नगर जिल्हातील वांबोरी नावच गाव आहे. या शनिवारी सकाळी शिवाजीनगरहून नगर बस पकडली. ‘विनाथांब’ बस होती. सहाच प्रवासी बसमध्ये. एक चालक, एक वाहक पकडून आठ. व्ही.आय.पी असल्याप्रमाणे वाटत होत. पुणे नगर महामार्गाचे काम पूर्ण झालेले आहे. सव्वा दोन तासात नगरला. नगरहून ‘वांबोरी’ बस पकडली. घरी गेल्यावर नेहमी प्रमाणे ‘वीज’ नव्हती. संध्याकाळी माझ्या गावातील मित्रांसोबत बाहेर फिरायला गेलो. गाव लहान असेल तरी तीस हजाराची लोकवस्ती आहे. घरी पुन्हा येताना शिवसेना, भाजप, मनसे यांच्या नवीन पाट्या बघितल्या. गावात आजकाल राजकारण जोरात आहे. दरवर्षीप्रमाणे ‘रामायण’ या विषयावर सप्ताह चालू झालेला आहे. गाव जरा जास्तच धार्मिक आहे. माझे वडील आई आणि जवळपास संपूर्ण गावच संध्याकाळी सप्ताहात असते. रात्री वीज राहिल्याने मुळा प्रवरा वीज मंडळाचे उपकार मानले.
रोज पहाटे जुनी मराठी गाण्यांचे रेकोर्ड ग्रामपंचायतीच्या स्पीकरवरून लागते. त्यामुळे पहाटे पहाटे खुपच प्रसन्न वाटते. रविवारी सकाळी रोज प्रमाणे वीज गायब. मित्रांकडून गावातील अनेक वार्ता समजल्या. माझ्या काही मित्रांची नवी प्रेमप्रकरणे देखील समजली. आणि गल्लीतील सध्याचा सगळ्यांचा आवडता विषय ‘माझ लग्न’ देखील ऐकायला मिळाला. मला माझे मित्र विचारात होते की ‘कोणी आयटम पटवली का नाही?’. तस आमच गावाचा इतिहास खूप मोठा आहे. गावात वाम आणि बोरीच्या खूप झाडे होती म्हणून आमच्या गावाच्या नाव ‘वांबोरी’ पडलं. वाल्ह्या कोळी इथेच बसून तपस्या केली होती अस म्हणतात. नवनाथांच्या अनेक पुरावे असलेल ठिकाण आहे. गोरक्षनाथांनी केलेला सोन्याचा डोंगर इथेच आहे. त्या डोंगरावरती सध्याला एक शंकराचे मंदिर आहे. एक ग्रामपंचायत आहे. आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाची श्रीमंत ग्रामपंचायत आहे. दोन आंतरराष्ट्रीय कंपन्याच्या शाखा इथे आहेत. एक रेल्वे आणि बस स्थानक, एक मोठ धान्य मार्केट आहे.
माझ शालेय शिक्षण याच गावात झाल. इथ आमची थोडी शेतीही आहे. हा भाग दुष्काळी आहे. वीस वर्षांपासून इथे तीन दिवसाआड पाणी येते. आणि ते ही पाऊण तास. शेतीत चाळीस चिंचेची, वीस आवळ्याची झाडे आहेत. जर मी संगणक क्षेत्रात नसतो तर ‘शेतकरी’ नक्की झालो असतो. पण मी ठरवलं आहे. मी जेव्हा साठ वर्षांचा म्हातारा होईल त्यावेळी गावी जाऊन राहील. आणि शेती करील. नेहमी मला गावी गेल्यावर तिथून पुण्यात येण्याची इच्छाच होत नाही. अस वाटत सगळ सोडून तिथेच रहाव. सगळे किती चांगले आहेत. दुखाची गोष्ट अशी की खूप मोठ्या प्रमाणात इथ बेरोजगारी आहे. आणि अस नाही की ते प्रयत्न करत नाहीत. पण अजून अनेकांना नोकऱ्या नाहीत. गावातील एक चांगली गोष्ट आहे की इथ डांबरी रस्ते आणि विजेचे खांब आहेत. आणि त्या विजेच्या खांबावर ट्युब. दर सोमवारी गावाचा आठवड्याचा बाजार भरतो. शाळेत असताना दर सोमवारी आईने बाजारातून खरेदी केलेल्या फळभाज्यांनी भरलेली पिशवी मला उचलून घरी आणण्याचे जबाबदारी माझ्यावर असे. मी दहावीत असताना आमच्याकडे एक गावरान गाय होती.
एकदा गायीचे दुध देखील मी काढले होते. पण दुध काढून झाल्यावर गायीने त्या दुधाच्या भांड्याला लाथ मारली. सगळ दुध सांडून गेल. मग काय आठवडाभर आई वडील आणि माझा लहान भाऊ या विषयावरून मला हसत होते. एक छान कालवड म्हणजे वासरू देखील होत. पण नंतर चाऱ्याचा प्रश्न खूप वाढला. आणि गाईकडे लक्ष देण्याला कोणालाच वेळ मिळत नव्हता. मग गाय एका शेतकऱ्याला दान करून टाकली. गावात गेल अस सगळ जून आठवत आणि मग तिथच रहाव अस खूप वाटत. आणि इथ पुण्यात आल तरी दोन-तीन दिवस करमत नाही. खूप आठवण येते. पुण्यात पुन्हा येताना सारख परत जाव असंच वाटत होत. पण एक गोष्ट आहे की तिथ जाऊन आल की समाधान मिळत.