चिल्लर पार्टी


संध्याकाळी घरी येताना रस्त्याच्या बाजूला एक बाई उभी होती. तिने एका छोट्याशा बाळाला बरोबर घेतलं होत. ते बाळ बहुतेक नवीनच चालायला शिकलं होत. अगदी मस्त, ‘गोर गोर पान फुलासारखं छान’. त्याची आई त्याला विचारात होती ‘कुठे जायचं?’. मी त्याला बघत चाललो होतो. त्याने माझ्याकडे बोट केले. बघून खूप हसू आले. मध्यंतरी मी माझ्या मोठ्या बहिणीकडे गेलो होतो. आता तिचा मुलगा तीन वर्षाचा. पण त्याच्या वर्तनाने वाटणार नाही. त्याने मला त्याच्या खोलीतील संगणक कसा चालू करायचा ते सांगितले. नंतर गेमची सीडी कशी टाकायची आणि त्याचे ते रंग भरण्याचे खेळ कसे खेळायचे हे दाखवले. बर त्याच असं, मी एक गेम खेळणार आणि मग तू एक गेम खेळायलाच हवा. मग काय ते रंग भरण्याचे खेळ मलाही त्याने खेळायला लावले.

दुसऱ्या बहिणीची मुले तर काही विचारूच नका. दोन टोक आहेत. तिला एक मुलगी आणि एक मुलगा. मुलगी ज्युनिअर केजीमध्ये आहे. आणि तिचा तो लहान भाऊ घरी दंगामस्ती हेच त्याचे काम. एकदा आम्ही सगळे बागेत चाललो होतो. आता बहिणीच्या लहान मुलाला अजून काही बोलता येत नाही. पण माझ्या कडेवर बसून साहेबांनी रस्त्यात ‘दंद’, ‘दुक’, ‘आणि’, ‘बाप्पा’, ‘गाई’ असे बरेच काही बोटे करून सांगितले. सुरवातीला काही मला कळले नाही. पण नंतर त्याने केलेल्या बोटाच्या दिशेकडे बघितल्यावर समजले. आता बंदच त्याने ‘दंद’, दुकानाचे ‘दुक’, गाडीचे ‘गाई’, पाणीचे ‘आणि’ . त्याची भाषा आणि आवाज बाकी खूपच छान. एका दुकानं समोर गेल्यावर मोठ मोठ्याने ओरडायला लागला. डोळे मोठे केले. त्याला खूप आनंद झाला की तो असा करतो. मी त्याला ‘काय?’ म्हणून विचारलं तर त्याने दुकानाकडे बोट केल. बघतो तर, वोडाफोनचे ‘झुझू’चे एक मोठे पोस्टर लावले होते. ते बघून मला हसू फुटले.बाकी ह्या दोघींचे हे तीन चिल्लर असले की मग काय विचारू नका. दंगामस्ती. त्यादिवशी मी घरी जातो म्हटलं तर ते तिघेही जाऊ देईनात. मग मला त्यांनी त्यांच्या डॉक्टर डॉक्टर खेळात घेतले. पण त्या तिघात कोणीच पेशंट व्हायला तयार होईना. मग मला केल पेशंट. प्रत्येकाने त्यांच्याकडे असलेल्या डॉक्टरच्या बॉक्समधून विविध साहित्यांनी मला तपासलं. त्यांना विचारलं काय झाल तर एक म्हणाला तुला ताप आला आहे. दुसरा तुला सर्दी झाली आहे. आणि तिसरी तर वेगळंच.

एकदा रविवारी मी दुपारच्या वेळी घरी येत होतो. घराच्या जवळच एक गणपतीच मंदिर आहे. त्या मंदिराच्या आत एक पाच सहा लहान लहान मुली होत्या. बहुतेक सगळ्या दुसरी तिसरीला असतील. त्यातली एक इतर मुलींना म्हणत होती की ‘ह्या समोर बसलेल्या सगळ्या मुलांना मी मारू शकते’. मंदिराच्या समोर पाचवी-सहावीत असतील अशी दहा-एक मुले बसलेली होती. पाहून मला खूपच हसू येत होते. त्यांच्या गप्पा तर वेगळ्या रंगलेल्या. बाकी आमच्या भागात ही चिल्लर पार्टी बाकी जोरात आहे. रोज सकाळी मी कंपनीत जायला निघतो. त्यावेळी पाठीवर शाळेची दप्तर घेऊन आणि तोंडाला मास्क लावून ही बच्चे कंपनी आपापल्या आई वडिलांबरोबर मजेत चालत चाललेली असतात. एकदा पाऊस पडून गेला होता. मी रस्त्यातील साचलेल्या पाण्यातून वाट काढत चाललो असताना एक रेनकोट घालून आपले दोन्ही हात लांब करून ‘ऑ’ अशी ओरडत चाललेल्या लहान मुलीकडे बघून खूपच विशेष वाटले. तिचे वडील तिचा एक हात पकडून तीला ‘अस रस्त्यात करायचं नाही’ अस सांगत होते. तिच्या वडिलांनी माझ्याकडे बघितले. आम्ही दोघेही एकमेकांकडे पाहून हसलो.

बाकी चिल्लर पार्टी खूप मजेशीर आहे. रोज संध्याकाळी मी जेव्हा घरी येत असतो त्यावेळी कोणी सायकल तर कोणी चेंडू घेऊन काही न काही खेळ चालू असतात. आणि कधी कधी भांडण देखील पाहायला मिळतात. पण भांडण ही मजेशीर असतात. ह्या रविवारच्या दिवशी दुपारच्या जेवणानंतर मी घरी येत असताना काही मुल मुली सायकल खेळत होते. आणि त्यातील सगळ्यात मोठ्या मुलीचा भाऊ त्यातील एका मुलाकडे बोट दाखवून तिला ओरडून सांगत होता कि ‘ह्याला स्वाइन फ्लू झाला आहे’.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.