अ आ ई


आजकाल रोज सकाळी जाग मला तीच्या पैंजणांच्या आवाजाने येते. काय सांगू तिचे ते हसणे! स्वच्छ आणि सुंदर दात. हसतांना पडणारी गालावरची खळी पाहून मनात उठणारे आनंदाचे तुषार पूर्ण भिजवून टाकतात. तिचे बागडणे, हसण्याने रोज माझी सकाळ हसरी असते. ती माझ्या शेजारी रहाते. दिसायला किती छान आहे म्हणून सांगू? त्या दिवशी तिने घातलेला पांढऱ्या रंगाचा ड्रेस. तिच्यापुढे ऐश्वर्या काय आणि सोनाली काय सगळेच फिके. नेहमी मला तीचा नवीन ड्रेस, नेलपॉलिश किंवा जे काही नवीन घेतले असेल ते दाखवते. नेहमी मी कंपनीत जातांना मला तिचे मान एका बाजूला झुकवून उजव्या हाताने ‘टाटा’ करण्याची पद्धत खूप आवडते.

माझे लक्ष नसेल तर माझ्या जवळ येऊन मला माझ्याकडे पहाणे, मी तिला हाक मारल्यावर तिचे ते ‘अ’ बोलणे. मी स्वयंपाकघरात असतांना न लाजत डायरेक्ट स्वयंपाक घर गाठणे, तीचा तो गोड आवाज, सगळेच अगदी मनाला आनंद देणारे आहे. तिची ती कोमल काया, तुम्हीही बघून तीच्या प्रेमात पडाल!  मध्यंतरी माझ्या मोबाईलमधील एका लहान बाळाची हसण्याची रिंगटोन ऐकून किती आनंदी झाली होती. तीचा तो आनंद ओसंडून वाहत होता. तिची आवड ऐकली तर तुम्हालाही आनंद होईल. समोरच्या गच्चीच्या भिंतीवर बसून जाणाऱ्या येणाऱ्या गाड्या पहाणे ही तिची आवड. आणि खाण्यात तिला ‘टोमॅटो’ खूप आवडतो. तिचे ते खेळ, खुपंच मजेदार असतात. गेल्या आठवड्यात एका पांढऱ्या रंगाच्या खडूने माझ्या दुसऱ्या बाजूच्या शेजाऱ्यांच्या दारासमोरील फळीवर तिची ‘चित्रकला’ मला हसून हसून पोट दुखावणारी होती. मला ‘आ’ नावाने हाक मारते.

तिला फक्त तीनच शब्द उच्चारता येतात. एक ‘अ’, दुसरा ‘आ’, आणि तिसरा ‘ई’. कारण तीचे वय साधारतः एक वर्षाच्या आसपास असेल. आणि रोज तीचा सकाळी सकाळी ‘मोर्निग वॉक’ फारच मजेदार असतो. चालतांना आजी आजोबांप्रमाणे दोन्ही हात मागे घेऊन म्हणजे आपण ‘विश्राम’ अवस्थेत जसे हात पकडतो तसे. रोज येऊन त्या तीन शब्दांच्या सुरु होणाऱ्या गप्पा. आठवल तरी हसू फुटते. पण सगळे कळते तिला. मध्यंतरी सुट्टे पैसे नाही म्हणून मला दुकानदाराने एक चॉकलेट दिले. ती घरी आल्यावर मी तिला ते चॉकलेट दिले. आणि तिने तोंडात टाकल्यावर लक्षात आले की तिला दात असेल तर ती खाऊ शकेल ना! म्हणून तिला मी ‘तुला दात आहेत का?’ अस विचारल्यावर तिने दात दाखवून आणि मान डोलावून उत्तर दिले. मी रोज दोन वेळेस अंघोळ करतो. एकदा सकाळी आणि एकदा संध्याकाळी. संधाकाळी घरी येण्यापर्यंत घामाने एक अंघोळ होतंच असते. मग फ्रेश होण्यासाठी आणखीन एक अंघोळ.

मागील महिन्यात मी घरी आलो. आणि कपडे काढणार तेवढ्यात ह्या बाई साहेब हजर. तिला मी ‘आता मी शंभो करतो’ अस म्हणले. पण तिला काहीच नाही कळले. मग हातवारे करून सांगितले. पण तरीही तिला कळेना. मग शेवटी मी बाथरूममधील नळ सुरु केला. पाण्याच्या बादलीत पडणारे पाणी बघून तिला समजले. मग मला पाहून एक हात डोक्यावर म्हणजे डोक्यावर उलटा ‘थंब्स अप’ करून ‘अं अं’ करीत मला ‘अंघोळ करणार का?’ म्हणून विचारात होती. असो, ‘अं’ हा एक नवीन शब्द उच्चारता येतो हे त्या दिवशी मला समजले. मी ‘हो’ म्हणाल्यावर बाईसाहेब गेल्या. नेहमी सुट्टीच्या दिवशी तीचा तो फेस लोशनच्या मोकळ्या डब्यातील ‘खोटा खोटा’ नाश्ता करून ढेकर द्यावा लागतो. एकदा तिला मी उद्धव ठाकरेंचे ‘महाराष्ट्र माझा’ हे पुस्तक दाखवले. मग काय चित्रांचे पुस्तक आवडले बाई साहेबांना. नुसतेच पान उलटायची. मग काय तोच तीचा खेळ सुरु झाला. संपले की पुन्हा पहिल्यापासून पाने उलटणे सुरु. अगदी सुरवातीला मला बघून घाबरून पळून जायची. पण आता तीच्या ‘अ आ ई’च्या भाषेत गप्पा मारत असते. खर तर खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. आई ला ‘आई’ का म्हणतात हे तीच्या कडून शिकलो. कारण तिला दोन अक्षरी म्हणजे फ़क़्त ‘आई’च बोलता येते.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.