टीम इंडीया


आम्ही टीम इंडीया! काय बोलू नका आम्हाला. आम्हाला सगळ ठाव आहे. आम्हाला कस खेळायचे शिकवू नका. मुळात आम्ही विरोधी टीमला कधी कमी लेखत नाही. मग ती, ऑस्ट्रेलिया असो किंवा हॉलंड. आणि ती टीम कमजोर आहे अस कुणाला वाटूही देत नाही. आयरिश खेळाडू चांगले खेळतात आणि हॉलंडचे नन्हे मुन्ने बकवास असा वाद होवू नये यासाठी आम्ही काल अस खेळलो. आणि तुम्हा लोकांना कस कळत नाही. मॅच थोडी घासून झालीच पाहिजे. नाहीतर ती मॅच पाहण्यात काय अर्थ राहिला असता?

नाही नाही तुम्हीच सांगा. ते टीव्हीवर बसून तासनतास रवंथ करणारी मंडळींना काहीतरी हवंच ना. उगाच आमच्या खेळात त्यांच्या आयुष्याचा खेळ होऊ नये. आणि तेवढेच तिकिटाचे पैसे ‘वसूल’. नाहीतर कोण त्यांची एक्सपर्ट मते ऐकणार? आणि काल जस खेळलो, म्हणे तुम्हा लोकांना आवडल नाही. पण यावरून एकतरी गोष्ट सिद्ध झाली ना की, शेवटच्या चेंडूपर्यंत आम्ही खेळतो. आणि मग स्कोरबोर्डवर रन दीडशे असो साडे तीनशे. आणि मला सांगा आमच्या सगळ्या खेळाडूंना बॅटिंग मिळायला पाहिजे ना? टीममध्ये सगळ्यांना बॅटिंग करण्याचे स्वातंत्र्य घटनेने दिलेले आहे. तो युसुफ आणि विरू सगळे रन खाऊन टाकतात. म्हणून मग आम्ही अस ठरवलं आहे की प्रत्येकाने लिमिटेड रन आणि ओव्हर खेळायच्या. कदाचित यालाच ‘टीम स्पिरिट’ म्हणतात.

आउट झालो म्हणजे काही मेलो वगैरे नाही. उगाचंच, गळा फाडायची गरज नाही. ओव्हर संपली की असतोच ना आम्ही जाहिरातीत. कधी घड्याळ विकायला तर कधी सिमेंट. आणि कधी चिप्स. आणि सगळ्यात महत्वाचे, विकेट दिल्या की विरोधी टीम देखील खुश. आणि खर सांगू का ती आमची ‘रणनीती’ आहे. वर्ल्डकप इतका मोठा आहे. अजून अनेक मॅच खेळायच्या बाकी आहेत. आताच आमचे फलंदाज थकले किंवा एखाद्या चेंडूने घायाळ झाले तर.. कस होणार टीमच? त्यामुळे सर्वांनी मिळून खेळायचे. माझे तुझे काही नाही. आपल्या गोलंदाजांना काय बोलायचे नाही. जगातील सर्वात दानशूर लोक आहेत ती. बांगलादेश सारख्या संघाला तीनशे रन वाटले. हो वाटलेच! आम्ही इंडीज आहोत, पण ‘वेस्ट इंडीज’ नाहीत. अठ्ठावनमध्ये ऑल आउट करायला. आणि याचा सिंहाचा वाटा आमच्या क्षेत्ररक्षणाला जातो.

काय बिघडते एखाद्या टीमचे थोडेफार रन वाढले तर? ही संकुचित वृत्ती आमच्यात कधीच नव्हती. आणि कधीच रहाणार नाही. देण्याची वृत्ती माणसात असावी, अस संत महात्मे बोलून गेले. सामना जिंकणे महत्वाचे अस आम्ही कधीच मानले नाही. जिंकणे आणि पराभूत होते हा तर खेळाचा एक भाग. म्हणून कधीकधी आम्ही सामने ‘जिंकतो’. म्हणजे ते आता आमच्यावर अवलंबून आहे. आमच्या खेळावर नाही. कस असते मार्केट व्हॅल्यू महत्वाची. जाऊ द्या, तुम्हा आम जनतेला काय कळणार ते आमचे हाय फंडू फंडे. पण एक आहे. आम्ही हे सगळ तुमच्यासाठी करतो. पण थोड आमच्यासाठी केलं तर बिघडलं कुठे? बघा, अस कोणी खर बोलत नाही. आम्ही बोलतो, उपकारच म्हणायचे. अगदी खर बोलायचे झाले तर जाहिरातीतून वेळ काढून आम्ही खेळतो ही तुमच्या भाग्याची गोष्ट नाही काय?

खरंच तुम्ही खूप खूप भाग्यवान आहात. म्हणजे अख्खा इंडिया आमच्या ‘टीम’मुळे भाग्यवान म्हणायला हवा. चला नंतर बोलू, आम्ही आता नेटमध्ये प्रॅटिसला चाललो आहे. आणि हो! ते होम हवन काय सोडू नका. तेवढंच मनाला समाधान ‘तुमच्या’!..


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.