खेळ मांडला


विद्युत रोषणाईत आणि धडाकेबाज राष्ट्रकुल स्पर्धेच्या समारंभाची सुरवात झाली. चेअरमन साहेब भाषणाला उभे राहिले. ढेरी दाखवत, भाषणाला सुरवात केली. माझ्या प्रिय, क्रीडापटू आणि क्रीडा रसिकांनो, आणि आमचे (ब्रिटीश) युवराज आणि दिल्लीच्या मुख्यमंत्री ‘मिष्टर’ दीक्षित, तसेच माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम ‘आझाद’. या स्पर्धेच्या निमित्ताने आज तुम्हा सर्वांशी बोलण्याची संधी मिळते आहे. आणि त्यापेक्षाही महत्वाचे या स्पर्धेचे आयोजन करायला संधी मला प्राप्त करून दिल्याबद्दल आभार मानतो. आता स्पर्धा सुरु होते आहे. खेळ तर आधीपासूनच सुरु झाला होता. माझ्या म्हणण्याचा अर्थ, खेळाची तयारी. तुम्ही पहातच होता किती मेहनतीने आम्ही हे सर्व उभे केले आहे.

हे सर्व पूर्ण करण्यासाठी रात्रीचा दिवस केला आम्ही सर्वांनी. तुम्हाला तर काही सांगायची गरज नाहीच. तुम्हीही पहिले असेल. काही गोष्टी, ज्या राहिल्या आहेत त्या सांगतो. एकतर सर्वजण येतांना म्हणजे तुम्ही प्रेक्षक सुद्धा, आपला इन्शोरन्स केला असेलच. नसल्यास माझ्या पीएला भेटा. तो कमी खर्चात करून देईल. कारण कधी एखादा पूल कोसळेल. किंवा भिंत खचेल याची काहीच खात्री देता येत नाही. दुसरी महत्वाची गोष्ट खेळाडूंसाठी, राहण्याची व्यवस्था क्रीडानगरीत केली आहे. तिथे स्वच्छता आणि टापटीपपणा असेल, किंवा पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेलच. अशा भ्रमात राहू नका. पाणी पहाटे पाच ते सहा या वेळेत येईल. स्वच्छता नसेल तर ती करायची की नाही हा तुमचा प्रश्न आहे. कारण स्पर्धेला या अस कुणी आग्रहाचे निमंत्रण पाठवले नव्हते.

उगाच नंतर ओरडू नका की, सांगितले नाही म्हणून. अजून एक गोष्ट मैदानावर अजूनही काम चालू आहे. त्यामुळे मोकळ्या वेळेत स्पर्धेची तयारी आपल्या दिलेल्या निवासस्थानीच करा. मैदानावर गेले. आणि विटा, मातीत घसरून पडले तर हॉस्पिटलला खर्चाची तयारी ठेवा. अजून एक विनंती. इथे आल्यावर काय करायला हवे यावर चर्चा करू नका. कारण आता वेळ नाही आहे ते करत बसायला. पंतप्रधान आले होते मध्ये किती काम झाले आहे पाहायला. पाहून पगडी जड झाली होती त्यांची. त्यामुळे विचार करून विचार करा.

तसे थोडक्यात, स्पर्धेच्या आयोजनाच्या तयारीची तुम्हा सर्वांना कल्पना आलीच असेल. परदेशी खेळाडूंना एक सूचना. आपण आपल्या देशाची आणि इथल्या व्यवस्थेची तुलना करू नका. हा भारत आहे. इथे असेच चालते. त्यामुळे गुमाने स्पर्धेत खेळ खेळा. आणि बोंबलू नका. कारण त्याचा काहीच फायदा होणार नाही. जे व्हायचे होते ते मी आधीच करून टाकले आहे. आणि ‘प्रकरण’ दाबले देखील गेले आहे. ढेरीची शपथ! अरे आणि शेवटची विनंती व्यासपीठावरील मान्यवरांना. अजून अर्ध्या तासात कार्यक्रम उरका. कारण अर्ध्या तासाने भारनियमन सुरु होणार आहे. शेवटी मराठी चित्रपटाचे एक सुपरहिट गाण्याची काही शब्द बोलून माझे भाषण संपवतो ‘खेळ मांडला..’.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.