चीड


मी शाळेत असतांना मला शाळेतील मित्र खूप चिडवायचे. अगदी दहावी पर्यंत. आणि मी चिडून देखील जायचो. मला ‘आठल्या पिठल्या’ म्हणायचे. आता हसू येत. पण त्यावेळी खूप राग यायचा. चौथी पर्यंत मी मग कोणी चिडवले की त्यांच्याशी भांडायचो. म्हणजे हाणामारी. तोंडाने काहीच नाही बोलायचो. आणि मग मी रडत आणि ते हसत घरी यायचो. अस चौथी पर्यंत चालले. मग वडिलांनी ‘कोणी चिडवले की त्याला मारायचे. पण त्याने एक ठोसा मारला की त्याला दोन ठोसे द्यायचे’ अस सांगितले.

मग काय पाचवीत माझी शाळेत नवीन चीड ‘हेमामालिनी’. मग मी चिडवणांर्याशी नेहमीप्रमाणे हाणामारी. मग त्यावेळी त्यानी मारलेल्या फटक्यापेक्षा मोजून त्याला दुप्पट फटके मारायचो. मग तो आणि मी दोघेही रडायचो. त्यावेळी आई म्हणायची ‘तुझ्यात सहनशक्ती नाही’. खर आहे. फक्त एवढे होते की, मी घरी कधीच भांडाभांडी जावू देत नसायचो. मग एक आठवीत मित्र भेटला. त्यावेळी शाळेत शिक्षकांची मुलांना ‘ग्ल्यामार’ होत. म्हणजे ते कायम चांगल्याच मार्कांनी पास व्हायचे. तो भेटलेला मित्र देखील शिक्षकांचा मुलगा. मग त्याने मला आयडिया दिली. मला म्हटला कोणी चिडवले की लगेचंच भांडायचे नाही. सुरवातीला मला त्याला काय म्हणायचे समजले नाही. पण तो हुशारच म्हणा. त्याने समजावले. मला म्हटला ‘बघ, त्यांनाही आपण चिडवायचे’. त्याला ‘कसं?’ विचारल्यावर तो बोलला ‘चीड म्हणजे काय? आपण जे ऐकल्यावर चिडतो, ती म्हणजे चीड’. मग पुढे बोलला ‘काहीही बोल त्यांना, चिडले की झाली त्यांची चीड’. कारण त्यावेळी अनेकांना चीड नव्हतीच. म्हणजे त्यावेळी हुशार मुलांना चीड नावाचा प्रकारच नव्हता. मी आपला साधारण. त्यामुळे मला होती ‘चीड’ पडलेली.

मग काय केले सुरु. एक कोटस्थाने नावाचा एक हुशार मित्र. रोज मला क्लासच्या वेळी ‘हेमामालिनी’ अस चिडवायचा. मग तो पहिला होता ज्याच्या ‘चीड’ चे पहिले बारसे केले. सुरवातीला त्याच्या नावावरून चिडवून पहिले. पण तो चिडेनाच. मग त्याला ‘कोट्या लोट्या’ म्हटलो. मग गडी जाम चिडला. माझ्याशी बोलायचंच बंद केल त्याने. मग मला पुन्हा कधी त्याने चिडवले की मी सुद्धा चिडवायचो. आणि मग तो चिडून शांत व्हायचा. दुसरा एक ‘तांदळे’ आडनावाचा. तोही नेहमी मला वर्गात आलो की चिडवायचा. मग त्याला त्याच्या नावावरून, आडनावावरून खुपदा चिडवून पहिले. पण तो देखील चिडेना. त्याला ‘भात’ म्हणून पहिले. तरीही तो चिडला नाही. मग शेवटी असंच बोलता बोलता ‘शिजवू का?’ अस म्हटले. मग गडी लगेच चिडला. मग काय जे धडाका सुरु केला. सगळ्यांच्याच ‘चिडा’ पडून टाकल्या. ‘भराडिया’ नावाच्या मुलाला ‘भराडी…या’, ‘गोसावी’ नावाच्या मुलाला कुष्ठरोगी असलेल्या व्यक्तीचे हात कसा असतो, किंवा भिकारी भीक मागतांना जसा हात करतात तसा हात करून ‘दे ग माये’ म्हणायचो.

नवले नावाच्या मुलाला ‘नऊ आले’. अजून एक होती ‘पावले’. रुपेश नावाच्या मुलाला ‘रुपया’. कदम म्हणून एक जण होता त्याला ‘कदम कदम बढाये जा.’ नाहीतर ‘आहे का दम’. चव्हाण म्हणू एक होता. त्याला ‘वहाण’. कोल्हे नावाच्या ला ‘कुईईss’. लवांडे नावाचा एक जण होता. त्याची तर खूप मजा यायची. त्याला मी ‘प्रेमाचे अंडे’ म्हणायचो. खूप फेमस झाली होती ही चीड. बंग म्हणून एक होता त्याला ‘भंग’. ससे म्हणून एक होता. त्याला ‘असे कसे ससे??’ अस म्हणायचो. मजा यायची. मग मला चिडवायचे कमी झाले. धनवडे म्हणू एक होता. त्याला मी ‘धनाजीराव वडे’. एक बाळकृष्ण म्हणून होता. पण त्याची चीड मी नाही पाडली. पण ‘बाळ्या टाळ्या शेंबुड गाळ्या, शेंबडाची केली आमटी, बाळ्याची बायको भामटी’ अस चिडवायचो. डुकरे आडनावाचा एक होता. त्याला ‘पिल्लू’  म्हणायचो. ‘पवार’ला कधी ‘पॉवर’ तर कधी ‘गवार’ म्हणायचो. बिचाऱ्याने एकदा गवारच्या शेंगांची भाजी आणली. आणि त्याला सर्वांनीच इतकं चिडवल की, त्याने पुन्हा ती भाजी कधीच नाही आणली. मलाही लहानपणी पिठलं आवडत नव्हते. कारण मलाही सर्व त्यावरच तर चिडवायचे ना! मी अगदी बारावी पर्यंत कधी पिठल्याला हात लावला नाही. अरे हो, ज्याने मला चीड पाडायची आयडीया दिली ना! त्यानेही दहावीत एकदा चिडवले होते. मग त्याचे नाव पटारे मग त्याला ‘गटारे’ नावाची चीड पाडली होती.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.