कृष्णलीला


कृष्णलीला! सुदामा पुण्यात एका मोठ्या कंपनीत नोकरीला लागतो. नवीन कंपनीत कोणीच मित्र नसल्याने तो एकटा रहात असतो. कंपनी आणि घर हाच काय तो दिनक्रम. दोन-अडीच महिन्याने त्याची ओळख एका ‘कृष्ण’ सोबत होते. हळू हळू मैत्री वाढते. तसा कृष्णही भारीच असतो. दुसऱ्याच महिन्यापासून ‘लीला’ दाखवायला सुरवात करतो. एके दिवशी सुदामा काम करीत असतांना त्याच्या डेस्कवर येतो. सुदामा आनंदाने त्याच्याशी गप्पा मारायला सुरवात करतो. खर तर कृष्णाला सुदामाच्या मानाने दीडपट पगार. पण तरीही ‘मदत’ मागतो. सुदामाने कारण विचारल्यावर, ‘मला तुझ्या बँकमधील अकौंट असलेल्या माझ्या बाबा वासुदेवांना गावी पैसे हवे आहेत. माझ्या बँकेने पाठवले तर, वेळ लागेल. तू पाठव. मी हवं तर दुपारीच पैसे वापस करील’ अस कृष्ण सुदामला सांगतो. सुदामा कृष्णाच्या या अडचणीत त्याची मदत करायचे मान्य करतो. आणि ताबडतोप पैसे वासुदेवाच्या अकौंटमध्ये टाकतो.

दुपारची संध्याकाळ आणि संध्याकाळची रात्र होते. दिवसामागून दिवस जातात. इकडे सर्व पैसे दिल्याने पॉलिसीचे हप्ते द्यायची वेळ येते. सुदामा शेवटी नाईलाजाने कृष्णाला त्या मदतीची आठवण करून देतो. तर कृष्ण रुक्मिणीवर जरा जास्त खर्च झाल्याचे सांगून दिलेल्या रकमेतील एक चतुर्थांश रक्कम देतो. आणि नंतर उरलेली हप्त्या हप्त्याने रक्कम देतो. त्यामुळे इकडे सुदामाचे पॉलिसीचे हप्ते आणि लोनचे हप्ते चुकतात. आणि त्याला लेट फी सकट रक्कम भरावी लागते. ऑनलाइन कमिशन आणि लेट फी मुळे सुदामाचे नुकसान होते. मैत्रीत या गोष्टी पहायच्या नसतात, असा विचार करून सुदामा काहीही न बोलता विषय टाळून देतो. पण हळू हळू या कृष्ण ‘सख्यांची’ संख्या वाढू लागते. हॉटेलात सोबत जेवतात. परंतु कधीच बिलाची रक्कम काढून देत नाहीत. यातही मित्रामित्रात पैसे खर्च करायला काय हरकत आहे, असा विचार करून प्रत्येक वेळी हॉटेलातील जेवणाची बिल सुदामा भरत असतो. आणि कधीही मोठे काम करतो असा आव आणत नसतो. पण त्याच्या सख्यांना ही सवयच लागून जाते. त्यात सुदामा घरातील वस्तूंवर आई वडिलांच्या आज्ञेनुसार खर्च करीत असतो. हळू हळू सुदामाची आर्थिक परिस्थिती सुधारण्याऐवजी बिघडायला लागते. परंतु तरीसुद्धा सुदामा सगळे खर्च, हप्ते व्यवस्थित पार पडत असतो.

अचानक एकेदिवशी एक सुंदर मुलगी त्याच्या जीवनात येते. त्याच्या स्वप्नसुंदरी पेक्षा कितीतरी अधिक पटीने छान, गोड आणि सुंदर. तो तीच्यासाठी वेडा होतो. त्याचे सखे त्याची सर्वच ठिकाणी तीच्या विषयाने त्याची ‘उडवू’ लागतात. सगळे कट्टे, भज आणि जिथे त्यांना गप्पा मारायला जागा मिळेल तिथे त्याची खेचू लागतात. ती ज्या कॅन्टीनमध्ये जाते त्याच कॅन्टीनमध्ये सुदामा जायला लागतो. पण सखे त्याच्या ह्या वेडेपणाचा जरा जास्तच फायदा घ्यायला लागतात. सर्व कृष्ण आपल्या भोजनाची कुपन्स सुदामाला घ्यायला सांगतात. पण कुपनाचे पैसे मात्र देत नसतात. सुदामा नेहमीप्रमाणे दुर्लक्ष करतो. अशाच एका कृष्णाला, थोडी मदत हवी असते. आणि सुदामा नेहमीप्रमाणे मदत करतो देखील. दुसरा एक कृष्ण महिन्या दोन महिन्यांनी, थोडी थोडी रक्कम घेत असतो. आणि जणू काही आपल्याला ‘अर्पण’ केली या आविर्भावाने विसरूनही जातो. इकडे सुदामा त्या सुंदर मुलीच्या प्रेमात बुडालेला असतो. एकदा त्याला मोबाईल घ्यावा असा विचार करतो. रक्कमही जमा करतो. पण ऐनवेळी पुन्हा एका कृष्णाला पैसे हवे असतात. सुदामाच्या मानाने वयाने मोठा आणि पगाराने मोठा असला तरी, मैत्रीखातर तो त्याला मदत करतो.

या मदतीमुळे त्याच्या आर्थिक डोलारा कोसळत नाही. परंतु त्याचे मोबाईल घ्यायचे स्वप्न स्वप्न होते की काय, अशी शंका जाणवू लागते. तरीही सुदामा मोबाईल घेण्याचे ठरवतो. परंतु सुदामाची आई काही रकमेची मागणी करते. आणि तिला दिल्यानंतर सुदाम्याचे स्वप्न स्वप्नंच होणार याची त्याला जाणीव होते. त्यातच तो एक नवीन घर देखील खरेदी करतो. सुदामा त्याच्या लहान भावाला मदत मागतो. त्याच्या भाऊ त्याला मदतही करतो. ती मदत आणि सर्व कृष्ण परिवाराला केलेली मदत, ते वापस परत करतील ह्या विचाराने तो पुन्हा एकदा मोबाईल घ्यायचे ठरवतो. पण कोणताही कृष्ण त्याला केलेल्या मदतीला जागत नाही. कुठलाच मोठा खर्च न करून देखील पैसे का जमवता आले नाही याचा सुदामा सारासार विचार करतो. आणि त्याला ही सर्व ‘कृष्णलीला’ आहे हे लक्षात येते.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.