‘चा’राणे


चित्रपटाची सुरवात ‘नारी नारीsss नारी नेंदू नेनु! नारी नारी अल्बी इगा रानूss’ गाण्याने होते. आणि चित्रपटाच्या नायकाच्या वडिलांची एंट्री पत्रकार परिषदेत होते. नायकाचे वडील ‘बा’राणे बोलायला सुरवात करतात. ‘सिवशेनेत पैसे घेऊन तिकीट दिले जाते’. पत्रकारांचा एकच गलका होतो. मध्येच कोणीतरी ‘बसमध्ये देखील पैसे दिल्याशिवाय तिकीट मिळत नाही’ ओरडते. ‘बा’राणे मोठे डोळे अजून मोठे करीत खेकसतो ‘माले तू खुळा की काय?’. आणि पुढे काही बोलण्या ऐवजी शिव्याची लाखोली व्हायला सुरवात केली. पुढे चित्रपट वेग घ्यायला सुरवात करतो. ‘बा’राणे अनेक खस्ता खात, आणि इटालियन शिव्या खाऊन मंत्रीपद मिळवतो. आपल्या पक्षाची संस्कृती जपत आपल्या मुलाला म्हणजे ‘आठाणे’ला खासदार करतो.

तिकडे ‘बा’राणेचे प्रतिरूप राजकारणात एंट्री करायला उतावीळ झाला असतो. आणि तो क्षण येतो. पक्षाच्या युवा ब्रिगेडमध्ये त्याला घेतले जाते. पण तिथे त्याला थांबायचे नसते. त्याला अध्यक्ष व्हायचे असते. पण त्याला तिथे कुणीच भाव देत नाही. आणि मग हा सरळ मुख्य कार्यालयात शिरून तोडफोड सुरु करतो. कुणीतरी ओरडते ‘कोण रे तू?’ अस म्हणताच चित्रपटाचा नायक मागे वळून पाहतो. आता हा शॉट तीनदा दाखवतात ही गोष्ट वेगळी. आणि त्या पदाधिकाऱ्याची गचांडी पकडून ‘माका तू ओळखत नाहीस?’. तो अधिकारी घाबरून ‘नाही’. एक जोरदार ठोसा देऊन सहनायक बोलतो हे ‘किंग कॉंग ऑफ कोकण’.. नायक पांढरा शर्ट झटकत मी ‘चा’राणे. आणि त्या सर्व लोकांना खडसावत बोलतो ‘याद राखा, पुन्हा हा प्रश्न कोणी विचारला तर’. आणि तिथून निघून जातो. जाताच सर्व न्यूज चॅनेलवर सकाळ दुपार आणि संध्याकाळ अस तीनही वेळेस तीच ‘ब्रेकिंग न्यूज’. गाडीतून जातांना नायक ‘नायक नही खलनायक हू में’.. हे गाणे म्हणत जातो.

‘बा’राणे वैतागून ‘चा’राणे ला एक ‘दुराभिमान’ नावाची संघटना काढून देतो. आणि त्याला त्याचा अध्यक्ष बनवतो. नायक भाषणाला सुरवात करतो. ‘तुम्ही काय काळजी करू नका. आता आपल्याकडे सगळ् आहे. सत्ता आहे. पैका आहे. पघा, आता तुम्हाला कोण बी अडवत नाय’. हे शब्द कानी पडताच ‘बा’राणेच्या डोळ्यात आनंद आश्रू येतात. त्याला त्याच्या इतिहासाची आठवण होते. संघटनेच्या उदघाटनानंतर ‘चा’राणे आपल्या मोठ्या ताफ्यासह निघतो. जातांना एका ठिकाणी एका वाहनाची आणि त्याच्या ताफ्यातील एका गाडीची टक्कर होते. पण गाडीला धक्का का दिला म्हणून ‘चा’राणे त्या गाडीवाल्याला खूप धोपटतो. अगदी दबंग मधील सलमान स्टाईल. पण त्यावर काहीच कारवाई होत नाही. नायक ‘चा’राणे मुंबईत दाखल होतो. तिथे पाणीप्रश्नावर मोठा मोर्चा काढतो. पोलीस लाठीमार करतांना दुर्दैवाने एकाचा मृत्यू होतो. त्याचाही उपयोग हा स्वतःच्या प्रसिद्धीसाठी करून घेतो. पण कुणीच त्याच्या पाठीशी उभा रहात नाही. मग हा मुंबईतील बिल्डर लोकांशी आपले ‘प्रेमळ’ संबंध निर्माण करतो. ‘बा’राणे तर्फे पक्षाच्या युवराजला ‘चा’राणेचा विचार करावा असे विनंतीचे खलिते पाठवले जाते. परंतु युवराज ‘कोण हा छाराणे?’. असे प्रत्युतर येते.

‘चा’राणे अजूनच चिडतो. आणि आपल्या कृत्यांची फ्रिक्वेंसी वाढवतो. पण तरीही कोणी प्रसिद्धी आणि पद द्यायला तयार नसते. एकदा मुंबईत एक ‘बा’राणे चा एक जुना दोस्त ‘बा’राणेला सोडून चाललेला कळताच चा’राणे’ तिथे थडकून त्याच्या कार्यालयाची मोडतोड करतो. त्याचा राग इतका अनावर झाला असतो की, दिसेल त्याला मारत सुटतो. एक मुलगा असंच बाजूने बाईकवर चाललेला असतो, त्यालाही थांबवून त्याचे डोके फोडतो. पण पुढे काहीच कारवाई होत नाही. पत्रकारांनी विचारले असता नायक ‘बा’राणेंचा अपमान सहन केला जाणार नाही अस सांगतो. पण ह्यावेळी देखील पक्ष त्याला अध्यक्ष पद देत नाही. मग हा नवीन प्लान करतो. आपल्या दुराभिमानी लोकांकडून आता यावेळी युवा ब्रिगेडचा अध्यक्ष ‘चा’राणेच होणार अशा अफवा उठवायला सुरवात करतात. पण तरीही काहीच मिळत नाही. पुन्हा ‘चा’राणे मुंबईत येतो. तिथे सगळीकडे वासी होवून आलेला, त्याच्याच संघटनेचा एक ‘चिंटू’ भेटतो. चिंटू असून देखील आपले कुकृत्य जरा कमी कर असा सल्ला ‘चा’राणेला द्यायला सुरवात करतो. ‘चा’राणे चिडतो. आणि आपल्या खिशातील बंदूक काढून त्याच्या मागे लागतो. आणि धावपळ सुरु होते. चिंटू मार खात असतो. धावत असतो. बॅकग्राउंड सॉंग सुरु होते ‘बचके तू रहेना रे.. काही तुझे मौका मिलेगा संभलनां..’. पुढचा सीन सेन्सॉरने कापला आहे. आणि शेवटी पोलीस आणि न्यूज चॅनेलवाल्यांसमोर चिंटू बोलत असतो ‘खल्लास!!!’.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.