जोडणी मराठी


जोडणी मराठी ही ट्विटरवरील मराठीसाठी सुरु केलेली आभासी चळवळ आहे. साधारण २०१६ साली मी ट्विटरवर सक्रिय झालो. काळपट्टीवर देखील चुकून एखादे मराठी ट्विट दिसले तरी आनंद व्हायचा अशी परिस्थिती होती.

ट्विटरवर मराठी लोक त्याही काळी मोठ्या संख्येने यायचे. पण प्रोत्साहनाअभावी ते फार काळ टिकत नसायचे. ती अडचण दूर होण्यासाठी त्यावेळी ‘हॅशटॅग मराठी’ ह्या नावाने खात्याची निर्मिती झाली. त्यावेळेस ‘हॅशटॅग’ला मराठीत जोडणी म्हणतात हे माहित नसल्याने ते नाव दिले गेले.

मराठीत ट्विट टाकणारी मंडळींना त्यावेळी किमान प्रोत्साहन देण्याच्या संकल्पनेला आज पाच वर्षे लोटली आहेत. आजमातील ट्विटरवर साधारण दिवसाला पाच हजारांहून अधिक ट्विट प्रकाशित होतात. हे अत्यंत आनंदाचे आहे.

२०१६ मध्ये ट्विटरवर शब्दांची मर्यादा १४० शब्दांची मर्यादा होती. त्या मर्यादेचा विचार करून मराठी भाषेच्या नावातील पहिले अक्षर म्हणून ‘#म’ ठरवले गेले. मराठी भाषिकांच्या प्रेमामुळे आज किमान पाचशे मराठी ट्विट दिवसागणिक ‘#म’ जोडणी वापरून टाकले जातात.

सामाजिक उपक्रम असल्याने यात सरासरी १००-२०० ट्विटलाच प्रोत्साहन म्हणून पुनः ट्विट किंवा पसंती दिली जाते. आजपर्यंत १४० हुन अधिक पुनः ट्विटच्या दैनंदिन सरासरीने २.७ लक्ष ट्विट केले गेले आहेत. ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. मराठी भाषिकांच्या प्रेमामुळेच आज हा वटवृक्ष वाढत आहे.

जगभरातून साधारण क्षणाला ९५०० हुन अधिक ट्विट ट्विटरवरून प्रकाशित होतात. त्यात किमान एक ट्विट मराठी असावे ह्या ध्येयाने आज जोडणी मराठी कार्य करीत आहे. ते ध्येय गाठायचं झाल्यास दिवसाला मराठी ट्विटची संख्या ८६४०० असायला हवी. सुदैवाने ट्विटर वापर करणाऱ्या मराठी भाषिकांची संख्या त्याहून कितीतरी अधिक आहे.

प्रयत्न करीत राहिल्यास तेही शक्य होईल! शासकीय खात्यांची माहिती टाकण्याची संख्या लक्षात घेता ते किमान दिवसाकाठी दोन हजाराहून अधिक ट्विट टाकतात. त्यातील किमान अर्धे ट्विट ते मराठी भाषिकांच्या मागणीमुळे व नियमामुळे करतात! त्यांना प्रोत्साहित केल्यास किमान त्यात पाच ते दहापट वाढ होऊ शकेल!

सामान्य सक्रिय मराठी ट्विटरकरांचा विचार केल्यास त्यांची सध्याची संख्या दोन हजारांच्या आसपास आहे. त्यांना प्रोत्साहन देत राहिल्यास त्यांच्याकडूनही किमान दोन हजारांहून अधिक मराठी ट्विट येतील. खरंतर त्यांनी मनात आणलं तर आहे त्यात हजारोपट वाढ ते करू शकतात.

पुढारी, पक्ष, चित्रपट सृष्टीतील कलाकार आणि अन्य सत्यापित खात्यांकडून व त्यांच्या समर्थक अन विरोधकांच्या चर्चांमधून साधारण अडीच हजार ट्विट दिवसाकाठी प्रकाशित होतात. त्यांनाही प्रोत्साहन मिळाल्यास यात अनेक पटींनी वाढ होऊ शकते!

असेही मराठी भाषिकांना काय अशक्य? त्यामुळे ट्विटरवर मराठी वाढत आहे व वाढत जाईल हे नक्की!!


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.