अर्थ आवर


काल घरी ‘अर्थ आवर’ पाळला. आई विचारात होती. वीज असतांना का दिवे का घालवायचे. असो, तिला त्याच महत्व सांगितल्यावर तिला पटल. रात्रीच जेवण ‘कॅन्डेल लाईट’ झालं. त्यात ती शेजारची चिल्लर पार्टी. गोंधळी आहेत पक्की. जेवण झाल्यावर चक्कर मारावी म्हणून बाहेर निघालो तर, मोजून दोन घर सोडून बाकी सगळीकडेच लखलखाट. बिजलीनगरच्या हनुमान मंदिरात जायला निघालो. जात असतांना एक असली छान मुलगी दिसली. वा! असो, मंदिरात गेलो. मंदिरच नुतनीकरण केल आहे. त्यानिमित्ताने ‘कीर्तनाचा’ कार्यक्रम ठेवला होता. म्हणल कोण कीर्तन करत आहे ते पहाव. बघून थोडा धक्का बसला. माझ्याच वयाचा एक मुलगा. काय बोलतो आहे. एकाव म्हणून थांबलो.

तो एक गोष्ट सांगत होता ‘उन्हाळ्यात शेतीत शेतकरी मेंढपाळांना सांगून मेंढ्या बसवतात. त्या मेंढ्यांच्या लेंड्यामुळे शेतीला पोषक खत मिळत. असंच एका शेतकरीच्या सांगण्यावरून एक मेंढपाळाने शेतात त्याच्या शंभर मेंढ्या बसवल्या. तो मेंढपाळ बहिरा होता. दुपारी जेवण झाल्यावर तो झाडाखाली झोपी गेला. तास-दीड तासाने उठून पाहतो तर काय सगळ्या मेंढ्या गायब. आता हा जाम घाबरला. काय करावं सुचेना. समोर एका दुसऱ्या शेतात एक शेतकरी बैलांसमवेत विहिरीजवळ उभा होता. त्या शेतकऱ्याला मेंढपाळाने मेंढ्यांच्या बद्दल विचारले. आता दोघात अंतर जास्त असल्याने शेतकऱ्याला काहीच समजले नाही. त्याने त्याच्या हातातील चाबूक एका दिशेला फिरवला. मेंढपाळाला वाटले की बहुतेक त्या दिशेला मेंढ्या गेल्या आहेत अस तो शेतकरी सांगतो आहे. ह्याने मागचा पुढचा विचार न करता त्या दिशेला पळत सुटला. थोडे अंतर गेल्यावर सुदैवाने त्या मेंढपाळाला त्याच्या त्या शंभर मेंढ्या मिळाल्या. पण त्यातील एक लहान मेंढीच्या पायाला लागले होते. त्या लहान मेंढीला मेंढपाळाने खांद्यावर घेवून बाकीच्या सर्व मेंढ्यांना सोबत घेवून पुन्हा शेतात आला.

येतांना ज्या शेतकऱ्याने त्याला मार्ग दाखवला होता. त्याच्या उपकाराची परतफेड करावी म्हणून हा त्याच्याकडे गेला. त्या शेतकऱ्याला मेंढपाळ म्हणाला की तुमच्यामुळे मला माझ हरवलेलं लाखाचं धन पुन्हा मिळाल. म्हणून तुम्हाला मी एक भेट देवू इच्छितो. शेतकरी त्याच्याकडे नुसतंच बघत उभा होता. मेंढपाळाने ती लहान मेंढी आणली आणि त्याला देण्यासाठी शेतकऱ्याकडे दिली. शेतकरी ते बघून संतापला. आणि तावातावाने बोलू लागला, की मी तुझ्या मेंढीचा पाय तोडला नाही. कारण तो शेतकरीही बहिरा होता. झालं हा मेंढपाळ देखील मेंढी घ्या. आणि तो शेतकरी देखील मी तुझ्या मेंढीचा पाय कशाला तोडेन यावरून वाद घालू लागले. शेतीच्या बाजूला असलेल्या रस्त्यावरून नवीन बाईक घेवून एक हवालदार चालला होता. त्याने दोघांना इशाऱ्याने बोलावले. दोघांनी आपापली मते त्याच्यासमोर मांडली. दोघांच एकूण घेतल्यावर तो हवालदार मोठ्याने म्हणाला, मी तुमच्या दोघांची गाडी कशाला चोरू? मी आत्ताच माझ्या पैशाने विकत घेतली आहे. याचा अर्थ तो हवालदार देखील बहिरा होता.

मग तिघेही गावाच्या सरपंचाकडे गेले. मेंढपाळ म्हणाला की ह्या शेतकऱ्याने माझ्या हरवलेल्या मेंढ्या सापडून दिल्या म्हणून मी त्याला भेट म्हणून एक मेंढी देत आहे तर हा घेत नाही. शेतकरी म्हणाला, मी माझ्या बैलांची शपथ घेऊन सांगतो की मी ह्याच्या मेंढीचा पाय तोडला नाही. हवालदार म्हणाला, मी या दोघांची गाडी चोरलेली नाही. तिघांचेही ऐकल्यावर सरपंच मोठ्याने ओरडला, मी तुम्ही तिघांनी टाकलेली बायकोचा स्वीकार करणार नाही. म्हणजे याचा अर्थ असा तो सरपंच देखील बहिरा होता’. पुढे तो कीर्तनकार म्हणाला ‘आपल देखील असंच आहे. आपण देखील बहिऱ्याप्रमाणे करत आहोत. श्रीकृष्णाने पाच हजार वर्षांपूर्वी गीता सांगितली. ती आपल्यापैकी कोणीच ऐकली नाही. पाचशे वर्षापूर्वी ज्ञानेश्वरांनी आपल्याला समजावी यासाठी भाषांतर करून ज्ञानेश्वरी बनवली. पण आपण ती देखील वाचून समजून घेतली नाही. त्यामुळे आपण इथ कशासाठी आहोत. आणि आपण काय करावं. हे देखील आपणाला माहित नाही. आणि आपण या “का” चा शोधच घेत नाही. त्यामुळे जीवनात आपल्या न होणाऱ्या गोष्टींच्या मागे लागून आपण दुख: ओढवून घेतो’. असो त्या कीर्तनकाराचे हे तात्पर्य होते की ‘खऱ्या आनंदाचा शोध घ्या’. अजूनही एक गोष्ट सांगितली.

त्या कीर्तनकाराची एकूणच विषयाला वळवण्याची आणि समोरच्याला खिळवून ठेवण्याची कला जबरदस्त होती. ऐकतांना माझ्या अंगावर काटा उभा राहायचा. थोड्या काळासाठी मी त्याच्या कीर्तनात रंगून गेलो होतो. तो कीर्तनकार एक संगणक तज्ञ आहे कळल्यावर दोन सेकंदासाठी डोके बधीर झाले होते. परत त्यात ते कीर्तनातील ‘विठ्ठल विठ्ठल..’ अजूनही कानात घुमते आहे. गावी असल्याचा अनुभव आला. पण असो तो ‘अर्थ आवर’ खऱ्या अर्थाने ‘अर्थ आवर’ झाला. आणि हो, ती रोज भेटणारी बस स्थानाकावर माझ्याच कंपनीतील मुलगी देखील मंदिरात आली होती. मला जीन्स टीशर्ट मध्ये पाहून तिचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता. असो, तिने मला कधीच यावेशात असे बघितले नव्हते.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.