चर्चेखेरीज अन्य पर्याय नाही


आजोबांनी कालच आम्ही भांडू शकत नाहीत. आणि गप्पा मारणे याखेरीच काही पर्याय नाही अस स्पष्ट केल. आता सौदी अरेबियात आहेत. काही नाही थोडी हवा पालट. अस कस तीन दिवस सुट्टी नाही का? आजोबा २७ तारखेपासून एक मार्च पर्यंत आहेत तिथे. तिथल वातावरण चांगल आहे म्हणे. पण यावेळी आजोबा खूप वेळ भारतात होते. याआधी हवामानाच काही तरी चर्चा होती म्हणे त्या कोपनहेगनमध्ये. आता आपल्या इथलं उष्ण तापमानामुळे अस जाव लागत. दोन दिवस होते. सतरा आणि अठरा डिसेंबरला. पण तिथला हवामान बिघडलं म्हणून मग ते लवकर इथ आले. त्या आधी आपल्या जवळच्या रशियात गेले होते. सहा डिसेंबर ते आठ डिसेंबर. पण खुपच थंडी होती म्हणे तिथे. बर आजोबांचे वय काय आणि असा धावता प्रवास म्हटल्यावर दगदग होते. रोज काय केल हे आजोबा आजींना सांगतात हो. मग आजी म्हणाल तसचं बोलतात. आणि ह्या वयात काय आणि कसल्या गोष्टींची अपेक्षा करतात तुम्ही नातवंड? ते काही नाही, आजोबा शेजारच्यांनी भांडणार वगैरे काही नाही.

आठवडाभर म्हणजे २१ नोहेंबर ते २८ नोहेंबरमध्ये आजोबा अमेरिका,त्रिनिदाद आणि टोबागो मध्ये गेले होते. सफर चांगली झाली. आणि नवीन ठिकाणी गेल्यामुळे पर्यटनाचा अनुभव देखील चांगला आला. त्यांनी ‘व्हाईट हाउस’ हौसेने पाहिलं. आणि त्या हाउसमध्ये हे ब्लाक आजोबा काय सही मेचींग झाल सांगू. फोटो सेशन झाल. मग व्हाईट हाउसचा प्रिन्स आणि आजोबांनी दोघांनी मिळून तास दोन तास चांगल्या गप्पा मारल्या. आणि प्रिन्सने तयार केलेल निवेदनही आजोबांनी वाचल. मी देखील पाहिलं. किती छान दिसत होते आजोबा तिथे. तिथेच रहा आता अस मी त्यांना सांगणार होतो. तस नाही, पण आता वयाने त्यांना झेपतं आहे का म्हणून वाटल. नाही म्हणजे याआधी थायलंड २३ ते २५ आक्टोबर, आणि २४, २५ सप्टेंबरला अमेरिकेत होते. आता सारख प्रत्येक महिन्यात इथ आपल्या घरी यायचं आणि तिकडे जायचं. कशाला हेलपाटा? आणि त्याआधीही १३ ते १६ जुलैला आजोबांना धावपळ करत फ्रान्स आणि इजिप्तला जाव लागल. तिथून आले की महिन्याच्या आताच परत दुसऱ्या ठिकाणी. आता किती वेळ आजोबांना त्रास देणार आहोत. नातू म्हणून आपल काही कर्तव्य आहे की नाही? गुहागरच्या नातूसारख नाही हं. आणि भांडण करावं आणी ते पण आजोबांनीच करायला हव अस थोडीच आहे.

आजोबा गेले दौऱ्यावर आणि नातू बसले गौऱ्यावर अस कोणी म्हणायला नको. त्यामुळे आजोबांना सारख सारखं भांडण करा वगैरे नाही म्हणायचं. ते आपले दमून थकून येतात. आणि तुम्ही ‘महा गाई’ दुध देत नाही. चारा खात नाही. अस म्हणायचं नाही. आणि आजी इथे असली म्हणून काय झाल. बाबा आहे ना आपले. ते बघा हॉटेलात न राहता कुठल्या तरी झोपडीत रात्र काढतात. विमानाने येऊन लोकलने प्रवास करतात. फोटो काढण्यापुरती का असेना दोन घमेली उचलतात. आता मुंबईत शेजारी घुसले त्यावेळी बाबा हॉटेलातील गरीब लोकांच्या आनंदासाठी पार्टी देत होते. किती कामात असतात बाबा. आणि नातू उगाचंच आजोबा, आजींना आणि कधी कधी बाबाला नावे ठेवतात. आता आजोबा फिरण्याचे काम महिन्यातून एकदा नित्य नियमाने करतात ना. मग झाले. त्यांना आता ते पुण्यातल्या आणि इतर ठिकाणी होणाऱ्या गोष्टींची माहिती मिळाली तरी भांडणाला वेळ कधी आणि कसा मिळणार? म्हणून मग शेवटी आजोबांनीच सांगून टाकले ‘चर्चेखेरीज’ अन्य पर्याय नाही.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.