चूक करू नका


सगळ खरच खोट असत. आणि सगळ एकतर्फी असते. खूपच जास्त बेकार वाटत आहे. सगळीच नुसती घुसमट असते. आनंद आणि त्रास हा फक्त आपल्याला असतो. आपल्याला आवडणार्या व्यक्तीला कधीच काहीच जाणवत नाही. आपण वहात जातो. व्यक्तीत आपण बुडून जातो. ती व्यक्ती न कधी आपला द्वेष करते आणि ना कधी प्रेम. आपणच आपले मनाचे डोंगर रचत जातो. हळू हळू डोंगर मोठे होत जातात. आपण त्याच्या ओझ्यात दबून जातो. ती व्यक्ती समोर आली की, आपण आनंदी होतो. ती दोन शब्द बोलली की आपल्याला गगन ठेंगणे वाटायला लागते. कुठून तरी एक शक्ती, आपल्याला त्या व्यक्तीबद्दल आकर्षित करीत राहते. आपण इतके बुडून जातो की, स्वप्न आणि वास्तव यातील फरकच आपण विसरून जातो.

व्यक्ती मुळातच इतकी गोड असते की, त्या व्यक्तीला पाहून आपण देहभान विसरून जातो. अगदी एखाद्या भक्ताप्रमाणे तिची भक्ती करू लागतो. प्रत्येक श्वास त्या व्यक्तीसाठी बनतो. झोपता उठता त्या व्यक्तीचाच आपण विचार करतो. ती व्यक्ती म्हणजेच जग असे आपण समजतो. पण या सगळ्या धामधुमीत त्या व्यक्तीला आपले प्रेम समजतच नाही. नाहीतरी त्या व्यक्तीचा काय दोष? प्रेमात आपण पडलेलो असतो. त्याला कधीच काही आपल्याबद्दल वाटले नसते. आपणच त्या व्यक्तीच्या प्रत्येक गोष्टींचा अर्थ एकच काढतो. आणि अधिकच गुंतत जातो. त्या व्यक्तीपेक्षा कुठलीच जगातील गोष्ट महत्वाची वाटत नाही. ती व्यक्ती नसेल तर सारेच निरस, उदास वाटते. आणि ती व्यक्ती उदास असेल तर अजूनच त्रास व्हायला लागतो. पण तिकडे त्या व्यक्तीला या गोष्टींचा गंधही नसतो. अगदी वेडेपणा असतो हा.

वस्तुस्थिती हीच असते की, ना ती व्यक्ती तिकडे आपल्याबद्दल सेकंदभर विचार करीत असते. आणि ना त्या व्यक्तीला तशी कोणती गरज वाटते. पण तिची कोणतीही गोष्ट आपण फक्त आणि फक्त ‘प्रेमच’ पाहतो. ती व्यक्ती असतेच मुळात प्रेमळ. आपण त्या व्यक्तीशी बोलायचा आणि त्या व्यक्तीच्या जवळ जायचा प्रयत्न करतो. पण का कुणास ठाऊक त्या व्यक्तीला आपली जवळीक ही ‘त्रास’ वाटते. त्या व्यक्तीचे हे वागणे म्हणजे द्वेष नसते, परंतु आपण या गोष्टीमुळे दुःखाच्या दलदलीत फसत जातो. यात चूक कोणाची नसते. प्रत्येकाच्याच मनात एक व्यक्ती असते. जी फक्त ‘मनात’ असते, प्रत्यक्षात नसते. पण आपण त्या व्यक्तीला ‘ह्या’ लोकात शोधतो. कधी कधी मिळतेही. अनेकांना ती व्यक्ती मिळते देखील. आणि ते पाहून आपण त्याच भाबड्या आशेने, तिचा प्रत्येक क्षणी शोध घेतो. पण का कुणास ठाऊक, आपल्याला वाटणारी ती प्रेमळ व्यक्तीला तिला हवी असणारी व्यक्ती आपण कधीच नसतो.

तरीही आपण कधी ना कधी ती व्यक्ती आपली होईल या आशेने त्या व्यक्तीच्या ‘न घडणार्या’ गोष्टींबद्दल आपण विचार करू लागतो. आणि ज्यावेळी तो प्रेमाचा डोंगर खोटा आहे याची अनुभूती आहे असे जाणवते. त्यावेळी आपण आपल्यालाच दोषी मानायला लागतो. न्युनागंडचा तो ‘कर्करोग’ आपल्याला संपून टाकतो. झोपेचा आणि समाधानाचा किल्ला कोसळतो. आपण तरीही, सत्य आणि वस्तुस्थिती मानायला तयार नसतो. ती व्यक्ती, त्या व्यक्तीच्या वागण्याचा त्रास होवून देखील आपल्याला तीच व्यक्ती हवी असते. खर तर आपले प्रेम कधीच खोटे नसते. पण त्या प्रेमाची जाणीव आणि गंध त्या व्यक्तीला होताच नाही. पण मग मात्र आपण उदास आणि बैचेन होतो.

यात चूक असते ती आपल्या ‘मनाची’. ती व्यक्ती कधीच दोषी नसते. दोषी आपणही नसतो. पण मनाने ती व्यक्ती ‘आपली’ मानलेली असते. या गोष्टीमुळे, आपणच नव्हे आपल्याला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष जोडली गेलेली मने मात्र भरडली जातात. त्यांचा दोष नसतांना हे सगळे घडते. प्रेम करा, पण प्राण्यांवर, एखाद्या निर्जीव गोष्टीवर. पण व्यक्तीवर प्रेम हे शेवटी ‘चूकच’ असते. या एका मनाची सर्व मनांना एक छोटीशी विनंती आहे, प्रेमाची चूक करू नका..


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.