चुकीचा नंबर


सकाळी सकाळी कंपनीत माझ्या नावाचा फोन आला. कोण आहे म्हणून उचलला तर ‘हेमंत’ मी ‘हो’ म्हणालो तर तिकडून ‘सॉरी’ अस म्हणून फोन कट झाला. परवा देखील असंच. दुपारी फोन आला. आणि माझ्या मित्राने मला दिला. मी फोन उचलला, बहुतेक आजचीच व्यक्ती त्यावेळी ‘आपण मिटींग सुरु करूयात?’ मी माझ्या मित्राकडे बघून कोण आहे असा प्रश्नार्थक चेहरा केला तर त्याने ‘तुझ्याच ग्रुप मधील आहे’ अस म्हणाला. मी ‘बर’ अस म्हटलो. तर पुन्हा तिकडची व्यक्ती ‘काही क्षणासाठी थांब’ अस म्हणाला. मी आपला ‘ठीक आहे’ म्हणून थांबलो. मग विचार केला मिटींगसाठी वही घ्यावी. म्हणून फोन न बंद करता ठेवला आणि माझ्या मेजवरील वही आणली. पुन्हा फोन उचलला तर फोन कट झालेला. मग कळेना फोन कोणी केला होता ते. एक तर त्या आमच्या कंपनीतील फोनवर भलतेच आवाज येतात. कधी कधी ओळखीचा सुद्धा कळत नाही. मग त्या माझ्या मित्राला पुन्हा विचारलं तर त्याने पुन्हा तेच उत्तर दिल. मग काय करावं म्हणून माझ्या त्या सिनिअरला विचारलं तर ती बोलली ‘आज आपली कोणतीही मिटींग नाही’. तिला विचारलं की ‘टीम लीडरने केला असेल का?’ तिने नाही म्हटल्यावर मी माझ्या इथल्या सिनिअराला विचारलं तर ती देखील ‘नाही’ असंच म्हणाली. मग काय जेवतांना देखील फोन कोणाचा असेल अस विचार करत बसलो पण काही उत्तर सापडलं नाही.

मागील एका महिन्यांपासून जवळपास ही पाचवी घटना आहे. तीनदा मोबाईलवर आणि दोनदा कंपनीच्या फोनवर. दोन आठवड्यापूर्वी मोबाईलची रिंग वाजली म्हणून उचलला तर तिकडची व्यक्ती ‘सचिन आहे का?’ मी म्हणालो ‘नाही’. तर तिकडची व्यक्ती ‘तुम्ही कोण बोलत आहात?’ मी म्हणालो ‘हेमंत’. तर तिकडची व्यक्ती ‘हा सचिनचा नंबर आहे ना!’. मी त्याला ‘नंबर चुकीचा आहे’ अस म्हणून फोन कट केला. एक तर मागील काही महिन्यांपासून खुपंच कमी फोन येतात. आणि जे काही येतात त्यातले जवळपास निम्मे एक तर ते पॉलिसीवाले नाही तर हे असे ‘चुकीचे नंबर’ वाले. तीन दिवसांपूर्वी असंच मला फोन आलेला कळलंच नाही. म्हणून त्या नंबरला पुन्हा कॉल केला. त्याने तिकडून फोन उचलल्यावर मी म्हणालो ‘मला या नंबरवरून फोन आला होता, कोण बोलत आहे?’. तर तिकडून ‘तुम्हाला कोण पाहिजे?’ असा उलट प्रश्न. काय बोलाव आता. मी त्याला पुन्हा मला या नंबर वरून फोन आला होता म्हणून मी कॉल केला होता. तर तिकडून तोच उलट प्रश्न. मग शेवटी वैतागून तो फोन कट केला.

माझ्या मैत्रिणीची तऱ्हा काही विचारू नका. दर वेळी नवीन क्रमांकाने मला फोन करते. बर बाईसाहेबांचा आवाजावरून मी तिला ओळखतो. आणि नेहमी आलेला फोन नंबर तीच्या नावे सेव्ह केला की, पुढच्या वेळी परत नवीन नंबर. तीच्या वाढदिवसाच्या दिवशी माझ्याकडे जितके तिचे नंबर होते. तितक्या क्रमांकांना मी ‘वाढदिवसाच्या शुभेच्छां’चा मेसेज पाठवला. मग तिचा सर्वात जुन्या क्रमांकावरून मला फोन आला. उचलला आणि बोल म्हणालो तर तिकडून कोणी तरी मुलाचा आवाज. मला ‘कोण बोलत आहे?’ अस विचारलं. मला वाटल तिचा मोठा भाऊ असेल म्हणून मी त्याला ‘हेमंत’ अस उत्तर दिल. तर साहेब मला म्हणाले ‘हे असले मेसेज का पाठवता?’ मी त्याला काही सांगेपर्यंत साहेबांचा फोन कट. नंतर जेव्हा या बाईसाहेबांचा फोन आला त्यावेळी विचारलं तर बाईसाहेब हसू लागल्या. काय झालं म्हणून विचारलं तर मग तीन सांगितलं की तो फोन नंबर तिने कधीच बंद केला आहे. पण त्या नंबरच्या मोबाईल कंपनीने तो नंबर दुसऱ्या कोणाला तरी मुलाला दिला आहे. आणि चे नवीन नंबर तीच्या कोणत्याच मित्र मैत्रिणीकडे नाहीत. मग सगळे हीचे मित्र मैत्रिणी सारखे त्या बिचाऱ्याला फोन करतात.

खर तर यात त्या बिचाऱ्याची चुकी नाही. त्या मोबाईल कंपनीने तो नंबर कोणाला द्यायला नको होता. ती सांगत होती तीच्या एका मैत्रिणीने त्याला रात्री तीन वाजता फोन केला होता. हे अस सांगितल्यावर माझी हसून हसून पोट दुखायची पाळी आली होती. आणि हे तर काहीच नाही. ती म्हणत होती की तिनेही त्याच जुन्या नंबरवर कॉईन बॉक्सवरून त्याला फोन करून कोणाचे फोन आले होते का अस विचारलं होत…


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.