कोरोनाचे माहात्म्य


कोरोनाचे माहात्म्य वर्णावे इतका काही तो मोठा नाही. परंतु, त्यामुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता त्याचे माहात्म्य वर्णावे असे वाटते. मी मी म्हणणाऱ्या अनेक स्वयंभूना ज्याने चितपट करून वस्तुस्थितीचे दर्शन घडवले तो हा कोरोना विषाणू!

त्याच्यामुळे म्हणा वा अन्य कारणामुळे म्हणा या पृथ्वीवर माणूस हा सर्वशक्तिमान नाही. ह्याची स्पष्ट जाणीव होते! तसेच अशी परिस्थिती भविष्यात कधीही उद्भवू शकते! त्यामुळे आपल्यासाठी यातून धडा घेण्याचा एकच गोष्ट आहे ती म्हणजे वर्तमानात जगा.

वर्तमानात यासाठी म्हणतोय कारण भूतकाळ आपण बदलू शकत नाही. भविष्यकाळाची कल्पना केली जाऊ शकते! अन भविष्यकाळ वर्तमानावर आधारलेला आहे. त्यामुळे आपल्याला जे हवंय ते वर्तमानातच हवंय ह्या विचाराने केल्यास अनेक मोठे बदल घडवून आणले जाऊ शकतात.

आज कोरोना आहे. उद्या काहीतरी नवीन असेल. ह्या नश्वर जगात पुढे काय वाढून ठेवलंय हे कोणीच सांगू शकत नाही. त्यामुळे, आपण आहे त्या वेळेचं योग्य नियोजन व अंमलबजावणी करणे अधिक संयुक्तिक राहील!

जर, एखादा नैसर्गिक हल्ला माणसांनाच काय देशाला हादरवून टाकू शकतो तर आपण भविष्याचा विचार करावाच कशाला? अन त्याच्या कल्पनेत वर्तमान का दवडावा?

मुळात आपल्याला भविष्यकाळ आहे ह्या संकल्पनेने अनेक संकल्पना कधी सत्यात येतच नाहीत. अन त्या याव्यात ह्या सद्हेतूने कोरोनाने माणसाला अशा पेच प्रसंगात टाकलेलं आहे की काय अशी शंका यावी अशी परिस्थिती आहे. त्यामुळे ह्यातून आपण आपले काम आजचे आजच संपण्याचा निर्धार जरी केला तरी अनेक मोठे बदल घडू शकतील!

माझ्याबद्दल सांगायचे झाले तर ह्या संकटातून जे शिकायला हवं ते मी शिकलो आहे! ते म्हणतात ना, जो दुसऱ्यावर विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला. आता विसंबणे हाच खरा धोका आहे. मग ते एखाद्या व्यक्तीवर असो वा वेळेवर. सगळंच गडबड गोंधळ निर्माण करते.

अन मग आपण टाहो फोडतो त्या बिचार्या नशिबावर. त्यामुळे कोरोनाच्या संकटात शिकण्यासारखी हीच गोष्ट आहे की, जे आहे ते आताच आहे. अशा पद्धतीने प्रयत्न केल्यास अडचणींच्या दोन पाऊल पुढे उभे राहता येईल! हा केवळ संकल्प न राहता रोजच्या जीवनाची सवय केली तर कोरोनाचे माहात्म्य साठा उत्तरी संपन्न होईल! अन भविष्यातील संकटरूपी वादळे झेलण्याच सामर्थ्य उभे राहील!


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.