झूट आहे..


रात्री घरी आल्यावर जेवायला बसलो. सहज टीव्हीवर काय लागले पहावे म्हणून सुरु केला तर त्यावर तो ‘राजू बन गया जंटलमन’ लागलेला. आणि त्यात शारुख खानला नोकरी मिळते तो सीन. झालं चित्रपटातील गाणी आणि जाहिराती सोडल्या तर पंधरा मिनिटांत त्याला त्याच्या बॉस प्रमोशन देतो. आणि बॉसची मुलगी ह्याच्या प्रेमात देखील पडते. आणि इकडे त्याची पहिली प्रेमिका जुही चावला नाराज होते. त्यात त्या नाना पाटेकरचा ‘लडका लडकी’चा डायलॉग. थोडक्यात प्रेमात पडले की, हृदय तुटण्याचे चान्सेस जास्त. चॅनेल बदलला तर, गोविंदा ‘हद कर दी आपने’ चित्रपट. त्यातही हेच ती राणी मुखर्जी त्या गोविंदाच्या मागे धाव धाव धावते. गाण्याचा चॅनेल लावला तर, ते अक्षयकुमारचे ‘नखरे’ गाणे सुरु. गाणे मस्त आहे.

सकाळी मित्राशी गप्पा मारीत असतांना देखील मला तो हेच सांगत होता. काय माहित, पण आजकाल माझे सर्वच मित्र मला जरा जास्तच सहानभूतीपूर्वक पहात आहे. जणू काही खूप मोठे संकट येणार आहे. आणि मला धीर देण्यासाठी मला ‘करिअर’च्या गोंडस नाव पुढे करून हेच सांगतात की ‘प्रेम हे झूट आहे’. म्हणजे आधी मोजून एक जण मला हे सल्ले द्यायचा. पण आता का कुणास ठाऊक, एकदम सगळेच मला धीरगंभीर, धीरजकुमार वाटत आहे. आज ती काय दिसत होती यार!! ती इतकी छान, त्यात ती तो पांढऱ्या रंगाचा ड्रेस. आहाहा! काय सांगू. आज मी काळ्या रंगाचा ड्रेस घालून गेलेलो. मग मलाच शंका आली की, दोघांच्यात आवडीनिवडीत किती फरक आहे. मित्राशी त्या विषयावर बोलायला गेलो तर तो ‘धीरजलाल’ मला ‘मुलींवर विश्वास ठेऊ नकोस. त्या एक नंबरच्या नाटकी असतात. ते त्यांना हवं ते करून घेतात. आणि नंतर लाथ मारतात. त्या प्रेम वगैरे काहीच करीत नसतात. आपल्याला खेळवतात’.

काल दुपारी माझा अजून एक मित्र देखील हेच, लग्नाला होकार दे. प्रेमाच्या गोष्टी करायला तू काय आता कॉलेजमध्ये आहेस काय? तीच्या नादात नंतर नक्की पस्तावशील. दुपारी मित्रामुळे नव्या कॅन्टीनमध्ये गेलेलो. त्यात खुपंच लवकर गेलेलो. तिची खुपंच आठवण येत होती. अस वाटत होती की, एकच तर तिला डोळे भरून पाहायची संधी असते, ती सुद्धा आज गेली. पण अचानक ती नव्या कॅन्टीनमध्ये आली. मग काय सांगू, किती आनंद झालेला. पण त्या मित्राला जायची घाई. काय यार, माझ्या पुढच्याच ‘रो’मध्ये बसलेली. संध्याकाळी त्या ‘हभप’ मित्राने, करिअरकडे लक्ष दे. ती मिळण्याचे चान्सेस वाटत नाहीत अशी भविष्यवाणी केली. काय माहित, काय होणार. पण ती सोडून दुसरे कोणीच आवडत नाही. आणि दुसऱ्या कोणत्या गोष्टीची भीतीही वाटत नाही. आज का कुणास ठाऊक, ती माझ्यावर रागावली की काय अशी शंका येत होती. एकदाही माझ्याकडे पहिले नाही. हाय बाय सुद्धा नाही.

आज एका मित्राला मदत करीत असतांना मला हेच सांगत होता. एकतर ती दुपारी कॅन्टीनमध्ये आल्याने माझ्या अंगात काय शिरले होते, काय माहित. त्याची अडचण सुटते की नाही अस वाटत असतांना तो प्रश्न सोडविला. सगळे आजकाल ‘मुली खराब असतात’. ‘प्रेम वगैरे सगळे झूट असते’ अस सारखे सारखे का रिपीट करीत असतात. एखादा म्हटला असता तर काहीच वाटलं नसत. पण अचानक सगळेच. मला मुली आणि प्रेम पासून दूर राहायचा सल्ला देतात. ती ज्यावेळी दुसऱ्या कोणाशी हसून बोलते. किंवा ‘मला काम आहे’ अस म्हणून मला टाळते. त्यावेळी काही वेळापुरते माझ्याही मनात हे ‘झूट आहे’ विचार मनात डोकावतात. पण पुन्हा तिला हसतांना पहिले की, सगळ् पूर्ववत होते. मला माहिती आहे. हे सगळेच एकतर्फी आहे. याचा शेवटही माहिती आहे. पण ते काहीही असो. मला ती आवडते. कदाचित प्रेम वगैरे झूट असेल. कदाचित मी वेडेपणा करीत असेल. पण ती सोडून दुसरा विचार नाही करता येत आहे. एकाने तर दारू प्यायला सुरवात कर. डोक्यातून हे विचार निघून जातील. असा सल्ला दिला. पण तिला पाहून चढलेली नशा काय कमी आहे का?


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.