कुटुंब


हुश्श !!! काय पटापटा दिवस जात आहेत. मागील महिन्यात सुट्टीला माझे कोकणातील आणि येथील भाऊ बहिण आले आहेत. मज्जाच मज्जा चालू आहे. त्यामुळे वेळच मिळत नाही आहे. मागील आठवड्यात माझे वडील आणि माझा बंधुराज येऊन काल पुन्हा गावी गेले. काय बोलाव आणि काय नाही अस झालं आहे. स्वर्गच उतरलं की काय असा भास होतो आहे. सगळे ‘मिनी आठल्ये’ घरी आहे. असो, मागील काही दिवसात खूप काही घडल. रोज अशा घटना घडल्या की प्रत्येक गोष्ट विस्तृत बोलायची झाल्यास एखादे ‘ईबुक’ बनून जाईल. काही खूप छान घटना घडल्या तर काही खुपंच मनाला बोचणाऱ्या.

जवळपास दोन आठवडे माझी आई गावी गेलेली होती. आणि ही सगळी चिल्लर पार्टी इथे होती. त्यांना सकाळी उठवण्यापासून ते खानापानाचे सगळेच मला बघावे लागत होते. त्यात स्वयंपाकाचे ज्ञान शून्य. रोज जेवण जेवतांना, जेवण तयार करता येणे किती महत्वाचे आहे याचा विचारच केला नव्हता. सुरवातीला मी गोंधळून गेलो होतो. कंपनीत कामापेक्षा ह्या चिल्लर पार्टीचे काय चालले असेल याकडेच माझे जास्त लक्ष होते. संध्याकाळची जेवणाची सोय मी काकाकडे केली होती. रात्री जेवण झाल्यावर ह्या सगळ्यांना पुन्हा घरी आणण्यात खुपंच कसरत करावी लागे. माझे दोन लहान भाऊ पुढे त्यांच्या एखादया ‘पीसी गेम’ बद्दल किंवा कोणता कुत्रा पाळायचा याच्या गप्पात रंगलेली असायची. आणि माझ्या दोन लहान बहिणी ‘मेहेंदी’ किंवा ‘ड्रेस’ बद्दल गप्पा मध्ये रंगलेल्या.

सर्वात पुढे माझे दोन भाऊ असायचे. त्यांच्या मागे मी. आणि माझ्या मागे माझ्या बहिणी. बर रस्त्यावर देखील यांची दंगामस्ती चालूच. रात्रीच्या वेळी एखादे कुत्रे भुंकले की दोघेही भाऊ कुत्र्याचा आवाज काढून त्या कुत्र्याच्या मागे लागायचे. मग कसे बसे त्या दोघांना पुढे काढले तर, ह्या दोघी कुठे तरी मागे घोळत असायच्या. जेवण करून रोज घरी यायला अकरा वाजून जायचे. बर, घरी आल्यावर झोपायला कोणीच तयार नसायचे. असले विनोद करतात की रडणारा हसायला लागेल. मग कसे बसे दोन अडीचच्या आसपास झोपी जाणार. आजकाल त्यांना झोपी लावण्यासाठी ‘भुताच्या गोष्टी’ युक्ती शोधून काढली आहे. त्या दोन्ही आठवड्यात माझी ‘लेट मॉर्निंग’ची बस देखील चुकायची. आई आल्यावर खूप ताण हलका झाला. रोज संध्याकाळी ही चिल्लर पार्टी, मी आणि माझी मैत्रीण असे आम्ही फिरायला जायचो. पण तिथेही असेच. त्यांना सांभाळण्यातच सगळा वेळ निघून जायचा. त्यात माझ्या कोकणातील बहिणीला माझी मैत्रीण आवडत नाही.

रोज गच्चीवर झोपतांना आणि आकाशातील तारे बघतांना सगळ्यांचा एकच विषय की, आपण कायम एकत्र राहिलो तर किती मज्जा येईल. मागील एका रविवारी आम्ही सगळे सारसबाग, दगडूशेट अशी छोटी ट्रीप काढली होती. आता चिल्लर पार्टीला बरोबर घेऊन पुण्यात फिरण्याची पहिली वेळ होती. आणि माझ्या मैत्रिणीची आणि माझी देखील. दगडूशेटच्या दर्शनानंतर आयुष्यात ‘तुळशीबाग’ पाहण्याचा योग माझ्या मैत्रिणीमुळे आणि बहिणींमुळे आला. संध्याकाळची सात वाजताची निगडी बस पकडली. लहान भाऊ माझ्या मांडीवर डोके ठेवून आणि माझी मैत्रीण माझ्या खांद्यावर डोक ठेवून झोपलेली. असो, ही पहिलीच वेळ. घरी आलो तर ते आधी सांगितले होते ना एका स्थळाबद्दल. त्या बाईसाहेब घरी आल्या होत्या. तीच्याशी बोललो त्यावेळी जरा स्पष्ट झाले. शेवटी पत्रिका आणि पंडितांचा घोळ. तिचा कायम होकार होता. बोलणी वगैरे झाली. पण परवा माशी शिंकली कुणास ठाऊक पुन्हा त्यांचा ‘नाय’. आता आई वडिलांना मी स्पष्टच ‘दोन वर्षे लग्नाची घाई करू नका’ अस सांगितलं. थोडा वेळ हेमंताचा ‘देवदास’ झाला होता. पण आता ठीक आहे. एकूणच, दिवस तासाप्रमाणे जात आहेत. आणि रोजच नवीन घटना. या चिल्लर पार्टीची रुसवे फुगवे, हसणे आणि मस्ती सर्वच खूप मोहक आहे. बाकी बोलूच.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.