आम्ही पुणेकर


कोणालाही काहीही वाटू देत. पण आम्ही असेच आहोत आणि असेच रहाणार. आमची सकाळ आठ वाजता होते. आता तुम्ही आम्हाला आळशी म्हणा नाहीतर अजून काही. पण आम्ही खऱ्या अर्थाने जीवनाचा आनंद लुटतो. सकाळी आवरून बाईकवर अडथळ्याच्या शर्यतीत भाग घेतल्याप्रमाणे आम्ही रस्त्यावरून आमच्या बाईक चालवतो. सिग्नल सुटायच्या दोन मिनिट आधी आम्ही निघतो. ती म्हण माहिती आहे ना ‘थांबला तो संपला’. असो, ते आमच्या रक्तातच आहे. मग समोर कोणताही पोलीस उभा असो. त्यालाही चांगलंच माहिती आहे की हे पुणे आहे ‘मुंबई’ नाही. इथे रांगेत उभा राहणे आणि सिग्नलच्या हिरव्या दिव्याची वाट पहाणे. हे पुणेकरांच्या संस्कृतीत बसत नाही.

आमच्या मोबाईल प्रेमाबद्दल कोणीही काहीही शंका घेऊच शकत नाही. आम्ही उठता झोपता त्यावर बोलत असतो. आणि त्यामुळेच आमच्या पुण्यातील आठवीचा मुलगा देखील गर्लफ्रेंड घेऊन फिरतांना तुम्हाला दिसेल. आम्ही विकेंड सिंहगडावर करतो. कारण स्पष्टच आहे. ‘पैसे जाये पण गर्लफ्रेंड न जाये’. तसे एक गेली तर दुसऱ्याची तजवीज आधीच करून ठेवावी लागते. रडत बसणे आमच्या संस्कृतीत बसणारे नाही. आम्हाला कोणी पत्ता विचारलेलं बिलकुल आवडत नाही. आणि एखाद्याने विचारलंच तर ‘अजून थोडे पुढे’ अस उत्तर देतो. मग तुम्ही समजून घ्या की आम्हाला ते आवडलेले नाही. उगाचंच, जास्ती पान्हाळ लावलीत तर आम्हीही पत्ता ‘दोन डावे एक उजवा आणि पुन्हा एक डावा’ अस उत्तर देऊन मोकळे होतो. आता पत्ता चुकला तर यात सर्वस्वी चुकी तुमची आहे. कारण आम्हाला पत्ता विचारणे हीच मुळात चूक आहे. आता एवढ्या भल्या मोठ्या पाट्या असून देखील तुम्हाला पत्ता कळत नसेल तर त्यात आम्हा पुणेकरांचा काय दोष?

आमच्या मराठी पाट्या वाचून कदाचित तुम्हाला हसू येईल. पण तुमच्या सारख्या लोकांना कळण्यासाठी म्हणूनच त्या लावल्या आहेत. वाचून हसण्यासाठी नाही. पुण्यातील लोकल कधीच वेळेवर नसते. उगाचंच, ८:१५ – ८:३० करत बसू नका. कारण हे पुणे आहे. आणि हो बस देखील. कशीही असली आणि कितीही आवाज करीत असली तरी ती बस तुम्हाला हव्या त्या ठिकाणी ‘पोहोचवेल’. उगाचंच, नाव ठेवण्यात वेळ वाया घालू नका. आम्ही बसमध्ये सिग्नलला ‘चढतो’. आणि सिग्नाललाच ‘उतरतो’. कारण आम्ही पुणेकर आहोत. आम्ही कधीच कोणाकडे पाहुणे म्हणून जात नाही. आणि आमच्याकडे कोणी पाहुणे म्हणून आलेले देखील आवडत नाही. या पण स्वतःच्या ‘रिस्क’वर. उगाचंच नंतर ‘पुणेरी पाहुणचार’ अस हिणवून काही फायदा होणार नाही. तुम्ही तुमच्या घरी खादाड असाल. पण आम्ही ‘लाईट’ खातो. आमचे पोट ‘कच्ची दाबेलीनेही’ भरते. आणि एक-दोन पोळ्यात देखील. त्यामुळे उपाशी राहिलो अशी बोंब ठोकायची नाही.

आमच्या ‘जेवण करून आला असालच?’ चा शुध्द अर्थ ‘आमचे जेवण झाले आहे. आणि स्वयंपाक संपला आहे’ असं होतो. ती एक म्हण आहे ‘सामाझानार्याला इशाराच खूप असतो’. जेवतांना ‘पाहिजे का?’ याचा शुद्ध अर्थ ‘आग्रह नाही’ असा होतो. ‘मग आहात ना दोन-तीन दिवस?’ याचा शुद्ध अर्थ ‘दोन किंवा तीन दिवस बस्स’ असा होतो. ‘येण्याआधी मला फोन कर’ याचा शुद्ध अर्थ ‘माझी परवानगी असेल तरच ये’ असा होतो. व्यवस्थेविरुद्ध बंड पुकारणे हा आमचा जात्याच गुण आहे. त्यामुळेच तर ‘बीआरटी’ सारखे प्रकल्प इथे फ्लॉप गेलेले आहे. आणि नियम न पाळणे हा आमचा जन्मसिद्ध अधिकारच आहे. आणि तो आम्ही नेहमी मिळवतोच. उगाचंच कायदे, नियम शिकवण्याच्या फंदात पडू नका. एखादया ठिकाणी घडले म्हणजे पुण्यातही तेच घडेल याची आशा बाळगू नका. आमच्याकडे गुंडांना राष्ट्रीय पक्षात जाहीर घेतले जाते. यावर रणकंदन करण्याची काही एक गरज नाही. आणि आमच्याकडे बिल्डर्स देखील निवडणुकीला उभे राहतात. आम्ही मराठी देखील असलो तरी देखील ‘हिंदी’च्या प्रेमात पडतो. कारण आम्ही पुणेकर आहोत.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.