अशोक’राव’


चित्रपटाची सुरवात एका अतिरेकी भीषण हल्याने होते. मुंबईत हल्ल्याने सारा देश हादरून जातो. राज्याच्या राजकारणात उलथापालथ होते. बेजबाबदार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा राजीनामा घेतला जातो. पक्षश्रेष्ठी नवा मुख्यमंत्री कोण करायचा याचा शोध घ्यायला सुरवात करतात. आणि नांदेडात त्यांना हवा तसा व्यक्ती भेटतो. मुख्यमंत्री पदाचा शपथविधी झाल्यावर तो कामाला सुरवात करतो. पण पक्षातील आणि विरोधक त्याला नावे ठेवायला सुरवात करतात. मंत्रिमंडळाची बैठकीला सुरवात होते. सर्व मंत्री नवा मुख्यमंत्री किती फंटूश आहे यावर गप्पा मारायला सुरवात करतात. तेवढ्यात, मुख्यमंत्र्याचे आगमन होते. सर्वजण शांत होतात.

बैठकीची सुरवात पाणीप्रश्नाने होते. बैठकीत पाणीप्रश्नावरून दादा नेहमीप्रमाणे दादागिरी करू लागतात. मुख्यमंत्री काही बोलायला लागले तर दादा ऐकून घेतच नाही. हळू हळू सर्वच मंत्री अस करू लागतात. बैठीकीनंतर पत्रकार प्रश्न विचारून मुख्यमंत्र्यांना भंडावून सोडतात. एकाही प्रश्नाचे नीट उत्तर देता येत नाही. सगळीकडेच नाचक्की होवू लागते. मुख्यमंत्री ह्या बातम्या पाहून वैतागून आपल्या अंधारातील हिप्पी गुरुंकडे उपाय मागायला जातात. मुख्यमंत्री गुरूंना आपल्या अडचणी सांगतात. गुरु आपल्या जादुई ताकदीने भविष्य पाहतात. आणि मुख्यमंत्र्यांना म्हणतात की तुम्हाला ‘राव’ या शब्दापासून धोका आहे. मुख्यमंत्री गडबडून गुरूंना ‘राज्यातील जवळपास सर्वच नेत्यांच्या आणि मंत्र्यांच्या नावात राव आहे. यावर काहीतरी उपाय?’. गुरु मुख्यमंत्र्यांच्या कानात एक मंत्र सांगतात. आणि एक रुपयाचे कॉईन देतात.

राज्याच्या निवडणुका होतात. मुख्यमंत्र्यांचा पक्ष पुन्हा निवडून येतो. आणि मुख्यमंत्री पुन्हा मुख्यमंत्री बनतात. पुनः एकदा मुख्यमंत्री बैठकीला येतात. बैठकीची सुरवात होताच, मंत्री नेहमीप्रमाणे गोंधळ घालायला सुरवात करण्यापूर्वीच मुख्यमंत्री त्यांचे निर्णय सांगायला सुरवात करतात. मंत्री चिडतात. मुख्यमंत्री कॉईन उडवत ‘ज्याना माझे निर्णय मान्य नसेल त्यांनी मॅडमच्या ऑफिसमध्ये जावे’ असे म्हणतात. आणि बैठकीतून निघून जायला लागतात. महसूलमंत्री चिडून ‘तू स्वतःला कोण समजतोस?’ अस बोलतो. मुख्यमंत्री बोलायला मागे वळतात. तेवढ्यात त्यांचा मोबाईल वाजायला सुरवात करतो, ‘मॅडम का बच्चा| अशोक राज्जा||’. मुख्यमंत्री फोन उचलतात आणि फोनवर बोलत निघून जातात.

महसूलमंत्री चिडून मॅडमच्या ऑफिस मध्ये जातात. थोड्या वेळाने बाहेर आल्यावर महसूलमंत्रीचे कपडे फाटलेले, आणि चेहरा काळा निळा झालेला असतो. ते पाहून वनमंत्री मंत्री काहीच बोलत नाहीत. पत्रकार लोकांनी कोणताही प्रश्न विचारला असता मुख्यमंत्री ‘माहिती घेऊन सांगतो’ अस सांगायला सुरवात करतात. सगळेच पत्रकार लोक या उत्तराने वैतागतात. आणि कुठल्याही भाषणात ‘छप्पर फाडके देईल’ ही घोषणा. मुख्यमंत्र्यांचा ‘ओन्ली विमल’ हा एक कलमी कार्यक्रम सुरु होतो. त्याचा त्यांना चांगलाच ‘एफएसआय’ मिळायला लागतो. ते पाहून बाकीचेही नेते त्यांच्याविरुद्ध मोहीम उघडतात. पण त्याचा काहीच फायदा होत नाही. शेवटी सगळेच वैतागतात. मुख्यमंत्री स्वतःचा आणि विमलाबाईचाच फायदा करून घेत असतात. नांदेडमध्ये एक सभा भरते. सभेत दादा भाषणाला सुरवात करतो ‘साहेब नेहमी सांगायचे की, कोणतेही वृक्ष लावा पण अशोकाचे लावू नका. कारण ते दुसर्याला सावलीच देत नाही’ अस बोलतो.

ही बातमी कळताच मुख्यमंत्री चिडतात. कारण त्यांचे नावही अशोक असते. त्यांना निवडणुकीत विरोधकांनी केलेली ‘मुख्यमंत्री अशोकाचे झाड आहे. त्याला ना येत फुल ना फळ’ ही टीका आठवते. चिडून मुख्यमंत्री नाव बदलून नावात ‘राव’ शब्द लावतात. आणि त्यांच्या ऑफिसच्या बाहेर ‘अशोकराव’ अशी पाटी लागते. आणि अघटीत घडायला सुरवात होते. निवडणुकीत आणि कामात अडचणी यायला सुरवात होते. आणि शेवटी एका ‘आदर्श’ प्रकरणात मुख्यमंत्री अडकतात. आणि मुख्यमंत्र्यांना त्यांनाच राजीनामा द्यावा लागतो. पण चतुर मुख्यमंत्री पदाचा राजीनामा राज्यपालांना न देता पक्षश्रेष्ठीनां देतो. आणि विचार करतात की अस का घडलं. आणि गुरुंचे शब्द आणि मंत्र लक्षात येतो. आणि मुख्यमंत्री हसतात.. टू बी कंटीन्यू…


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.