चिंता नव्हे चिता


चिंता चिताच आहे. अडचणी येतात व जातात. एक अडचण संपते तर दुसरी डोके वर काढते. त्यामुळे त्यांची चिंता का करावी?. का वेळचा घडा खर्च करावा. त्या अडचणी येणार आणि जाणार देखील. त्यामुळे चिंता करणे पहिल्यांदा सोडा.

आधी मी प्रत्येक गोष्टीला अनेक पर्याय ठेवायचो. एक पर्याय अयशस्वी तर दुसरा तयार. मग एक घटना घडली. तीन-चार वर्षांपूर्वीची गोष्ट. त्यावेळी ज्या कंपनीत काम करायचो. तिथे महिन्याच्या शेवटी राजीनामा दिला. कंपनीच्या नियमाप्रमाणे दोन महिन्यांचा नोटीस. त्या महिन्याचा पगार अडकला. तो व पुढील महिना कसाबसा ढकलला. पुढील महिन्याच्या शेवटच्या दिवशी खिशात शंभराची नोट. त्यावेळी दैनंदिन खर्चच शंभर रुपये व्हायचा. दुसऱ्या दिवशी गाडीच्या पेट्रोलला देखील शंभराची नोट लागणार. खरं सांगायचं तर दडपण आलेलं. त्यात उधार नावाच्या गोष्टीशी शत्रुत्व.

कस करावं तेच समजेना. एकतर घरखर्च भागवला जाऊ शकणार नाहीतर गाडीचं पेट्रोल. घरी आल्यावर आमच्या दोन चिमुकल्या बाहेर चक्कर मारण्यासाठी मागे लागल्या. शेवटी त्यांना घेऊन शेजारच्या मंदिरात गेलो. एक धावायची अन दुसरी रांगायची. त्यांना पाहून मंदिरातील जेष्ठ श्रेष्ठ खुश.

त्यांना पाहून सहजच मनात विचार डोकावला. ह्या चिमुकल्यांना दुसऱ्याच्या मर्जीवर विसंबून राहावे लागते. तरीही त्या आनंदात. मग आपण चिंता का करतोय. तो क्षण नंतर आजवर कोणत्याही गोष्टीचे दडपण आले नाही.

चिंता नसलेल्या अनेक गोष्टी निर्माण करते. सर्वात महत्वाचे शरीर स्वास्थ्य बिघडवते. चिंता रोगांना आमंत्रणच. आपणच आपले वैरी बनतो. सोप्या वाटणाऱ्या गोष्टी अवघड होतात. बरं त्या परिस्थितीत तसूभर फरक पडत नाही. मग काय उपयोग अशा गोष्टीचा?.

त्यामुळे चिंता सोडा. स्वतला यातून बाहेर काढा. शांत मन सुदृढ शरीर अनेक प्रश्न सोडवू शकते. त्रास वाचेल. अडचणींपेक्षा आपण महत्वाचे. तणाव अडचणीत वाढ करतो. त्या चिता रचतात.

प्रश्नावर फार तर पाच मिनिटे विचार करा. त्यापुढे, विषयांतर करा. हव तर थोड्या वेळाने पुन्हा प्रश्नाकडे पहा. काहीना काही पर्याय जरूर मिळेल. हे सर्व अनुभव घेऊन सांगतोय. तुम्ही करून तर पहा. मला खात्री आहे बदल नक्कीच जाणवेल.

, ,

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.