कला


काल रात्री असाचं मित्राशी गप्पा मारत होतो. बोलता बोलता त्याने त्याच्या काढलेल्या फोटोची लिंक दिली. फोटो बघून मी थक्कच झालो. आमचा ‘राज’ उद्धव देखील असेल असे वाटले नव्हते. प्रत्येकात काही ना काही कला अशी असते की त्याचा त्याच्या शिक्षणाचा आणि व्यवसायाशी काहीच संबंध नाही. पण कलेत तो एक नंबर असतो. रात्री मित्राचे त्यातील झुणका भाकरीचे फोटो बघून मला जाम भूक लागली होती. मग काय पाण्यावर रात्र काढावी लागली. माझी जी मैत्रीण आहे ना तिला घर डेकोरेशनची आवड आहे. आणि तीच्या घरातील सगळे असे आहेत ना! थोडक्यात जी वस्तू तिथे न ठेवणारे. मग काय हिने केलेलं दोन दिवस सुद्धा नीट रहात नाही. पण छान करते.

टेबलावर टीव्हीच्या बाजूला फ्लॉवर पॉट ठेवला आहे. आणि दुसऱ्या बाजूला एक फ्रेम. पाहून छान वाटते. असे अनेक छोटेखानी उद्योग तिचे चालू असतात. तीच्या घरात गेल्यावर प्रसन्न वाटते. माझा काका उत्तम चित्रकार आहे. म्हणजे वर्तमानपत्रात येणारे व्यंगचित्रे तो बघून, अगदी हुबेहूब काढतो. पेनाने काढतो. खाडाखोडीचा प्रश्नच येत नाही. आता माझी मैत्रीण एका बॅंकेत आहे. आणि काका एका शोरूममध्ये कामाला आहे. माझे बंधुराज एकपाठी आहेत. मी चौथीत असतांनाची गोष्ट. विज्ञान विषयात विजेची बचत असं काहीसा धडा होता. वडिलांनी मला वाचून दाखवला. आता मी किती हुशार होतो यावर चर्चा नको. त्याने बाजूला बसून ऐकले. मग काय झाले सुरु. ज्या खोलीत कोणी नाही. हा तिथे जाऊन पंखा असो, किंवा दिवा. हा बंद करून मोकळा व्हायचा. त्यावेळी तो पहिलीत होता. माझ्या मामाला गप्पा मारत एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जायची सवय. त्याने गप्पांच्या नादात एक खोली सोडली की बंधुराजाने पंखा केला म्हणूनच समजा. मामा पुन्हा गप्पा मारत त्या खोलीत आला की पुन्हा पंख चालू. आणि गेला की हा बंद करायला. अजूनही त्याने एखादी गोष्ट ऐकली की हा अनुकरण करायला सुरवात केली म्हणूनचं समजा.

मी माध्यमिक शाळेत असतांना एक मराठी विषयाचे शिक्षक होते. त्यांना उत्तम गाण्याची कला होती. खरे तर हे शिक्षक. आवाज छान होता. आणि ‘ती’ ला नाचण्याची कला. ती देखील शिक्षिका आहे. असो, माझ्या मुंबईच्या मावशीला हस्तकला उत्तम जमते. तिने स्पंज, कापूस आणि कापडांची विविध प्राणी कम शोपीस बनवले आहेत. तशी ती गृहिणी. पण फावल्या वेळात. खूप काही छान बनवले आहे. तिने असेच एक माकड बनवले होते. लहानपणी मला ते खरेच वाटायचे. माझ्या एका मित्राची चित्रकला खूप चांगली आहे. आणि तो व्यवसायाने वेब डेव्हलपर. माझा अजून एक मित्र आहे. तो ग्राफिक्स डिझायनर आहे. पण तो चांगला उत्तम लेखक आहे. त्याचे लेखन डायरेक्ट मनाला भिडते. असो, मागील आठवड्यात त्याला एक ब्लॉग बनवून दिला आणि लिखाण करत जा अस म्हटलं होते. एक मित्र होता. आता एका इन्स्टिट्यूटचा मालक आहे. त्याला मुली छान पटवता यायच्या. बऱ्याचशा मुलींना त्याने ‘नादी’ लावलं होते. असो, असते एकेकात.

माझ्या जुन्या कंपनीतील सिनिअरला बॉसला पटवण्याची कला होती. त्यामुळे तो काम न करता ‘आवडता’ आणि मी काम करून देखील ‘नावडता’ होतो. माझ्या कोकणातील काकाला तबला वाजवण्याची कला आहे. त्याने अनेक गायकांना साथ दिलेली आहे. आणि तो व्यवसायाने एक दुकानदार आहे. एका मित्राला वाचनाची आवड आहे. एकदा त्याला माझ्या ब्लॉगची लिंक दिली होती. पठ्याने माझ्या सगळया नोंदी वाचून काढल्या. मग काय दुसऱ्याच दिवशी या नोंदीतील ‘ही’ आणि ‘हा’ कोण सुरु. आणि तो व्यवसायाने एक वेब डेव्हलपर आहे. एकूणच काय प्रत्येकात काही ना अशी खुबी असते. आता माझ्यात काय अस विचारू नका. कारण हा प्रश्न मलाही पडलेला आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.