जय महाराष्ट्र!


जय महाराष्ट्र! आज मी या ब्लॉग मधील शेवटची नोंद ‘खरडतो’ आहे. मला समजून घ्याल अशी अपेक्षा करतो. ब्लॉग ‘मी’ विषया भोवती फिरत होता. मुळात ‘मी’ हाच एक विषय होता. प्रत्येक वेळी ‘मी’ विषय माझ्याबद्दल होता. माझ्या प्रत्येक गोष्टी माझ्या पुरत्याच होत्या. थोडक्यात, एकटाच ‘ओनर’ होतो. परंतु, आता ‘भागीदारी’ झाली आहे. ‘मी’ चे पन्नास टक्के शेअर परवा मी एका व्यक्तीला दिले आहेत. त्यामुळे आता ‘मी’ माझा राहिलेलो नाही. थोडक्यात स्टेटस ‘सिंगल’चे ‘एंगेज्ड’ झाले आहे. त्यामुळे आता इथेच थांबणे योग्य राहील.

पुढे जावून स्टेटस ‘मॅरीड’ होईल. मला फक्त अस म्हणायचे आहे की, माझ्या प्रत्येक गोष्टीवर अगदी मनावर सुद्धा आता त्या व्यक्तीचा हक्क आहे. तुम्हा सर्वांमुळे माझ्या जीवनाला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे एक चांगला मार्ग दिसला आहे. खर तर या ब्लॉगला शोभा तुम्हा सर्वांमुळे आहे. ज्या गोष्टी घडल्या. ज्या गोष्टी मी करू शकलो त्यात सर्वांचा पाठिंबा खूप महत्वाचा होता. येणाऱ्या प्रतिक्रिया माझ्यासाठी नेहमीच मार्गदर्शक होत्या. अनेकांना माझ्या ब्लॉगमुळे जाम इरिटेट झालेलं. पण हरकत नव्हती, माझ्या चुका माझ्या लक्षात आणून देणंही तितकंच महत्वाच होत. अनेकांना मी माझ्या गोष्टी अस शेअर करणे चुकीचे वाटलेले. परंतु विषय ‘मी’ असल्याने कदाचित तस् जाणवलं असेल.

असो, शेवटी फार पकवत नाही. मी यापुढे नोंदी जरी टाकणार नसलो तरी यदाकदाचित एखाद्या नोंदीवर प्रतिक्रिया द्यावीशी वाटली तरी हरकत नाही. आणि इमेलद्वारे मी तसा प्रत्युत्तर देण्याचा माझा प्रयत्न नक्कीच राहील. आणि मी ब्लॉग देखील काढून टाकणार नाही. एखादा नवीन विषय असलेला ब्लॉग मी सुरु करण्याचा विचार करतो आहे. पण त्यात ‘मी’ हा विषय नसेल. सध्याला तरी माझ फेसबुकचे खाते मी वापरतो आहे. तुम्हा सर्वांचे सदैव नम्रपणे तिथे स्वागतच असेल. आणि मला आवडेलही. तुमच्या सर्वांच्या या मदतीमुळे ब्लॉगबाळ खूप धावला अगदी सव्वा दोन लाखाच्या घरात पोहचला. तो थकला वगैरे नाही. फक्त वेळ आणि आलेली परिस्थिती पाहता आता इथे थांबणे योग्य राहील.

बाकी या मराठी भाषेची सेवा करण्याचे मिळालेले भाग्य. या भूमीत आणि इतक्या चांगल्या लोकांचा मिळालेला सहवास कधीही विसरणार नाही, याची खात्री देतो. परमेश्वर, तुम्हा सर्वांना चिरायू करो. मान, शक्ती आणि सुखासमाधानाचे जीवन देवो. तुम्हा सर्वांच्या इच्छा सदैव पूर्ण करो. ही त्या परम विधात्या परमेश्वराला प्रार्थना. जय महाराष्ट्र!!!


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.