली ‘मला तुझ्याशी भांडायचे आहे’. मग काय, तिला खूप टाळायचा प्रयत्न केला. म्हणजे माझ्या मनात काही नाही. पण मला फक्त अप्सराशी बोलायची, बघायची इच्छा होते. बाकी कोणी नसले असले किंवा नसले काय फरक पडत नाही. आता मैत्रिणीला मी एक महिन्यानंतर भेटत होतो. पण काहीच वाटत नव्हते. असो, सोडा ते. ते काही महत्वाचे नाही. पण आजचा दिवस महत्वाचा आहे. कारण आज अप्सरा आली…


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.