खड्डास्थान


हा देश खड्डास्थान आहे. किती ते खड्डे! आणि काय तो देश! आपला देश खरोखर धर्मनिरपेक्ष आहे. जगाने धर्मनिरपेक्षता काय असते हे आपल्या देशाकडून शिकले पाहिजे. आज मला आपल्या सरकार आणि प्रशासनाचा अभिमान वाटत आहे. ते जे म्हणायचे ना की, हा देश हिंदूंचा नाही. तेच खर आहे. हा देश आहे खड्ड्यांचा. इथे अनेक जाती, पंथ आणि धर्म आहे. खूप विविधता आहे. पण ते प्रतिज्ञेत आहे ना ‘विविधतेत एकता’, त्याचा अर्थ आता समजतो आहे.

पहा, भारतात कुठेही जा. अगदी कन्याकुमारी पासून हे हिमालयाच्या पायथ्यापर्यंत. प्रत्येक ठिकाणच्या रस्त्यावर तुम्हाला एकच साम्य दिसेल. आणि ते म्हणजे खड्डे. मला खर तर हा नेहमी प्रश्न पडतो की, सरकार ही एकता टिकवून ठेवण्यासाठी किती अथक परिश्रम करते. जरी देशात ‘चांगला रस्ता दाखवा आणि एक लाख मिळावा’ अशी स्पर्धा ठेवली तरी कुणीही लाखभर रुपये मिळवू शकणार नाही. पहा ना, बरोबर रस्त्यांच्या मधोमध खड्डे असतात. उगाच नाही, इंजिनिअर लोकांना हुशार म्हटले जाते. रस्ता झाल्यावर तो चांगला दिसतो. आणि पावसाळा आला की खड्डेच खड्डे. अस म्हणणे खर तर चुकीचे होईल की, सर्वच खड्डे रस्त्याच्या मधोमधच असतात. रस्त्यांवरून चालतांना शिवशाहीत गेल्याप्रमाणे वाटते.

शिवशाहीच आहे म्हणा. त्यांच्या काळात नाही का ते ‘खंदक’ असायचे, अगदी तस आहे आमचे. आणि पावसाळा झाला की, रस्त्यांवरील आमचे ‘खंदक’ पाण्याने तुडुंब भरतात. आणि ते खंदक काहीजण व्यवस्थित पार करतात. पण काही नवखे काही अजाणतेपणाने त्यात जातात. आणि एकतर ते किंवा त्यांचा आजूबाजूचे त्या पाण्याने ‘स्नान’ करतात. असे अनेक दैव दुर्लभ क्षण मी पाहिलेले आहे. जो भिजतो, तो खजील होतो. बर, खड्डे म्हणावे की खंदक हा खूप मोठा प्रश्नच आहे. कारण देहूरोड आणि निगडीतील काही खंदकांनी अनेकांना स्वर्गवासी केले आहे. पण तरीही आमचे सरकार हृदयावर दगड ठेऊन ही विविधतेतील एकता जपते.

नगरहून मनमाडला जाणारा ‘हायवे’, सगळे म्हणतात म्हणून मीही म्हणतो आहे. कारण त्या हायवेच्या चारपट जास्त मोठे रस्ते निगडीत आहेत. तर ते वाजपेयी पंतप्रधान होते. त्यावेळी तिथे, म्हणजे त्या हायवेचे काम सुरु झालेले. म्हणजे ती त्यांचीच कृपा आहे. पण ते गेले आणि तेव्हापासून आमच्या महान धर्मनिरपेक्ष आणि विविधतेतील एकता पाळणारे सरकारने ते अर्धवट काम आणि तिथले जे खड्डे आहेत ते अजूनही जतन करून ठेवले आहेत.

त्या खड्ड्यांची खोली मोजली तर निदान दीड एक फुट भरेल. त्यामुळे आता मला मला या गोष्टीवर ठाम विश्वास बसला आहे की, हे हिंदुराष्ट्र अथवा धर्मनिरपेक्ष राष्ट्र नसून खड्डाराष्ट्र आहे. तशी ही खड्ड्यांची परंपरा आणि संस्कृती भारताच्या स्वातंत्र्यापासून अस्तिवात आणण्यासाठी महान सरकारने अथक परिश्रम घेतले आहेत.

वर्षभरापूर्वी, माझ्या भागात नवीन झालेला रस्ता या अखंडतेला आणि एकतेला बाधा ठरणारा होता. जो आता प्रशासनाने, दूर केलेला आहे. एक पाईप लाईन टाकण्यासाठी अख्खा रस्ता उखडून टाकला. ह्याला म्हणतात न्याय निष्ठुरता! तसं काही अडचण नव्हती. आधी लोकांनी त्यांचा सोयीसाठी आणि मुख्य म्हणजे देशाच्या अखंडतेसाठी स्पीड ब्रेकर बनवून टाकलेले. पण खड्डे नसल्याने प्रशासनाच्या देशप्रेमाने आता मी देखील या खड्डास्थानाचा नागरिक आहे अस अभिमानाने म्हणू शकतो. जय महाखड्डाराष्ट्र! आणि जय खड्डास्थान!


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.