चिंब पावसानं


काल दुपारीपासूनच पावसानं पुणे झोडपायला सुरवात केली आहे. काल सकाळी सकाळी आकुर्डी स्टेशनवर जात असताना एका दुधाच्या गाडीचा झालेला अपघात बघितला. आता ड्रायव्हर जागीच ठार झाला. अपघात परवा रात्री झाला असावा. आता मी ज्यावेळी पाहिलं त्यावेळी मोडलेली गाडी पाहायला मिळाली. स्टेशनवर आलो तर कोल्हापूर एक्स्प्रेस थांबलेली. लोकलमध्ये चढलो तर चिंचवडला ‘प्रगती’ आणि ‘डेक्कन’ एक्स्प्रेस उभ्या. मग लोकलमध्ये समजलं की देहूरोडला एका मुलीला एक्स्प्रेसने उडविले म्हणून. आजकाल अपघात काही नवीन गोष्ट राहिली नाही माझ्यासाठी. महिन्यातून एक – दोन हमखास पाहायला मिळतात.

संध्याकाळी कंपनीतून निघालो तर पावसानं गाठल. ह्यावेळी मनावर ताबा ठेवला. नेहमीप्रमाणे गेटवर उभा राहण्याचा मोह टाळला. आणि पावसात ओलेचिंब भिजण्याचा सुद्धा. तसा पाऊस आला की जुन्या आठवणी येतात. मला खर तर पावसात भिजायला खूप आवडत. पुण्यातील सगळेच पावसाला का घाबरतात तेच कळत नाही. मग रेनकोट काय, जर्किन काय अशी खूप नाटके. शाळेत हे सगळेच पावसा पावसा ये ये म्हटले असतील. पण शाळेतच बहुतेक संपल. पुणेस्टेशनवरून ज्यावेळी लोकल निघाली त्यावेळी मी शंकर महादेवनचे ‘चिंब भिजलेले रूप सजलेले‘ हे गाण ऐकत होतो. अगदी असं वातावरण बघून नाचावास वाटत होत. आकाशात ढगांचा कडकडात, जोरदार आणि दमदार पाऊस. आणि त्यात हे गाण. वा मन खूप प्रफुल्लीत झालं होत. हे पुण्यातील सगळे गेटवीर ना भित्रे भागुबाई आहे. पाऊस आला म्हटलं की, पळाले आत. आता आई नाही म्हणून मी यावेळी स्वतावर ताबा ठेवला. एकतर परवाच कपडे धुतलेले आहेत. आणि दोन दिवस ते कपडे वापरायचे आहेत. म्हणून गेटवर उभा राहण्याचा मोह टाळला.

आकुर्डी स्टेशनवर उतरलो. तर पाउसाचा जोर कायम. मग काय प्रवेशाद्वारामध्ये उभा होतो गाणी ऐकत. शेजारी एक छानशी मुलगी देखील होती. प्रत्येकाचे कोणी ना कोणी दुचाक्या घेऊन येत होते. अनेकांनी आपआपल्या छत्र्या काढून जात होते. माझ्यासारखे देखील होते, पाऊस जोर कमी होण्याची वाट पाहणारे. बराच वेळ उभा होतो मी तिथे. पण पाउसाचा जोर काही कमी झाला नाही. शेवटी म्हटलं आता घरी जाण्याआधी काकाकडे जेवण कराव मगच जाव. बस पकडून काकाकडे गेलो. जेवण झाल्यावर पाऊस थांबलेला नव्हता. काका तर मुक्कामच कर म्हणत होता. पण नको म्हटलं. तसाच पावसात निघालो. पण जस जस पावसाच पाणी अंगावर पडायला लागल तसं तसं पावसात नाचव असं वाटायला लागल होत. शेवटी पावसात मनसोक्त भिजलोच. लहानपणी मी आणि माझा लहान भाऊ आम्ही दोघेही आईला नवीन नवीन कारण सांगून पावसात भिजायचो. वडील असले तर मग काही विचारूच नका. मज्जाच मज्जा. कधी पावसाने ड्रेनेजचा पाईप उघडा पडायचा. मग मी आणि माझा लहान भाऊ पाईपवर माती टाकायला चाललो असं सांगून पावसात भिजायचो. तर कधी गच्चीतले कपडे काढून आणतो, तर कधी घरात शिरलेले पाणी काढण्यासाठी. अशी अनेक कारण काढून मी पावसात भिजायचो. शाळेत जाताना देखील कधी छत्री घेऊन जात नसायचो. पण कधी आतापर्यंत आजारी पडलो नाही भिजलो म्हणून. पावसात पुणे अगदी पाहण्यासारखे झालेले असते. रस्त्यावर पडणारे टपोरे टपोरे थेंब. रस्त्यावरच्या पथ दिव्यात पावसात पहिले तर हजारो थेंबांचा होणारा वर्षाव स्पष्टपणे दिसतो. पुलावरून पाऊस पाहण्याची मजा काही औरच. धरण कधी बघितलीत तर वरतून पाऊस आणि खाली धो धो वाहणारे पाणी किती छान संगम असतो.

मला आत असं वाटतय मी फार पुस्तकी बोलतोय. पण शाळेत असताना पावसाच वर्णन किंवा त्यावरील लेख वाचताना एक रुक्षपणा जाणवायचा. पावसात भिजण म्हणजे, अगदी फिल्टर पाण्यात भिजण्यासारख आहे. असं शुद्ध पाणी विकत सुद्धा भेटणार नाही. सोडा, तुम्ही एकदा भिजून तर बघा किती मज्जा येते ते पहा तर. पण रेनकोट किंवा छत्री घेऊन मजा कमी करू नका. मी माझ्या अनेक मित्रांना पावसात भिजायला सांगतो पण हे भित्रे जणू काय आकाशातून एसिड पडत आहे असा आव आणतात. एकदा माझ्या एका मैत्रिणीने पाऊस आला म्हणून तिची लहानशी छत्री काढली. तिला म्हटलं की तू ती तुझ्यापुरातीच ठेव. पण बाईसाहेबाना मदतीची फार आवड. माझ्या बरोबर शेअर केली. मग काय बस स्थानकात जाण्यापर्यंत माझी उजवी आणि तिची डावी बाजू पूर्णपणे भिजून गेली होती. अशा अनेक आठवणी आहेत. पाऊस म्हणजे निसर्गाचा आनंदाचा तांडवच असतो. पण का कुणास ठाऊक सगळे काळ्या छत्र्या दाखवून पावसाचा निषेध नोंदवतात?


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.