झोपडपट्टी मॅन


झोपडपट्टी वासियांना फुकट घर वाटण्याचा निर्णय ऐकताच ‘अर्थ क्विक’ आल्याप्रमाणे चौहान ऑफिसातून धावत उपमुख्यमंत्र्यांच्या ऑफिसकडे निघाले. ऑफिसचा दरवाजा उघडणार, तेवढ्यात बाजूला असलेला शिपाई ओरडला ‘साहेब मिटींगमध्ये हायेत. अपोईमेंत घ्या’. चौहान शिपायाकडे बघून बोलला ‘तुमने मला ओळखा नाही क्या?’. शिपाई कान साफ करीत बोलला ‘तू असेल तुझ्या घराचा मुख्यमंत्री. मग मी काय करायचं? तुला काय मॅनर्स हाय का नाय. आपल उद्धटपणे घुसू राहिलास. कुणाशी बोलतो आहेस तू?’. चौहान गडबडून ‘अरे, मला जाऊ दे. मॅडमचा फोन आलेला’. शिपाई ‘आन मंग, ती तुझी मॅडम. मला काय सांगतोस तीच’. चौहान रागात ‘मी मुख्यमंत्री आहे. इम्पोर्टेड!’. शिपाई हसू लागला ‘आता एवढचं बाकी राहील. मघाशी गेले ते देखील हेच म्हणाले’.

चौहान ‘कोण म्हणाल तुला अस?’. शिपाई ‘अरे त्याच्याशी तुझ काय रे? तू गुमान निग बर इथून’. चौहान रागाने लाल झाले. शिपाई तंबाखू चोळत ‘जा जा. डोळ् लई वटारू नग’. चौहान पडलेल्या चेहऱ्याने आपल्या ऑफिसात येऊन बसले. सर्वांना फोनाफोनी करून ऑफिसात यायचा निरोप धाडला. सर्व मंत्री आपआपल्या लवाजाम्यासाहित मुख्यमंत्र्यांच्या ऑफिसात गोळा झाले. आणि मिटींगला सुरवात झाली. चौहानने सर्वांकडे नजर फिरवत ‘पिंपरी चिंचवड मधील सगळ्या झोपडपट्टी वासियांना मोफत घर देण्याचा निर्णय कुणी घेतला?’. सर्व मंत्री एकमेकाकडे पाहू लागले. ‘मला माहिती कळली आहे की सगळ्या झोपडपट्टी वासियांना फुकट घर वाटण्याचा निर्णय झाला आहे. कुणी केला ते आधी सांगा’ चौहान गरजले.

एक मंत्री उभा राहून ‘हे पहा, माझा आणि माझ्या स्वाभिमानाचा यात काय बी संबंध नाय. आणि म्या तो निर्णय घेतला बी नाय. त्या जैतापूरच्या मागे लागलो हाय मी सहा एक महिन्यापासून’. चौहान मंत्रीकडे पाहत ‘तुम्ही तुमचा स्वाभिमान कुठेही घुसडू नका. खाली बसा’. मंत्री खाली बसला. पुन्हा चौहाननी प्रश्न विचारला. कुणीही काय बोलेना. तेवढ्यात, दारावर लावलेल्या घड्याळाचा दोलक अचानक जोर जोराने वाजू लागला. चौहान चिडले आणि मोठ्या आवाजात ‘आता खर सांगा नाय सांगितलं तर, में मॅडम को जाके बोलुंगा. बताव किसने लिया ये डिसिजन?’. ‘मैने’ असा आवाज घुमला. सर्वानी आवाजाच्या दिशेने पाहायला सुरवात केली. दाराजवळ पांढरा धूर येऊ लागला. आणि त्यातून अंधुक अशी प्रतिमा दिसू लागली. चौहान आणि सर्व मंत्री उभे राहून ती व्यक्ती कोण यासाठी निरखून पाहू लागले. चौहान ‘कोण हो तुम? सामने आव’ अशी गर्जना केली. आणि व्यक्ती समोर आली.

अंगात पांढरा रंगाचा कडक इस्त्रीचा कुर्ता. आणि खाली फटका पायजमा. सर्वजण ते पाहून हसू लागले. चौहान गडबडून ‘दादा तुम्ही, ही अशी कशी काय अवस्था झाली. कोणी केल हे असे?’. दादा पहात ‘त्याचे तुमच्याशी काय? माझ्या घरावर सीबीआयने धाड टाकू नये म्हणून असा वेश मी केला आहे’. ‘आर आरं’ आबा बोलले. दादा आबाकडे पाहत ‘तुम्ही आपल घर सांभाळ बर!’. आबा रागात ‘आन तुमी झोपड्या’. दादा हसत ‘होय! त्येच तर करतोय. म्हणूनच तर हा निर्णय घेतला’. चौहान चौकोनी चेहरा करून ‘पण दादा..’ पुढे काही बोलणार तेवढ्यात दादा एक बोट वर करून ‘पण झालाय!’. चौहान घाई घाईत ‘तुम्ही मॅडमची परवानगी न घेता कसा काय निर्णय घेतला?’. दादा रागात चौहानकडे पहात ‘हट. ती तुझी मॅडम. झोपडपट्टी वासियांना मोफत घर मिळावे ही तो माझी इच्छा’.

चौहान नरमाईत ‘पण कस आहे दादा, इतका पैसा कुठून आणणार?’. दादा आनंदात बोलले ‘आता मूळ मुद्यावर आला. सोळा झोपडपट्ट्या आहेत आमच्या पिंपरी चिंचवडमध्ये. प्रत्येक मतदार संघाचा विचार केला तर प्रत्येक मतदार संघात पस्तीस टक्के मतदार झोपडपट्या मधील आहेत. एकूण अकरा हजार लोकांना ताबडतोप पक्की घर देण्याचा निर्णय मी घेतला आहे’. चौहान साशंक चेहऱ्याने ‘पण इतका पैसा आणणार कुठून?’. दादा हसू लागले ‘अरे मार्च जवळ आलाय. नार्याचा खिसा गरम व्हायची वेळ आली. तो देईल की!’. चौहान नार्याकडे पाहत काही बोलणार. तेवढ्यात, दादा हसत नार्याला बोलले ‘देणार? की काढू गोळीबार प्रकरण?’. नारू मंत्री नकारात्मक मन डोलवत शांत उभा राहिला. दादाने रोख चौहांकडे वळवला ‘त्याच काय आहे चौहान साहेब, नारूचा लवासाच्या वेळी चांगलाच खिसा गरम केला आहे आम्ही. त्यामुळे पैशाची चिंता करू नका. पैसे थोडीच आपल्या खिशातील आहेत. लोक कर भरतात. त्याचा तो पैसा’. चौहान ‘मग रस्ते वगैरे करा ना’.

दादा ‘सोडा साहेब, गाड्या घोड्या असलेली मध्यमवर्गीय मंडळी आपल्याला वोट देत नाहीत. आपले खरे मतदार हेच झोपडपट्टीवाले. आणि काय आहे. सरकारी पैशातून घर बांधणार. त्यामुळे आपल्याला फुकटच वाहवा. आणि वरून जमिनी मोकळ्या होतील. माझ्या मित्रांची सध्याला कडकी चालू आहे हो! जमिनी मोकळ्या झाल्या की, होतील पाच पन्नास नवीन इमारती उभ्या आमच्या पिंपरी चिंचवडमध्ये. कस झकास ना? परत निवडणुकीचा खर्च निघेल. आता पुन्हा सत्तेत यायची शक्यता संपली आहे’. छगन हसत हसत पुढे आला ‘वा! एका दगडात अकरा हजार पक्षी’. ‘तीस टक्के मत वाढली म्हणा छगनराव!’ दादा हसत बोलले. छगन ‘आता मानल बुवा तुम्हाला आम्ही’.

‘अरे, म्हणून तर झोपडपट्टी वाले आजकाल मला झोपडपट्टी मॅन म्हणून ओळखू लागले आहे’ दादा हसत एका दमात म्हणून टाकले. चौहान ‘आणि माझ कमिशन?’. दादा चौहानकडे नजर टाकत ‘ते मॅडम आणि तुम्ही तुमच पाहून घ्या’. सर्व दुष्टवादी मंत्री जोरजोरात हसू लागले. आणि बाहेरून ‘झोपडपट्टी मॅन जिंदाबाद’ असा घोषणांनी ऑफिस परिसर दणाणून गेला.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.