टिपीकल


चित्रपटाला सुरवात होते. संध्याकाळचा सीन. मुलाच्या घरी त्याच्या आई वडिलांची घाई गडबड चालू असते. मुलगा मात्र स्थिर. मग वडिलांना मुलगा मी टी-शर्ट आणि जीन्स घातली तर चालेल का अस विचारतो. वडील आनंदात ‘हो’ म्हणतात. तेवढ्यात मुलाच्या वडिलांचा फोन वाजतो. वडील फोन उचलतात. मुलगा पडका चेहरा करून कपडे घालणार, तेवढ्यात आई ‘तो लाल रंगाचा शर्ट आणि ती पांढर्या रंगाची पॅंट घाल’. मग काय, मुलगा काहीही न बोलता आपला निर्णय बदलतो. आणि आईने सांगितलेले कपडे निमुटपणे घालतो. तयारी चालूच असते, तर मुलीच्या वडिलांचे आगमन होते.

मुलीचे वडील ‘टिपीकल’ मराठी. साधी शरीरयष्टी, डोक्यावर टोपी, साधारण उंची आणि समोरच्याला त्रास न होईल असे वर्तन. मुलाला पाहून मुलीचे वडील खुश होतात. आणि त्या सर्वांना घेऊन ‘चालत’ आपल्या घरी निघतात. मुलगा सोडून बाकी सर्वच खुश. मुलाच्या घराच्या जवळच घर असल्याने तो चिखालांनी भरलेला मार्ग लवकरच पार होतो. एक साधारण अर्धा गुंठा जागेत एक साधे, थोडक्यात, ‘टिपीकल’ मराठी माणसाचे घर, पण स्वतःचे! मुलाने घरात प्रवेश करताच मुलीची आई आनंदित होते. मग इकडच्या तिकडच्या पण सगळ्या ‘टिपीकल’ गप्पा सुरु होतात. म्हणजे तुमचे मूळ गाव कुठले? शेती कोण करते? तुमचे नातेवाईक? असे सगळे नेहमीचेच प्रश्न! आणि कुठे समानता वाटली तर दोन्हीही म्हणजे मुलाचे आणि मुलीचे आई वडील आनंदित! बोलता बोलता मुलीचे काका आजारी असल्याचे समजते. आजार आणि आजाराची कारणे देखील ‘टिपीकल’.

मुलीचा भाऊ, तो देखील टिपीकल ‘बुजरा’ खोलीत येऊन बसतो. मग मुलगा स्वतःहून त्याच्याशी गप्पा मारायचा प्रयत्न करतो. पण जणू काही स्वतःचाच ‘कार्यक्रम’ आहे इतका बहिणीचा भाऊ लाजत उत्तरे देत मुलाचा प्रयत्न ‘प्रयत्न’च करतो. मुलीची आई सुरवातीला पाणी, आणि नंतर ‘कांदे’ नसलेले पोहे आणते. आता हे मात्र टिपीकल नाही. कारण, श्रावणात कांदे खात नसतात. आता हे कारण मात्र ‘टिपीकल’. तेवढ्यात मुलाच्या आईला स्वयंपाक घरात बसलेल्या आजी दिसतात. आजी मुलीच्या नसतात पण बाजूच्या. मग त्यांना मुलाची आई हाक मारते. मग आजी हसत हसत थोडक्यात आपले ‘बोळके’ दाखवत स्वयंपाक घरातून बाहेर येतात. आणि मुलाच्या आईच्या बाजूला येऊन बसतात. मंद पंखा चालू असल्याने, मुलाला घाम फुटतो. आता याचा वेगळाच अर्थ काढून मुलीचे वडील हसतात आणि मुलीच्या आईला मुलगीला बोलवायची खुण करतात.

अरे, एका पात्राचा उल्लेख करायचा राहूनच गेला. मुलगी दुधाचे कप असलेला ‘ट्रे’ घेऊन येते. आणि सगळे हा सस्पेन्स पाहण्यासाठी मुलाच्या चेहऱ्यावर आपली नजर रोखतात. मुलगी अगदी सुरवातीला मुलाला तो दुधाचा कप देते. मुलगा हसून ‘थॅंक्स’ म्हणतो. पाहणाऱ्या सगळ्यांचा काळजाचा ठोका चुकतो. आणि ‘इंटरवेल’……

चित्रपटाच्या उत्तरार्धाला सुरवात होते. इकडे मुलगी ‘ट्रे’ स्वयंपाक घरात ठेऊन बाहेरील खोलीत मुलाच्या समोर असलेल्या खुर्चीत येऊन बसते. आता हे देखील टिपीकल. आणि मुलगा मुलीकडे बघून ‘नीले नीले अंबर पर…’ हे गाणे म्हणायला लागतो. पण ‘स्वप्नात’. कारण समोर कोण बसले हे कळलेलेच नसते. तो तिच्यातही त्याच्या ‘अप्सरा’ला बघत असतो. तशी मुलगी टिपीकल. जणू काही सर्वोच्य न्यायालयाने मान वर न करण्याचीच शिक्षा ठोठावली आहे. मग मुलीची आई मुलाला काही विचारायचे असेल तर विचार अस ‘टिपीकल’ वाक्य बोलते. मग अचानक गाणे अर्धवट थांबते.

मुलगा मुलीच्या आईला हसून ‘मला काही नाही विचारायचे’. मग मुलाचे वडील मुलीला ‘टिपीकल’ प्रश्न विचारतात. मुलगी देखील कधी मान डोलावून तर कधी एका शब्दात उत्तरे देते. ते देखील ‘टिपीकल’. आणि मग मुलीचे आई वडील मुलाला प्रश्न आणि ते देखील ‘टिपीकल’ विचारतात. मुलगा ‘सुटलो’ या आनंदाने बिनधास्तपणे उत्तरे देतो. मग उगाचंच, पाच दहा मिनिटे शांतता. पुन्हा आजी मध्येच मुलाच्या आईला ‘शेती किती आहे?’ असे दोनचार टिपीकल प्रश्न विचारते. आणि मुलाची आई मान डोलावून ‘टिपीकल’ उत्तरे देते. तिथून निघाल्यावर मुलगा पहिल्यापेक्षा जास्तच आनंदी होतो.

कारण त्याला वाटणारा धोका आता टळलेला असतो. पण घरी गेल्यावर मात्र आई वडिलांच्या ‘मुलगी पसंत आहे’ हा निर्णय ऐकून मात्र जाम वैतागतो. मग वडील आधीचे स्थळ आणि आता पाहिलेले यातील चांगल्या बाजू मुलासमोर ठेवतात. पण मुलगा आधीच एका अशा ‘अप्सरेच्या’ प्रेमात पडलेला असतो. त्याला दुसरे काहीच सुचत नसते. मग तो, ‘आता लग्न करायची माझी इच्छा नाही’ अशी टिपीकल उत्तरे देतो. पण पुन्हा ‘आता पंचवीसचा आहेस, लग्न तिशीत करायची इच्छा आहे का?’ असे उलट प्रश्न त्याचे वडील करतात. मग वडील ‘प्रेम विवाह’ मधील दोष सांगतात. हे वडिलांचे बोलणे मुलगा जाम गडबडतो. पण मुलाच्या मनात अजूनही ‘अप्सरा’च असते, अगदी टिपीकल…


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.