कालसर्पयोग


मध्यंतरी, तसे आता हे काही नवीन राहिले नाही. एक गुरुजी एका स्थळाला घेऊन घरी आले  होते. मला आई वडिल पुण्यात कधी येतील अस विचारात होते. मी वडिलांना फोन लावून बोलणे करून दिल्यावर माझी कुंडली त्यांनी बघितली. माझी कुंडली दहा पंधरा मिनिटे बघितल्यावर मला म्हणाले, की तुझी रास कर्क, चरण दुसरे आणि पुष्य नक्षत्र. मग तुझी शांती झाली आहे का? मी नाही म्हणाल्यावर एकूणच कुंडली पाहता तुझ्या पत्रिकेत कालसर्प योग आहे. कालसर्पातील ‘सर्प’ ऐकून थोडी भीती वाटली. त्यांना सांगितले, ‘माझी शांती वगैरे झाली नाही. वडिलांना बहुतेक माझ्या ‘शांती’ विषयी अधिक माहिती असेल’.

हे ऐकल्यावर लगेचचं, ‘तुला कधी अस जाणवलं असेल किंवा जाणवत असेल की, प्रत्येक ठिकाणी तुला कोणतीही गोष्ट सहजासहजी मिळत नाही. त्यासाठी संघर्ष करावा लागतो’. आता अशा प्रश्नाला कोणीही ‘हो’च म्हणेल ना! मी काहीही बोललो नाही. पुढे ते म्हणाले ‘तुझ्या पत्रिकेनुसार तुझी शांती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ह्या अडचणी येतंच राहतील’. खरं सांगायचे झाले तर कधी कुठल्याच ठिकाणी ‘अडचण’ आलीच नाही. मग मी कशाला खोटे बोलू. त्यांनाही खरे आहे तेच सांगितले. त्यांना म्हणालो ‘मला कधी अडचण जाणवलीच नाही. कोर्स संपवून ताबडतोप नोकरी मिळाली. आणि तीन वर्षात स्वतः चे घर देखील खरेदी केले. मग यात मला कुठेच अडचण जाणवली नाही. उलट माझ्यावरील साडेसातीच्या काळात मी घर खरेदी केले’.

अस म्हणाल्यावर त्यांचा चेहेरा पाहण्यासारखा झाला होता. त्या गुरुजींना बहुतेक मी नास्तिक वाटलो असेल. मला त्यांना दुखावण्याचा हेतू मुळीच नव्हता. पण सत्य तर हेच आहे ना! ते म्हणाले ‘तुझ्या आई वडिलाची पुण्याई चांगली दिसते. शेवटी आई वडिलांचे पुण्य मुलालाच कामी येते. म्हणून कदाचित अडचणी आल्या नसतील. आणि हो कालसर्प योग आहे’. मी नुसतंच ‘बरोबर आहे’ करीत होतो. मुळात कालसर्प म्हणजे नक्की काय हे मला माहित नाही. कदाचित काल म्हणजे वेळ, आणि सर्प म्हणजे साप. साप विषारी असतो. प्राण सुद्धा घेतो. म्हणजे कदाचित मध्येच अचानक मृत्युयोग असेल. अमुक अमुक वर्षी, तमुक ठिकाणी संभव दिला असेल माझ्या पत्रिकेत. तरीच म्हणतो आहे माझे एवढे लाड का? असो, नावच कसलं भयानक आहे ‘कालसर्प’ योग. बर आहे. ते जातांना त्या दोघांच्या पाया पडलो. मात्र जर त्यात अस काही खरंच माझ्या पत्रिकेत असेल तर त्याचा मला फायदाच म्हणावा लागेल. कारण ‘वृद्धाश्रमाची’ चिंता नाही.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.