एकभाषिक


एकभाषिक नसण्याचा सर्वाधिक तोटा ज्यांना झाला असेल तर ते आहेत मराठी भाषिक! हो अगदी बरोबर बोलत आहे. बघा ना आपण दैनंदिन जीवनात इतके गुंतून गेलो आहोत की आपण आपली अर्धी मराठी अन अर्धी अमराठी भाषा असं मिळून भेसळयुक्त मराठी बोलतो.

माझी मराठी कच्ची आहे ह्याचा बहुतांशी अर्थ माझं इंग्रजी भाषा चांगली आहे असा होतो. पण खरंच इंग्रजी ही जागतिक भाषा आहे? हाहा! असा प्रश्न विचारणे हास्यास्पद वाटेल. अन असे वाटण्याचे कारण आपण शालेय शिक्षणातील त्रुटी आहेत! शालेय अभ्यासक्रम अन वस्तुस्थिती ह्यात किमान शंभर वर्षांच अंतर आहे! मुळात शाळा नावाची साडेतीनशे वर्षांची शिक्षणपद्धती आपण सोडायला हवी! पण त्यावर आपण नंतर चर्चा करू!

भाषा शुद्धी वगैरेच्या गोष्टी मला बोलायाच्याच नाहीत! त्या आपण सहजतेने सुधारू शकतो! माझा मुद्दा आहे एकभाषिक नसल्याचा! विचार करा, तुम्ही एका मोठ्या चित्रपटाची निर्मिती करीत आहात! अन त्यासाठी तुम्हाला कोट्यवधींचा गुंतवणूकदार देखील मिळालेला आहे! त्या रकमेतून तुम्ही हवा तो अभिनेता, अभिनेत्री अन हवं तसे तंत्रज्ञान खरेदी करू शकता अन चांगली कथा देखील चितारू शकता. तर मग तुम्ही पहिला काय विचार कराल? अर्थातच, बाजाराचा!

बाजारात कोणती भाषा सर्वाधिक वापरली जाते. अथवा तुम्हाला कोणत्या बाजारात तुम्हाला तुमचा चित्रपट प्रकाशित करता येईल? जेणेकरून तुम्ही त्यातून हमखास अधिक उत्पन्न कमावू शकाल! जगाचा विचार करत तर तुम्ही इंग्रजी अन भारताचा विचार करत असाल तर चित्रपट हिंदीत काढाल! कारण, त्या भाषा अधिक प्रमाणात बोलल्या जातात.

आता त्याहून अधिक पैसा कमावणे ध्येय असेल तर चित्रपट बहुभाषिक कराल! पण बहुभाषिक करताना तुम्ही पुन्हा संख्या विचारात घ्याल! समजा तुम्ही इंग्रजी भाषेत एखादा चित्रपट बनवला! अन तो भारतातही प्रकाशित करायचे ठरवला तर तुम्ही कोणत्या भाषांचा विचार कराल? अर्थातच हिंदी, तामिळ, तेलगू! त्याच भाषा का? कारण हिंदी भाषिकांची संख्या अधिक आहेच अन सोबत बहुसंख्य हिंदी भाषिकांना इंग्रजी कळण्याचा प्रश्नच येत नाही! तोच न्याय तामिळ अन तेलगू भाषिकांना! हाच विचार हॉलिवूडवाले नेहमी करतात!

मराठी, गुजराती, पंजाबी, उडिया, बंगालीच्या बाबतीत असा विचार केला जात नाही! का? कारण आपण बहुभाषिक आहोत! मराठीच्या बाबतीत बोलायचं झालं तर आपण वयाच्या सहाव्या वर्षांपासून इंग्रजी अन हिंदी शालेय अभ्यासक्रमात शिकतो! मग इंग्रजी अन हिंदी भाषिक चित्रपट मराठीत करण्याचे श्रम घेण्याचा प्रश्नच उभा राहत नाही! ह्याच कारणाने तीन कोटी अमराठी भाषिक महाराष्ट्रात मराठी शिकण्याची तसदी देखील घेत नाहीत!

ह्याउलट हिंदी भाषिकांचे पहिले तर ९८% हुन अधिक हिंदी भाषिकांना केवळ हिंदीच भाषा कळते! तामिळ अन तेलगू यांचेही तेच! म्हणायचा मुद्दा इतकाच की, एकभाषिक असल्याने अप्रत्यक्षपणे मागणी निर्मिती होते! मग विषय चित्रपट, जाहिरात उद्योग असोत वा प्रत्यक्ष रोजगाराचा!

एकभाषिक असल्याचा सरळ सरळ फायदा इंग्रजी, हिंदी, तामिळ अन तेलगू भाषिकांना झाला! साहित्यनिर्मितीत त्यांना स्थान मिळाले! त्यनिर्मितीमुळे अर्थचक्र देखील वाढले! असाच फायदा महाराष्ट्राच्या कितीतरीपट लहान असलेल्या युरोपीय देशांना त्याचा फायदा झाला आहे!

फिंच नावाची एक भाषा आहे! लोकसंख्या म्हणाल तर पन्नास लाख! तरीही अँपलसारख्या जागतिक आस्थापनेने त्यांचा समावेश त्यांच्या यंत्रणेत केला आहे! मराठी भाषिकांची लोकसंख्या नऊ कोटी! पण त्याचा समावेश केलेला नाही! असं न करण्याचं एक मुख्य कारण म्हणजे आपण बहुभाषिक आहोत!

मराठी भाषिक बहुभाषिक असल्याने इतरांना आपले व्यवसाय मराठी भाषेत आणण्याची निकड निर्माण होत नाही. अन भाषावाढ खुंटतेच सोबत आपण अर्थकारणाचे देखील नुकसान करून घेतो! आता तुम्ही म्हणाल की आपला महाराष्ट्र तर देशात सर्वाधिक औद्योगिक अन अर्थसंपन्न! देशातील एकूण रोजगारातील ६०% रोजगार एकटा महाराष्ट्र करतो! मग कुठं नुकसान आहे?

तर माझ्या मित्रांनो, त्याच उत्तर हे आहे की वासरात कायम लंगडी गायचं शहाणी ठरते! आपण आपल्या बुध्यांकाच्या जोरावर देशात प्रगत आहोत पण आपल्या महाराष्ट्राहून थोडा अधिक भूभाग असलेला अन मराठी भाषिकांइतकीच लोकसंख्या अन प्रश्न असलेला जर्मनी आज जागतिक महासत्ताच आहे!

मराठी भाषा अन भाषिकांना प्रगती करायची असेल तर एकभाषिक होणे क्रमप्राप्त आहे! तरच सर्व क्षेत्रातील ज्ञान असो वा सेवा मराठीत होण्याचा मार्ग सुलभ होईल! नाहीतर आज आपली पिढी भेसळयुक्त मराठी बोलत आहे पुढे जाऊन आपण मराठी भाषिक होतो असं म्हणावं लागेल! संस्कृती व पराक्रम वगैरे काय ते फक्त इतिहासाच्या पुस्तकातून शिकायला अन अनुभवायला मिळेल!

मुद्याचं सांगतो, ब्रिटिशांनी पृथ्वीवरील भूपृष्ठाच्या एक चतुर्थांश भागावर अधिराज्य निर्माण केले! त्यावेळी ब्रिटिशांची भाषा लोकसंख्या फार फार तर पन्नास लाख होती! आज त्या भाषेला जागतिक भाषा म्हटले जाते!मग नऊ कोटी मराठी भाषिकांना मराठी भाषा ही व्यावसायिक भाषा बनवणे व त्यायोगे भाषेचा, संस्कृतीचा व स्वतःचा ठसा उमटवणे खरंच अशक्य आहे काय?

,

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.