काय बोलू?


यार हा लग्न विषय ना पिच्छा सोडत नाही आहे. जो बघाल तो माझ्याशी ह्याच विषयावर बोलतो. दोन-तीन दिवसांपूर्वी एका प्रतिक्रियेतून हाच प्रश्न विचारला होता. गेल्या महिन्यापासून हेच चालू आहे. माझ्या इमारतीतील सगळे कधीही भेटले की हाच प्रश्न. आणि माझ लग्न खर बोलायचं झालं तर मोडल. आता ह्याच दु:ख माझ्यापेक्षा माझ्या नातेवाईकांनाच जास्त झाल्याची शंका येत आहे. मध्यंतरी माझ्या कोकणातील काकूचा फोन आला. तिने मला ‘लग्नाचे कुठपर्यंत आले?’ असा प्रश्न केला. मी म्हटलं की ‘केंसल झालं’. पुन्हा ‘का?’ विचारल्यावर मी खर काय ते सांगितलं.

आता जे स्थळ होते त्यांनाच निर्णय होत नव्हता. सुरवातीला पत्रिका जुळल्यावर मुलगी पाहण्याचा कार्यक्रम झाला. असो, मुलगी खुपंच छान होती. आम्ही दोघांचे बोलणे झाल्यावर मी ‘हो’ म्हणून सांगितले. आणि तिनेही होकार दिला. झालं दोघांचाही होकार होता. मग तीच्या आई वडिलांनी पत्रिका पुन्हा एकदा तपासून पहिली. सगळे ठीक समजल्यावर त्यांनी होकार कळवला. मग त्यांनी आठ दिवसांनी पुन्हा पत्रिका पुण्यात कोणत्या तरी एका ज्योतिष भास्करबुवाला दाखवली. त्याने दोघांची पत्रिका पाहून, दोघांना म्हातारपणी ‘त्रास संभवतो’ असा शेरा मारला. झालं मग काय त्यांचा नकार आला. बर ह्या बाईसाहेब (म्हणजे ती मुलगी) चिडल्या. परत आठ दहा दिवसांनी तिची आई आमच्या घरी येऊन ‘होकार’ सांगून गेल्या. मग पुन्हा मुलीच्या पंढरपूरच्या मामांनी लग्नाला नकार द्यायला हिच्या आई बाबांना सांगितला. झालं पुन्हा एकदा नकार.

असो, दोन महिन्यांनी पुन्हा काय झालं कुणास ठाऊक. परत त्यांचा फोन आला की ‘आमचा लग्नासाठी होकार आहे. बोलणी करायला कधी येता?’. मग माझ्या वडिलांनी मुलाशी बोलून काय ते ठरवतो अस त्यांना सांगितले. मला विचारलं काय करायचं तर मी तिच्याशी बोलून काय तो निर्णय घेईल अस सांगितलं. ती आणि मी पुन्हा एकदा भेटलो. तिला इतक्यांदा हो नाही ची कारणे विचारली. आणि तिने बऱ्याचशा गोष्टी देखील सांगितल्या. असो, तिचा होकार कायम होता. आणि तिने मधल्या काळात कोणताही नवीन स्थळ बघितले नव्हते. मग बोलणी वगैरे झाली. बर, लग्नात हुंडा वगैरे पद्धत आमच्या घराण्यात गेल्या दोन तीन पिढ्यात नाहीत. त्यामुळे तो विषयच नव्हता. पण परत तिचा काका कोलमडला. आणि पुन्हा ‘नाय’ झाला.

त्यांचाकडे बहुतेक सगळीच अंधाधुंदी आहे. कोणीही कधीही उठतो आणि काहीही बोलतो. मग वडिलांना दोन वर्ष लग्नाचा विषय काढू नका अस स्पष्टपणे सांगितलं. आता हे पुराण माझ्या काकूला ऐकवलं तर तीच वेगळंच. मला ती समजून सांगायला लागली, की तू नाराज होऊ नकोस. पहिलच स्थळ होते. अजून आपण मुली पाहू. असो, खूप समजावत होती. बर ते झालं. माझ्या आत्याचा, माझ्या बहिणाबाईचा. अस करत करत माझ्या पाचवीच्या वर्गशिक्षकांचा परवा फोन येऊन गेला की ‘तू कोणी मुलगी पहिली असेल तर सांग’ म्हणून. आता त्यांना काय सांगू मला दर दहा मिनिटांनी एक नवीन मुलगी आवडते ते. पण त्यांना मी आवडतच नाही. मग त्यांना माझा नेहमीचेच ‘तीन वर्षात घर आणि कंपनी. मुलगी पाहायला वेळच मिळाला नाही.’ अस म्हटल्यावर ‘आम्हाला तुझ्यावर विश्वास आहे’ अस प्रशस्तीपत्रक दिले.

काल सकाळी तुळशीला पाणी टाकत होतो तर शेजारच्यांनी हाच विषय काढला. बर काल संध्याकाळी माझ्या लहान बहिणीचा फोन. ती तेच सांगत होती की, माझ्या मुंबईच्या मोठ्या बहिणी माझ्या लहान बहिणीला माझ्याबद्दल या लग्न विषयावरून विचारात होत्या. बर ते झालं. काकाच्या घरून जेवण करून मी माझ्या घरी आलो. तर दुसऱ्या मजल्यावरील साहेब ‘लग्नाच कुठपर्यंत आल?’ मी फक्त ‘चालू आहे’ अस उत्तर दिल. बर मला एक गोष्ट कळत नाही. माझ्या लग्नाचे चालू आहे, ह्या बातम्या यांना कशा काय कळतात? बर ते तर सोडाच, तो खालचा न्हावी! पंधरा दिवसांपूर्वी त्याच्याकडे केस कापायला गेलो. तर केस कापतांना मला विचारलं ‘कधीचा आहे मुहूर्त?’ मी ‘कशाचा’ अस विचारल्यावर ‘तुझ्या लग्नाचा’ अस विचारलं. काय बोलाव आता?  त्यालाही ‘चालू आहे. अजून काही निश्चित नाही’ अस म्हटलं. काल माझ्या मित्रांना भेटलो. माझे मित्र देखील तोच तोच लग्नाचा रटाळ विषय काढला. गावी देखील तेच चालू आहे. कधीही त्यांना भेटलो की हाच एक लग्नाचा विषय… कंपनीतील माझे मित्र फिरून फिरून माझ्या लग्नावरच येतात. बर खर काय ते सुद्धा त्यांना मी सांगितलं आहे. पण गाडी तिथेच येते. आता काय बोलू? सांगा.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.