एकतर्फी


सगळंच संपल्यासारखे वाटते आहे. खर तर कालच बोलणार होतो. पण रात्री संगणक सुरु केल्यावर सुद्धा मूड नव्हता बोलायचा. काल तिने एकदाही साध ढुंकूनही पहिले नाही. आणि कॅन्टीनमध्ये देखील आली नाही. आणि सकाळी केलेले ‘गुड मॉर्निंग’  पिंग आफ्टरनून झाल्यावर ‘गुड आफ्टरनून’ केल. खरंच खूप बेकार वाटत आहे. सगळंच उदास वाटत आहे. मुळात मीच मुर्ख आहे. माझ्यामुळे सगळेच नाराज झाले आहेत. आणि आता ती देखील. ती बिझी असतांना मी तिला पिंग करून त्रास देतो. सारखा तिच्याकडेच पहात रहातो. बर हे कमी म्हणून की काय मेल पाठवून अजून तिला डिस्टर्ब करतो. नाहीतरी ‘मी चुका सम्राट’ आहेच.

अप्सरा इतकी सुंदर आणि मी इतका डब्बा. ती बीई आणि मी साधा बीए सुद्धा नाही. ती स्वभावाने खुपंच गोड. आणि मी रडका. तिच्याकडे संघटन कौशल्य. आणि मी एकलकोंडा. ती हुशार आणि मी ‘ढ’. एकाही गोष्टीत साम्य नाही, साम्य तर सोडा सगळया गोष्टी एकमेकांच्या विरुद्ध. तरीही तीचाच विचार केला. आता याला ‘मुर्ख’ सोडून दुसरे तिसरे काहीही म्हणत नाही. आता तिने एकदा मी बिझी आहे अस सांगून देखील मी तिला त्रास देणे चालूच. म्हणूनच कदाचित तिचे मित्र कॅन्टीनमध्ये जेवायला आलेले पण ती नव्हती. तिथेही मी तिला त्रास देतो. तिला तिथे पहात बसतो. संध्याकाळी काहीही कारण नसतांना ‘बाय’ करायच्या निमित्ताने पुनः पिंग करतो. ती साधी पाणी आणायला चालली असेल तरी तिच्याकडेच लक्ष.

यार, या आठवड्यात मी खूप चुका केल्या. तीच्या त्या मैत्रिणीकडे आणि तीच्या सिनिअरकडे पहिले. मी काय करू यार? तीच्या डेस्ककडेच सगळ् लक्ष असते माझे. आणि त्या सिनिअर आणि तिची मैत्रीण तिथेच बसतात. कामानिमित्त त्या डेस्कवरून उठल्या की त्यांच्या लक्षात येत की मी तिकडेच पाहतो आहे. आणि त्यात माझा मुर्खपणा इतका झालाय ना आता, दिसेल त्या मुलीत मला तीच आहे असे वाटते. माझ्या मानेवरील भाग निकामी झालाय का हेच कळत नाही आहे. पण खर सांगू का, पूर्ण आठवड्यात ती इतकी सुंदर दिसत होती ना. मला आठवडाभर रात्री झोपेचे खोबरे झालेले. तिची आठवण खूप यायची. ती रोजचं आदल्या दिवसापेक्षा छान वाटायची. म्हणून मग हे सगळ् घडतं गेल. सोमवारचा तीचा तो लाल ड्रेस. मुळात ती इतकी छान आहे ना. तिने घातलेल्या प्रत्येक ड्रेस तिच्यामुळे छान होवून जातो. त्यानंतर त्या पांढऱ्या रंगाच्या आहाहा! आणि त्यानंतर मला नक्की नाही सांगता येणार. पण त्या रंगला काय म्हणतात ते, पण ‘चिक्कू शेक’चा रंग जसा असतो ना तसा रंग. पण त्यात ती लाल रंगाच्या ड्रेस पेक्षा खूप पटीने छान छान आणि खुपंच छान दिसत होती. आणि ती त्यादिवशी माझ्या दुसऱ्याच ‘रो’ मध्ये बसलेली. माझी जेवणाची वाट लागलेली. आणि इतका आनंद झाला होता. मी काहीही कारण काढून, मित्रांच्या काहीही केलेल्या विनोदावर हसायचो. खूप मस्त मस्त आणि मस्त वाटत होत त्या दिवशी. आणि काल काळ्या रंगाचा टी-शर्ट आहाहा!!!

यार, आता मी काय बडबडतो आहे. तीचा विषय आला की माझ अस होत. ती पुन्हा खूप छान वाटायला लागते. काल रात्रभर आणि आज दुपारीही मी ठरवलेल. आता तीचा विषय डोक्यातून काढून टाकायचा. तिला माझा त्रास होणार असेल तर कशाला ना. मला तिला थोडासा सुद्धा त्रास द्यायचा नाही. माझी हीच इच्छा होती की, तिला पाहिल्यावर दुसरा तिसरा विषय कधीच मनात येणार नाही. आणि ती सुद्धा तितकीच माझ्यात गुंतून जाईल. पण या चित्रपटात मी पुन्हा एकदा ‘खलनायकाचा’ रोल करतो आहे अस वाटत आहे. तिला माझा त्रास होतो अस सारखं वाटत. ती कधीच मला स्वतःहून पिंग करीत नाही अस मी म्हणत नाही. पण ती माझ्याशी काहीच बोलत नाही. आणि माझी हिम्मत तर जगजाहीर आहे. आता हे फक्त तिच्याच समोर घडतं. बाकी कोणाशी कोणत्याही विषयावर बोलायला सांगा. मी बिनधास्त बोलू शकतो. आणि ते नाराज झाले काय किंवा खुश झाले काय मला काय फरक पडत नाही.

पण यार, अप्सरा पाहिली की माझ्यातील शूरपणा जातो आणि मी भित्रा बनतो. पण तिला पहिले की, रीमिझीम पावसात भिजल्यावर जसे वाटते ना तसे. अगदी चिंब भिजल्याप्रमाणे वाटते. किंवा तीच्या जवळून जातांना थंडगार वार्याची जाणीव. आणि ती हसली की मन धुंद होते. मग तिचीच ओढ. अरे यार, काय बडबडतो आहे मी? पण काल मला ती. असो. बोललो आहे मी हे सगळ्. मला तीच्या चित्रपटातील खलनायक नाही बनायचे. आता तिला कधीच त्रास द्यायचे नाही अस ठरवलं आहे. तिला पाहणार सुद्धा नाही. तीच्या डेस्ककडेच तर चुकूनही नाही. म्हणजे त्या सिनिअर ‘काकू’ आणि मैत्रीणच्या मनात काहीच येणार नाही. उगाचंच ना. माझ्या चुकामुळे त्या दोघी मला फालतू समजायच्या. म्हणजे मला काही फरक पडत नाही. पण तिची मैत्रिणीने तिला अस काही सांगितले तर, ती काय विचार करेल? यार, तीच्या मनात माझा चांगला विचार नाही आला तरी चालेल. पण मला वाईट तरी समजायला नको. सगळंच हे ‘एकतर्फी’ वाटत आहे. बापरे! किती बडबड केली मी आज. क्षमा मागतो. इतका पण पकवायचा विचार नव्हता केलेला.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.