गणपतीची वर्गणी


ज सकाळी सकाळी समोरच्या इमारतीतील छोटी छोटी मुले गणपतीची वर्गणी मागायला आली होती. नंतर संध्याकाळी आमच्या इमारतीच्या बाजूला असलेल्या मंडळाची मुले वर्गणी मागायला आली. दोघांनाही वर्गणी दिली. वर्गणी आणि माझे फार जुने नाते आहे. मराठी शाळेत शिकत असताना नेहमी वर्षातून एकदा सैनिकी फंड साठी एक रुपयाचे ते स्टीकर घ्यायचो. आणि इतरांप्रमाणे ते मी माझ्या कंपास पेटीला लावायचो. माध्यमिक शाळेत असताना वर्गात देखील आम्ही गणपती बसवायचो. त्यावेळी देखील आम्ही वर्गणी गोळा करायचो.

नंतर गावाकडे आमच्या गल्लीत देखील एक गणेश मंदिर होते. तिथे नेहमी गणपती बसायचा. मी बारावीत शिकत असताना पहिल्यांदी आम्ही गल्लीतील मुलांनी गणपती बसवला. त्यावेळी त्याच मंदिरात एका कोपर्यात आमचा छोटासा गणपती बसवला. आज संध्याकाळी त्यातील एकाचा फोन आला होता. यावेळी तिथे गणेश उत्सव काही मोठ्या पद्धतीत साजरा होणार नाही. कारण आता सगळे कामा निमित्ताने बाहेर स्थायिक झाले असल्याने, कोणी कार्यकर्तेच उरले नाहीत. जे आहेत त्यांकडून वर्गणीच्या बळावर मोठा उत्सव करणे अशक्य आहे. ज्यावेळी पहिला गणपती आम्ही बसवला त्यावेळी आम्हीही वर्गणी गोळा केली होती. नंतर मात्र कधी वर्गणी मागितली नाही. जी काय आमची गल्लीतील मुले होती त्यातच एवढे जमा व्हायचे कि वर्गणी मागायला जायची गरजच भासायची नाही. वर्गणी गोळा करण्याचा एक फायदा मला झाला कि लोक आणि त्यांचे विविध स्वभावाचे दर्शन घडून आले. मुळात गणपतीची वर्गणी म्हटलं कि साधारणत सगळ्यांना टाळाटाळ करण्याची सवय असते. कारण एवढी मंडळ मागायला येतात कि, वर्गणी देण्याचा वीट येतो. त्यात प्रत्येकाची अपेक्षा यांच्या खिश्यापेक्षा अधिक. त्यामुळे वर्गणी देणारे वर्गणीदार ना वर्गणी घेणारी मंडळ आनंदी. काही काहीना तर वर्गणी या प्रकाराबद्दल मनस्वी चीड असते. जणू काही वर्गणी द्यायची म्हणजे भिक द्यायची अस काही ते समजतात. आणि मुळात काही मागण्याचा माझा स्वभाव नसल्याने शाळा आणि आमच्या मंडळाचा पहिला उत्सव सोडता मी परत काही कोणाला वर्गणी मागायला गेलो नाही. आमच्या मंडळाची कामे बघूनच लोक स्वतहून वर्गणी द्यायचे. काही जण तर त्यांचे नाव व्हावे म्हणून वर्गणी द्यायचे. पण असे अनेक वर्गणीदार मिळाले कि जे भक्ती भावाने वर्गणी द्यायचे. आमच्या गल्लीत दोन मांडले. एक आमच आणि दुसर मोठ्या लोकांच. मोठी म्हणजे सगळे आमचे मित्रांचे आई वडीलच. त्यामुळे आम्हाला कशाला कोण वर्गणी देणार. सगळे आम्हाला म्हणायचे कि एका गल्लीत दोन मंडळ कशाला? त्याचं म्हणन मला पटायचं पण काय करता आम्हाला त्या मंडळात कोणी विचारातच नसायचं. आम्ही नेहमी त्या सतरंज्या उचलायला नाही तर झाडून घ्यायला. नाही तर ह्याला बोलाव नाही तर पाणी आण असली कामे. मग सगळ्यांनी मिळून गणपती बसवला. आमच्यात कधीच भांडण होत नसायची पण मोठ्या मंडळात नेहमी व्हायची. त्याचा फायदा असा झाला कि कोणी एखादा त्यांच्यातील भांडला कि तो आम्हाला मदत करायचा. मग काय आमची आर्थिक स्थिती दुसऱ्यावर्षी चांगलीच झाली.

कोणाशी कस वागाव ह्याचे जणू धडेच आम्हाला गणपतीच्या काळात शिकायला मिळायचे. कोणाचा स्वभाव काय आहे. हे आम्हाला पहिल्या दोन वर्षात कळाल. गणपतीची वर्गणी न मागताच एवढी व्हायला लागली कि मोठ्या मंडळातील लोकांना आमचा हेवा वाटू लागला. मुख्य म्हणजे आमच्या मंडळात मी सोडून बाकी सगळे लहान लहान मुले. मंडळ स्थापन झाल्यावर आमच्या मंडळात प्रत्येक जण त्याचा दोस्त आणायचा. आणि मला म्हणायचं कि ह्याला पण मंडळात यायचं. का अस विचारलं कि तो सांगायचा कि त्याच्या गल्लीतही त्याला तिथल्या मंडळाची मुले तो लहान असल्याने घेत नाही. नंतर नंतर तर छोट्या छोट्या मुली देखील यायच्या. कारण त्याचे भाऊ असायचे न आमच्या मंडळात. मला थोडीच काय नुकसान होणार असायचे. मग काय रोज सकाळी कोणी स्वताहून सडा मारायच्या. त्यातील कोणी छानशी पण भली मोठी देवाला समोर रांगोळी काढायचे. कोणी फुले आणून द्यायचे. सगळी कामे व्हायची. काही कोणाला सांगा आणि मागा याची काही गरजच संपून गेली. दुसऱ्यावर्षी आमच्या मंडळाची सदस्य संख्या ५० पेक्षा अधिक होवून गेली. आता आरतीला आमचीच संख्या जास्त होत जायची, त्या मोठ्या मंडळपेक्षा. कारण प्रत्येक जण त्याच्या आई वडिलांना आरतीला घेवून यायचा. मिरवणुकीला आम्ही मुलींना टिपऱ्या आणि मुलांना लेझीम असा बेत केला. आमच्या गावातील बाकीची मंडळे नुसता धांगड धिंगा. आमच मात्र शिस्तबद्ध. सर्वात पुढे टिपऱ्या खेळत दोन रांगेत मुली. आणि त्या नंतर टिपऱ्या खेळणारी मुले. मागे गणपती. आणि त्यामागे प्रत्येकाचे आई वडील. हे सगळ बघूनच इतर मंडळे आम्हाला पुढे जायला जागा द्यायचे. सगळ अगदी छान. वर्गणी हि एक अशी गोष्ट आहे कि जी तुम्हाला अनेक गोष्टी शिकवते. मान, अपमान आणि आनंद या तिघांचा अनुभव येतो.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.