आमची कार्टी


काय बोलावं अस झालं आहे. दुपारी जेवण करून मी माझ्या मित्रांसोबत सहज कंपनीच्या इमारतीला फेरफटका मारीत असतांना, माझा मित्र त्याच्या मुलीच्या इंग्लिश शब्दांबद्दल मोठ्या अभिमानाने सांगत होता. त्याची प्रेमाची गाडी वळून ‘मराठी मिडीयम आणि कॉनवेंट’ यातील फरकावर आली. आणि साहजिकच मराठी मिडीयमचे कसे कच्चे यावर सुद्धा. त्याला तिथेच मी मराठी मिडीयम आणि कॉनवेंट यातील फरक सांगितला. असो, पण खूपच बेकार वाटत आहे. काय कोणाला बोलायचे आता?

माझ्या बहिणाबाईचा मुलगा देखील त्याच कॉनवेंटमध्ये शिकतो. एक आठवड्यापूर्वी माझ्या बाजूच्या ‘अ आ ई’ ला तिची आई ‘पप्पा’ म्हणायचे शिकवत होती. माझी मैत्रीण आणि माझा जिवलग मित्र हॉटेलात गेल्यावर नेहमी वेटरला ‘हिंदीत’ ऑर्डर देतात. बर, समोरचा वेटर मराठी आहे हे माहिती असून सुद्धा. परवा पिंपरीमधील ‘क्रोम’मध्ये गेलेलो. तिथेही असेच. मी मोबाईलची माहिती मराठीत तिथल्या मुलाला विचारात होतो. आणि तो देखील मराठीत उत्तरे देत होता. मध्येच काय झाले कुणास ठाऊक! साहेब मला हिंदीत माहिती सांगायला लागले.

असो, माझे मराठी चालूच. मग त्याची गाडी बराच वेळाने मराठीवर आलेली. तिथून पुणे स्टेशनला गेलेलो. तिथेही हॉटेलचा वेटर असाच. काल, कपडे घ्यावे म्हणून निगडीतील एका दुकानात गेलेलो. तिथेही तो दुकानदार तसाच, मराठी. पण माझ्याशी मध्येच मराठी, मध्येच हिंदी. मी ज्या हॉटेलात रोज रात्री जेवणाला जातो तिथेही असंच. त्यांना ‘भात’ म्हटलेलं कळत नाही, ‘राइस’ म्हटलं की समजते. बहुतेक सर्व वेटर लंडनवरून ‘इम्पोर्ट’ केले असावेत. कोणाला नावे ठेवायची? बहुतेक मीच मूर्ख असल्याप्रमाणे वाटत आहे.

उगाचंच, मराठी मराठी करतो. माझा हिंदी किंवा इंग्लिश बोलण्याला विरोध नाही. परप्रांतीय लोकांबद्दल मला द्वेष आहे हे मान्य. पण, मी हिंदी बोलतच नाही असही नाही. पण मराठीसोबत मराठीच वापरतो. पण, आता आपलीच मराठी लोक अशी वागायला लागल्यावर कोणाला बोलायचे? सरकार फडतूस आहे, हे मान्य. ‘मराठी शाळांना मान्यता देणार नाही म्हणत आहेत म्हणे. पण मराठी बोला म्हणून सक्ती परप्रांतीयांना आपण करणार. आणि आपणच आपल्या मुलांना कॉनवेंटमध्ये टाकणार. कोण बोलत त्या कॉनवेंटमध्ये शिकणारी मुले हुशार असतात. सगळे नुसते ‘बोलबच्चन’. ‘खोट बोलणार पण रेटून’ असा थोडक्यात त्या कॉनवेंटमध्ये शिकलेल्या मुलांचा खाक्या असतो. म्हणजे अपवादही आहेत.

पण कॉनवेंटमधील मला जेवढे आणि जेवढ्या भेटल्या आहेत, त्या सर्वांची हुशारी पहिली आणि अनुभवली आहे. असो, उगाचंच भूतकाळ काढण्यात मला अर्थ वाटत नाही. काय बोलणार शेवटी आपलीच ‘कार्टी’ म्हणायची, अजून काय बोलणार? अजून ‘ती’ आलेली नाही आहे. तिची खूप आठवण येत आहे. सकाळपासून खूप बेकार वाटत आहे. आज बहुतेक त्या ‘जावा डे’ च्या कंपनीच्या कार्यक्रमाला ती गेली असावी. पण अजून आलेली नाही इथे. तिला माझी आठवण येत असेल का?


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.