जात


ते म्हणतात ना, जी जात नाही ती ‘जात’. खर आहे. काल पहाटे, (म्हणजे सुट्टीच्या दिवशी माझी पहाट दुपारी बाराच्या पुढे होते) जनगणनेसाठी एक बाई आल्या. माहिती घेत असतांना माझी ‘जात’ विचारली. ‘जात’ सांगितल्यावर बाईंचा चेहरा आणि वागण्यात सुद्धा बदल जाणवला. थोडं बेकार वाटलं मला. अजूनही ‘जातीपाती’ लोक पाळतात. शिक्षक लोक असे ‘जातीवंत’ झाले तर भविष्य अवघडचं आहे. जातीजातींमध्ये अजूनही तेढ आहेत. वरवर दिसून येत नाही पण आतून ‘लाव्हा’ खदखदतो आहे. असो, जनगणना आणि जात यावर मी काय बोलणार? बाळासाहेब जे बोलले तेच माझ मत आहे.

मध्यंतरी माझी मैत्रीण तिला भावी पती कसा हवा ह्यावर मला सांगत होती. मग असंच गप्पा मारत असतांना तिला तीच्या मित्रांच्याबद्दल काय वाटते विचारले. तर ती देखील ‘तो आमच्या जातीचा नाही, आई वडिलांना पसंत पडणार नाही’ अस म्हणाली. तिचे आई वडील आणि माझ्या आई वडिलांचे स्वभाव अगदी सारखेच. त्यामुळेच आमच्या दोन्ही कुटुंबात गोडवा आहे. मागील आठवड्यात माझ्या मित्राच्या काही कामासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जाण्याचा प्रसंग आला. तो कामासाठी म्हणून कार्यालयात गेला. आणि मी बाहेर आपला त्याचा हेल्मेट घेऊन बाईक जवळ उभा. बर गेटवर ती ‘सूचना’ होती की,’फॉर्म / माहितीसाठी वकील /एजंट ला पैसे देवू नका’. आणि बरोबर त्या सूचनेच्या आजूबाजूला ते काळे कोटवाले कावळे घोंगावत होते. कुणी नवीन सावज दिसले की, झालीच ह्यांची कावकाव सुरु. कोणतीही कायदेविषयक अडचण, माहिती सगळ्याचं गोष्टी ह्यांच्याकडे. फक्त ह्यांना पैसे द्या की सुटलीच अडचण.

असाच एक कावळा एका सावजाला घेवून माझ्या बाजूला बसला होता. फॉर्म भरत असतांना आजोबांची आणि पणजोबांच्या जातीचे दाखले आहेत का अस कावळ्याने सावजाला विचारले. सावज ‘आता दोघेही ‘वरती’ गेले आहेत. आणि त्यांनी त्यांच्या काळात कुठे होती शाळा? तुम्हीच काही तरी मार्ग सांगा’. मग कावळा हसून ‘काही हरकत नाही. करून देतो’ अस म्हणाला. ऐकून मलाही आश्चर्य वाटले. त्यांच्या गप्पा चालू असतांना सावज म्हणाला ‘ही सगळी जातीची दाखल्याची लफडी त्या जोशी मुख्यमंत्री झाल्यापासून सुरु झाली. ‘ अस म्हणाल्यावर तो कावळा ‘ते तसे नव्हे, जेव्हा ब्राम्हण सरकारी नोकरीसाठी दलित आणि निवडणुकीत उमेदवार खोटी प्रमाणपत्रे द्यायला लागले तेव्हापासून हे सुरु झाले’. असो, दोघांच्या गप्पातून मला त्या दोघांची जात आणि पार्ट्या कळल्या. मित्र बाहेर आल्यावर त्याला काम झालं का विचारलं तर तोही ‘जातीच्या दाखल्याशिवाय काम होणार नाही’ अस बोलला.

मित्रांसोबत जेवतांना देखील कधी नॉनव्हेजचा विषय निघाला, आणि मी नॉनव्हेज खात नाही अस कळल्यावर देखील नेहमी हाच ‘जात’ विषय सुरु होतो. काय बोलणार आता त्यांना. नेहमी तेच. आता मी काय ठरवून जात निवडली काय? मुळात ही ‘जात’ पद्धत सरकारी सोपस्कारातून जात का नाही कुणास ठाऊक? सगळीकडे ‘जातीभेद करू नका’ असे डोस पाजले जातात. शिक्षकापासून ते मंत्र्यांपर्यंत हेच आणि हेच सांगतात. आणि परत हेच निवडणुकीत जातीची कार्ड्स खेळतात. माझ्या दहावीनंतर माझ्या वडिलांची इच्छा मी बी.एस.सी शेती या विषय घेऊन करावे अशी. तसा मी अभ्यासात फार काही हुशार नाही. कसाबसा फर्स्ट क्लास यायचा. यायचा तेही नशिबाने. पुणतांबा नावाचे एक गाव आहे. तिथे सरकारी कृषी विद्यालय आहे. त्यावेळी महाराष्ट्रातील सर्व ठिकाणच्या कृषी विद्यालयांची मेरीटची यादी तिथे जाहीर व्हायची. फॉर्म भरल्यावर जवळपास एका महिन्याने यादीची तारीख होती. ठरलेल्या दिवशी मी आणि माझे वडील पोहचलो.

माझ्या दहावीचे मार्क + एम.सी.सी + शेती असे पकडून काही तरी ७९ टक्के झाले होते. पण ‘जात’ आडवी आली. ओपनचे ८० टक्क्याला क्लोज झाले. आणि इतर ५५ टक्क्याला. बोला आता याला ‘जातीभेद’ नाही म्हणायचे का? खर तर सरकारच जातीयवादी आहे. खरी दुही त्यांनीच निर्माण केली आहे. असो, त्यावेळी माझा नंबर लागला नाही ते एका अर्थाने चांगले झाले. नाही तर मी अशा गप्पा कशा मारू शकलो असतो?


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.