आयुष्य


आजकाल मनात हे रोज विचार येतात की, जगून काय फायदा? म्हणजे हे आयुष्य कशासाठी? जन्माला येतो. पण कशासाठी? प्रत्येक धडपड, प्रत्येक गोष्ट करतो. प्रत्येक गोष्टीची अपेक्षा आणि त्यासाठी चाललेली धडपड. आणि ती गोष्ट मिळवली की, दुसऱ्या एखाद्या गोष्टीसाठी धडपड. ह्यालाच आयुष्य म्हणतात? बर ते सुख. कोणताही सुख क्षणिकच असते. दुख देखील क्षणिक. पण प्रश्न सुख किंवा दुःखाचा नाही आहे. प्रश्न आहे आयुष्याचा. म्हणजे जन्माचा उद्येश काय हेच कळत नाही.

सकाळी बाईकवरून कंपनीत येतांना अस वाटत की, आयुष्य हा एक प्रवास आहे. कधीही न संपणारा प्रवास. जन्मापासून ते मरेपर्यंत चालणारा प्रवास. कंपनीत काम करतांना अस वाटत की, जीवन म्हणजे एक खेळ आहे. कामाचा आणि वेळेचा चाललेला खेळ म्हणजे आयुष्य. पण हातातलं काम संपल की, पुन्हा तोच प्रश्न निर्माण होतो. रात्री जेवण करतांना देखील हा प्रश्न सतावतो. आयुष्यासाठी अन्न की अन्नासाठी आयुष्य. जाम डोक दुखते मग. घरी आल्यावर गच्चीतून रात्रीच्या वेळी आकाशातील चमकणाऱ्या चांदण्या आणि मंद प्रकाश देणारी चंद्राची कोर पाहतांना आठवणी येतात. मग पुन्हा आयुष्य म्हणजे आठवणी आणि स्वप्न याचं गुंफण अस वाटत. विचार बदलून टाकणारी स्वप्न पडली की, आयुष्य म्हणजे स्वप्नांचा खेळ वाटायला लागतो. पण रोज सकाळी उठल्यावर हा प्रश्न पडतो. कशासाठी हे? याचा मुळात उद्येश काय? जगून काय फायदा? हा न संपणारा प्रश्नांचा प्रवास तसाच चालू राहतो.

मित्रांशी बोलतांना होणारा विरंगुळा. हा विरंगुळ्यासाठी हा जन्म आहे? की सतत मनाविरुद्ध घडणाऱ्या घटनांची मालिका म्हणजे जीवन. देवळात देवाच्या पाया पडतांना, तिथल्या वातावरणात असलेली प्रसन्नता. तिथे मिळणारे समाधान. नदीत पाय बुडवून बसल्यावर होणाऱ्या पाण्याचा स्पर्श. नेमक जीवनाचा उद्येश काय? क्षणिक सुख आणि दुख? ह्याच्यासाठी झाला का हा जन्म? प्रश्न पुन्हा अनुत्तरीत राहतो.आयुष्य जगण्याचा एक मार्ग असतो अस म्हणतात. आणि प्रत्येकाच्या जगण्याला अर्थ असतो. काहीजण हे जीवन म्हणजे एखादे ध्येय. म्हणजे ते ध्येयप्राप्ती वगैरे सांगतात. पण आयुष्यातील तो ध्येयाचा हिमालय पार केल्यावर पुढे काय ते कोण बोलत नाही. जीवन ही एक देवाची देणगी आहे अस म्हणतात. ही अनमोल देणगी आहे. परंतु ही देणगी कशासाठी?

म्हणजे देणगी मिळाल्यावर त्याचा उपयोग काय? अध्यात्म किंवा शास्त्र दोघेही आपले काम आयुष्याच्या नावावर रेटत असतात. परंतु एक ‘मी’ आणि माझे आयुष्य याच तत्वज्ञान. बापरे ‘तत्वज्ञान’. पण कोणीही जीवन कशासाठी आहे. जन्माचे मूळ कारण, आणि त्या कारणाचे परिणाम ह्याचे गणित सुटत नाही. कधी कधी वाटते, आयुष्याचा खरच काहीच फायदा नाही. जगून काय उपयोग. पण तरीही हे जीवन चालूच. प्रश्न रोज सुटत नाही. परंतु डोक्यात विचारांचं आणि उत्तराच ‘जागरण गोंधळ’ चालू असतो.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.