खेद


संध्याकाळची सात वाजताची पुणे लोणावळा लोकल नेहमी प्रमाणे उशिरा आली. पण आनंदाची गोष्ट अशी कि ह्यावेळी गाडी उशिरा येणार याची सूचना दिली गेली. तीच रटाळ ‘हमे खेद है’ ची आकाशवाणी. पुण्यात लोकल उशाराची सवय सगळ्यांनाच झाली आहे. त्यामुळे कोणीही आजकाल चिडत नाही. घरी आल्यावर पंतप्रधानांनी ‘खेद’ व्यक्त केल्याची बातमी म.टा वर वाचली. चंडीगड येथील पीजीआयएमईआर या हॉस्पिटलमध्ये पंतप्रधानांच्या हस्ते पदवीदान समारंभ मंगळवारी झाला. त्यावेळी हॉस्पिटलच्या आवाराभोवती पंतप्रधानांच्या सुरक्षाव्यवस्थेचे कडे उभारण्यात आले होते. सुमीत वर्मा या किडनी पेशंटला या सुरक्षाव्यवस्थेमुळे हॉस्पिटलमध्ये दाखल होता आले नाही. पेशंट व त्याच्या नातेवाईकांना दोन तास ताटकळत रहावे लागले. परिणामी वर्मा यांचा गाडीतच मृत्यू झाला. मग पंतप्रधानांनी पत्र पाठवून ‘खेद’ व्यक्त केला आहे.

वा! सुमीत वर्माच्या मृत्यूची किंमत पन्नास पैश्याचं पोष्ट कार्ड. निदान पंतप्रधानांनी पत्र तरी पाठवलं. आमचा वक्रतुंड महाकाय केंद्रीय कृषिमंत्री शेतकऱ्यांच्या आत्महत्येनंतर मस्त पैकी क्रिकेटच्या मैदानावर नाचणाऱ्या चिअरगर्लची …. नाही नको. काय पाहत होता हे तुम्हाला देखील माहिती आहे. नेत्यांच्या किंवा रेल्वेचा ‘खेद’ म्हणजे त्यांना नेमक काय वाटत हे मला माहित नाही. पण सर्व साधारण खेद म्हणजे झालेल्या चुकी बद्दल होणारा पस्तावा किंवा होणारे दुख. आता आपली नेतेमंडळी हसून खेद व्यक्त करतात. एकदा येवल्याला जात असताना शिर्डीला त्यावेळचे उपपंतप्रधान अडवाणी येणार म्हणून मला तीन तास नगर मनमाड हायवेला थांबावे लागले. दोन महिन्यापूर्वी पुण्यात उपराष्ट्रपती येणार म्हणून असाच मला उशीर  झाला होता. घटनेच्या कुठल्या कलमात अस नमूद केल आहे की  सरकारचा एखादा मंत्री आला की तो ज्या रस्त्याने येणार किंवा जाणार ते रस्ते बंद करायचे? आजकाल पाटलीण बाई महिन्यातून एकदा आपल्या मुलाला भेटायला पुण्याच्या वाऱ्या करीत असते. दोनशे लोक मारल्यानंतर आमच्या पंतप्रधानांनी असाच खेद व्यक्त केला होता. किती छान ना. जगात सॉरी’ आणि ‘खेद’ सारखे आणखीन किती शब्द आहे देव जाणे. कुठल्याही चुकी नंतर म्हणा. आणि मोकळे होऊन जा. बाकी नंतर बोलूच.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.