काहीही


खर तर आज वेगळ्या विषयावर बोलणार होतो. परंतु, एकदा मन मोकळ करावं म्हणतो. याआधीही मी बोललेलो. आणि आताही तेच बोलतो. मी काही फार मोठा लेखक, विचारवंत नाही. जे बोलतो ते जसेच्या तसे खरडतो. त्यामुळे माझ्या नोंदी ‘काहीही’, काहीतरीच असणार यात शंका नाही. आणि हे मला याआधीही मान्य होत. आणि आताही मान्य आहे. उगाच माझ्याकडून फार मोठ्या अपेक्षा करणे चुकीचे आहे. मला माहिती आहे की, माझ्यामुळे अनेकांचा बहुमुल्य वेळ वाया जातो.

त्यामुळे, खरंच माझी सर्वांना एक नम्र विनंती आहे की, जर तुम्हाला माझ्या ब्लॉगमुळे वेळेचा दुरुपयोग झाला असेल तर कृपा करून ब्लॉगवर येण्याचे कष्ट घेऊ नका. आणि त्याहून महत्वाचे, मी सुधारण्याचा प्रयत्न नेहमी करतो. परंतु, जर सुधारणा होत नाही असे वाटत असेल तर बिनधास्त बोला. मत मतांतर होतातच. मला जी गोष्ट पटते. किंवा मला जी गोष्ट योग्य वाटते. ती दुसर्याला पटेल किंवा योग्य वाटेलच असे नाही. आणि माझंच बरोबर असा हट्ट देखील नाही. मी काही ‘न्याय’मूर्ती वगैरे नाही. आणि इतिहास संशोधक देखील नाही. असतो तर मला सर्वांनी ‘सत्यशोधक’ नसते का म्हणाले? कोण गुरु आणि कोण शिष्य? कोण बरोबर आणि कोण चुकीचे? याचे सापेक्ष आणि योग्य मांडणी करण्या इतका मी थोर नाही. ते खाते आजकाल दादुभक्त सांभाळतात.

माझ्या दृष्टीने मला जे योग्य वाटते ते मी बोलतो. आणि जे बोलतो त्यावर मी ठाम असतो. देशात इतके घोळ होत आहेत. अजून अनेकांना नोकऱ्यांचे प्रश्न सतावत आहेत. मुख्यत: नोकरी कुठे आणि कशी मिळेल हेच आम्हा मराठी लोकांना माहिती नाहीत. बाहेरचे रोज येतात. मी अस बिलकुल म्हणत नाही की आम्हा मराठी लोकांना नोकऱ्या मिळतंच नाहीत. पण अनेकजण अजूनही गोंधळलेल्या अवस्थेत आहेत. आणि मला तेच महत्वाचे वाटते. इथे ना धड वीज ना पाणी. रस्त्यांची बोंब आहे. पण हे विषय सोडून मानवतावाद, अल्पसंख्यांकवाद आणि आरक्षण या सारख्या विषयावर नुसती पकपक करण्यात बिलकुल रस नाही. सचिनने कस खेळाव आणि राज ठाकरेच कुठ कस चुकते? किंवा राहुलची काय काय धडाधड पडापड चालू आहे यावर बोलण्या इतका मोठा आणि हुशार अजून झालेलो नाही. त्यामुळे यावर देखील मी बोलेल यावर देखील शक्यता कमीच आहे. आणि तुमचे ज्ञान वाढेल असे तत्वज्ञान मी सांगू शकेल, यावर विश्वास नाही.

पण एक गोष्ट मला मान्य आहे की, वर्डप्रेस फ्री ब्लॉग सर्व्हिस प्रोव्हाईड करते म्हणून मी वापरतो. असो, आता फार पकवत नाही. प्रतिक्रिया वाचून फारच मनात विचार उफाळून आलेले. म्हणून बोलून मोकळा झालो. चूकभूल माफी असावी.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.