औ भौ..


ठिकाण विधानसभा. वार बुधवार. मागील बाकावर बसलेला एक आमदार दुसऱ्या आमदाराच्या कानात कुजबुजत ‘औ भौ, कसला गोंधळ चालू आहे?’. दुसरा आमदार, जाड मिशा आणि ओठांचा चंबू करीत ‘आव जरा गप बसा, शाहेब अर्थसंकल्प वाचून दाखवत आहेत’. पहिला आमदार समजल्याची मुद्रा करून मान डोलवत शांत बसतो. न राहून थोड्या वेळाने ‘सत्यनारायणाची पूजा चालू हाये शहेबांची..’. दुसरा आमदार डोळे मोठे आणि तोंडावर बोट ठेवत शांत राहण्याची सूचना केली. विधानसभेच्या मध्यवर्ती भागात विरोधकांची ‘नही चलेगी, नही चलेगी, दादागिरी नही चलेगी’ घोषणाबाजी सुरु असते.

उजव्या बाजेच्या बाकांवर बसलेले आमदार कॉलेजच्या एखाद्या रटाळ लेक्चरला बसल्याप्रमाणे, मान लटकवून बसलेले असतात. अर्धा तास होवून जातो. हळू हळू कुजबुज वाढू लागते. तासाभराने देखील विरोधकांचा नॉन स्टॉप गोंधळ चालूच असतो. उजव्या बाजूला बसलेले आमदार गप्पात रंगलेले असतात. एक आमदार सतत जागेवरून उठून दुसऱ्या आमदारांच्या बाकाबर जावून गप्पा मारत असतो. ते पाहून शेवटच्या बाकावर बसलेला पहिला आमदार, पुन्हा चुळबुळ करतो. दुसरा आमदार त्रासदायक चेहरा करीत ‘अहो, चुलबुल पांडेजी का सतत चुळबुळ करताय’. पहिला आमदार ‘औ भौ, बघा की काय चालंय. बाजार भरलाय. पाटील आपलं भाषण काय संपविना आणि काय चाललंय तेही पाहीना. काय उमजना. राव तुम्हाला तरी काय कळते काय शाहेब काय बोलू राह्यले?’.

दुसरा आमदार ‘आवं, समजल्याचा आव आणायला काय जातंय? त्या कॅमेरातून अख्खा महाराष्ट्र बहून राह्यलंय आपल्याला’. पहिला आमदार गडबडून ‘व्हय? म्हणजी माझी मंडळी पाहत असल’. तेवढ्यात सर्व आमदार विधानसभा सोडून जाऊ लागले. दोघेही काय घडले, म्हणून उठून उभा राहिले. बाहेर जातांना पहिला आमदार दुसऱ्या एका आमदाराला ‘औ भौ, काय बजेट कळल का? आमच्या वाडीला काय जाहीर केलं का?’. तो आमदार ‘बजेट होत व्हय. म्या तर समजलो पुन्हा एक घोटाळा उघडकीस आलाय’. बाहेर जाताच पत्रकारांनी पहिल्या आमदाराला घेरलं आणि प्रश्नांचा भडीमार सुरु केला. पहिला आमदार गडबडून ‘तुम्हास्नी पण म्याच गावलो का? दुसर्यास्नी विचार की, व्हय व्हय त्या जाड मिशावाल्याला जितेंदरला विचार की’. एक महिला पत्रकार ‘आपको क्या लगता है की ये बजेट आम आदमी को दिलासा दे सकता है?’. आमदार चिडत ‘आरं, सांगा ह्या बयेला. मराठीत विचार म्हणावं’. ती पत्रकार अजूनच जवळ येत ‘काय आप एमएनएस से.. ‘. वाक्य तोडत ‘आरं, म्या ग्रामीण इकास मंत्री. चला फुड, आर सोडा की. आल बघा जितेंदर’.

आमदारांना पाहत पहिला आमदार ‘औ भौ, सांगा ह्यास्नी, काय म्हणतात ते अर्थसंख्खल्प कसा होता त्ये’. दुसरा आमदार चष्माची काच वर करीत ‘एकूणच अर्थसंकल्प सर्व समावेशक आणि जनतेच्या गरजा पूर्ण करणारा आहे. अनेक नव्या योजना जाहीर झाल्या आहेत’. मागे वळून पहिल्या आमदाराच्या कानात कुजबुजत ‘आरं, तुझ लक्ष होत ना साहेबांच्या भासानाकड? मग सांग की दोन एक योजनांची नावं’. पहिला आमदार दुसऱ्या आमदाराच्या कानात ‘आवं, माझ समदं लक्ष त्या फिरणाऱ्या बाब्याकड होत. आन इतक्या गोंधळात कुणास ठाव काय बोलत होत साह्यब’. पत्रकारांनी विरोधी पक्ष नेत्यांला गाठलं. विरोधी पक्षनेता ‘फ्लॉप झालंय हो’. पत्रकार ‘काय?’ म्हणून विचारताच. विरोधी पक्षनेता ‘जाऊ द्या हो, इथे गळा फाडून घसा बसलाय आणि तुम्ही काय अर्थसंकल्पाचे प्रश्न विचारताय. असले फालतू प्रश्न टग्या अर्थमंत्रींलाच का नाय विचारात?’. इकडे दोघे आमदार त्या सतत फिरणाऱ्या आमदाराला शोधतात.

पहिला आमदार त्या आमदाराला थांबवत ‘औ भौ! तुम्ही लय एक्टिव्ह व्हता विधानसभेत. आम्हास्नी सांगा की, काय होत साहेभांच भासान’. तो आमदार ‘आवं आमदार साहेब, म्या लय आमदारास्नी जावून हाच प्रश्न विचारात होतो की साहेब अशी पोथी वाचल्या गणी कामून भासान करू राहिल्यात’. एकाच वेळी ‘म्हणजे?’ म्हणत दोघा आमदारांनी त्या आमदाराकडे प्रश्नार्थक चेहरा केला. तो आमदार ‘आवं, साह्येब अस कामून करू राह्यले विचारायाला म्या साहेबांच्या बाजूला बसलेल्या मालवणकरांकडे गेलेल्यो’. ‘मंग’ पुन्हा दोन्ही आमदार प्रश्नार्थक चेहऱ्याने. तो आमदार ‘त्ये बी मला ह्येच म्हणत होत्ये की, साहेब नेमक कशावर बोलत आहेत?’. पहिला आमदार गोंधळून ‘औ भौ! म्हंजे त्यास्नी बी नाय कळल साह्येब भासनात काय बोलले त्ये’. दुसरा आमदार रागात ‘आगो बाबो! साह्येब काय बोलले समद्यास्नी नाही कळलं?’. पहिला आमदार सांत्वन देत ‘औ भौ! आपण साहेबास्नीच विचारू की!’..


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.