आला आला वारा..


दोन दिवस असा पुण्यात पाऊस पडला की काय सांगावे. कधी आला आणि किती वेळ पडला हे देखील कळले नाही. पण त्या टी-ट्वेंटी२० पेक्षा अधिक जास्त धुमाकूळ घालून गेला. काल सकाळी कंपनीत बसमधून जातांना सहजच रस्त्यांच्या बाजूला असलेले जाहिरातींचे मोठ मोठे फ्लेक्स बोर्ड पहिले तर फाटलेले. काही काही तर तुटून पडलेले. हिंजवडी, बालेवाडी, चिंचवड, शिवाजीनगर, चतुश्रुंगी, पिंपरी, निगडी, पुणे स्टेशन आणि जवळपास पुण्यातील सगळीकडेच पन्नास टक्के फ्लेक्स एकतर फाटले आहेत किंवा बोर्ड तुटून पडलेले आहेत. ते एक गाणे आहे ना ‘आला आला वारा संगे पावसाच्या धारा’ अगदी तसे पुण्यात घडले आहे.

हिंजवडीत एका भल्या मोठ्या फ्लेक्सवर तीन रूमच्या घरासोबत एक किचन फ्री अशी जाहिरात होती. आता पावसानंतर तो अख्खा फ्लेक्सच फ्री होऊन खाली पडला आहे. पुणे स्टेशनला जातांना आंबेडकर भवनाच्या समोर एक शॉपिंग करणाऱ्या मुलीचा फ्लेक्स आहे. पावसानंतर आता शिर आणि धड वेगळे झाले आहे. आणि अनेक ठिकाणी सोम्या गोम्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छांचे फलकांच्या पावसानंतर पुण्यतिथी झाली आहे. क्रीडानगरीच्या समोर असलेल्या आलिशान टाऊनशिपचा फ्लेक्स पावसानंतर जमिनीवर आला. हिंजवडीतून बालेवाडीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला एशियन पेंट्सचा दोन रंगीबेरंगी मुलांचा फ्लेक्स पावसानंतर रंगासकट उडून पडला. चतुश्रुंगीच्या पुलावरून दिसणारा हिमेश रेशमियाचा फ्लेक्स पावसानंतर चांगलंच हिट झाला आहे. आता तो होता की नव्हता असा आहे.

त्याच्याच समोर असणारा हृतिकचा फ्लेक्स मात्र पावसानंतर देखील आहे तसाच आहे. एका शंका वाटते, शुभेच्छांचे फ्लेक्स सोडले तर बाकीचे सर्व नुकसान झालेले फ्लेक्स हे इंग्लिशमध्ये होते. बहुतेक पावसाने देखील मराठी बाणा अंगीकारला दिसतो आहे. डांगे चौकातील टाटा इंडीकॉमचा  ‘मन मखमल माझे’ चा फ्लेक्स पावसानंतर देखील आहे तसाच आहे. अनेक वर्ल्ड क्लास इमारतींचे फ्लेक्स पावसानंतर जमिनीवर आलेले आहेत. ‘राजनीती’चे फ्लेक्स तर पावसानंतर पडला आहे. चाफेकर चौकातील आयडियाची आयडिया पावसानंतर काहीच कामाची राहिली नाही. असो, वाऱ्याने आणि पावसाने खुपंच फ्लेक्सची वाट लावली आहे. काल सकाळी पाहतांना थोडं विचित्र वाटलं. पण मग ते पाहून ‘आला आला वारा’ हे गाणे आठवले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.