गाणी


आज सकाळी नेहमीप्रमाणे लोकल चुकली. बस स्थानकात आलो तर बस मिळेना. शेवटी खाजगी वाहनाने येरवड्याला गेलो. आता खाजगी म्हटल्यावर हिरो लोक असणारच, एकाचा एमपीथ्री प्लेअर सुरु. सकाळी उशीर झाला होता म्हणून आधीच वैतागालेलो. त्यात त्याच ‘पेहली पेहली बार मोहब्बत कि है‘. आता त्याच्या एकूणच अवताराकडे बघून हे गाणे एकदम विरुद्ध वाटले. पण गाणे छान लावले होते. कंपनीत माझ्या सिनिअरने ‘मन का रेडीओ बजने दे जरा’ अस म्हटल्या म्हटल्या माझ्या बॉसने त्याला थांबून म्हटला ‘बस्स’. हे ऐकून सगळेच हसू लागले. परवा देखील असंच चिंचवडच्या बसमध्ये बसलो तर त्यात गाणी चालू. आता पीएमपीएल मध्ये गाणे ऐकण्याची ही माझी दुसरी वेळ. बर गाणी सुद्धा निवडून काढलेली. ‘अच्छा सिला दिया तुने मेरे प्यार का’ ऐकून ताबडतोप माझ्या मोबाईलचे हेडफोन कानाला लावले. बहुतेक यावेळी बोनस न मिळाल्याच्या दुख उफाळून आले असावे त्या बस चालकाला. बर गाणी हा आयुष्याचा अविभाज्य भाग आहे की काय अस वाटत आहे.

लोकलमध्ये सुद्धा सकाळी सकाळी रटाळ हिंदी गाणी लावण्याचा छंद काही लोकल प्रवाश्यांना आहे. काय बोलणार त्यांना मग मी माझे लक्ष बाहेर पळणाऱ्या गाड्या, घरे, लोक याकडे केंद्रित करतो. त्यातली काही गाणी तर माझी पाठ झाली आहेत. ते आहे न ‘डू यु वान अ पार्टनर?’, ‘नो एन्ट्री’ यातली बरीच कडवी माझ्या तोंडपाठ झाली आहे. काल मतदानाला जाताना ‘नगर’ बस मध्ये देखील एकाने अजय देवगणच्या जुन्या चित्रपटातील काही लावली होती. ते आहे ना ‘तुमसे मिलने को दिल करता है’. असो आता अशी गाणी मी ऐकत नाही. गाणी छान आहेत पण मग सगळा भूतकाळाचा चित्रपट सुरु होतो. मध्यंतरी तर एकाने अल्ताफ राजाचे ते ‘तुम तो ठेहरे परदेसी’ लावलं. सुरु झाल्या झाल्या पळता भुई थोडी झाली. अकरावीत असताना तालुक्याच्या गावी जाण्यासाठी बस वेळेवर नसायच्या, मग खाजगी जीप बसच्या भाड्यात तालुक्याच्या गावाला जायच्या. मग त्यात बसले की सगळे चालक लोक आपली आवडती गाणी लावायचे. आता त्यावेळी तो मुक्याचा मार सहन करावा लागायचा. बर सगळेच चालक नेहमी ‘दर्दे दिल’ का असतात हे आज पर्यंतच न सुटलेलं कोडं आहे.

‘ती’ ची लग्नाची बातमी कळल्यावर मी देखील कंपनीत ‘तू प्यार है किसी ओर का, तुझे चाहता कोई ओर है’ हे गाण खूप वेळा हेडफोन लावून ऐकल. माझ्या बॉसला कशी काय शंका आली देव जाणे. कंपनीतून निघायच्या वेळी त्याने मला ‘तुझ आणि तुझ्या गर्लफ्रेंडच ठीक आहे न?’ अस विचारलं होत. त्यावेळेपासून हे दुखवट्याचे कार्यक्रम मी घरी एकटा असल्यावरच साजरे करतो. बाकी काहीही म्हणा आपल्या सध्यस्थितीवर आपली गाण्याची निवड अवलंबून असते. म्हणजे आपण गाण्यावरून एखाद्याचा मूड कसा आहे हे ओळखू शकतो. आता हे मी माझ्या अनुभवावरून सांगत आहे. मागील दोन – अडीच वर्षात जी गाणी ऐकली नाही ती गाणी मी आता ऐकत असतो. बाकी आपल्या स्वभावावरून आपल्याला गाण आवडते की नाही हा दुसरा भाग झाला. आज दुपारी रेडीओ मिरचीवर किशोर कुमारच ‘मेरी भिगी भिगीसी‘ हे गाण मी पूर्ण ऐकल. छान होत. तसं मी नवीन हिंदी मराठी चित्रपटातील गाणी ऐकतो.

ते ब्लू मधील ‘चीगी विगी’ देखील मस्त गाणे आहे. आमच्या गावात रोज पहाटे ग्रामपंचायतीत रेकॉड लावले जाते. देवाची जुनी मराठी गाणी लावतात. पण पहाटे पहाटे ऐकायचा खूपच छान वाटत . ‘नाम तुझे घेता देवा’, ‘विठू नामाचा रे’, ‘जेष्ठ तुझा पुत्र मला दे दशरथा’ यासारखी तसेच पंडित भीमसेन जोशींची गाणी तर काही विचारूच नका. ऐकून अख्खा दिवस उत्साही जातो. पण पुण्यात काही नाही. पुण्यात सगळंच उणे. गणेश विसर्जनाची मानाच्या गणपतींच्या मिरवणुका सोडल्या तर बाकी ‘पिलेल्यांच्याच मिरवणुका’ असतात. कोजागिरीला देखील तेच. कान फुटतील एवढा आवाज करून आणि दारू पिऊन कोणती मिरवणूक काढली जाते का?. सोडा तो काही आपला विषय नाही. बाकी गाणी अनेक ठिकाणची वातावरण बदलतात. अनेकांचे मूड बदलतात हे नक्की.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.