टीसी


आज सकाळी लोकल चुकली. येताना लोकल वेळेवर आली. पण नेहमीप्रमाणे उशिरा निघाली. पुणे स्टेशन वरून निघायची वेळ सातची आणि निघाली सव्वा सातला. मी नेहमी येताना शेवटून दुसऱ्या डब्याच्या पहिल्या गेटवर असतो. महिन्याच्या अखेरच्या काही दिवस टीसी (तिकीट चेकर) आमच्या डब्यात तिकीट चेक करायला नक्की येतो. आता नक्की यासाठी म्हणतो कारण मी त्या डब्यात रोज असल्याने मला पक्क माहित झाल आहे. आणि कोण कोण टीसी आहे हे देखील माहित झाल आहे. त्यातील एक पंजाबी टीसी आहे. तो नेहमी डब्यात येत असतो. गोल चेहरा आणि चेहऱ्याप्रमाणेच शरीरयष्टी, पण धष्टपुष्ट.काळा रंगाचा कोट, भरदार दाढी- मिश्या आणि डोक्यावर पगडी. खर तर त्याच वर्णन करावा असाच आहे तो. एक वर्षापासून त्याला मी बघतो आहे. अनेक वेळा माझा लोकलचा पास चेक केला आहे. पण कधी बोलण वगैरे झाल नाही.

आज संध्याकाळची सातची लोणावळा लोकल निघाली. मी गेटवर उभा होतो. त्याने पळत येवून मला आत व्हायला सांगितले. मला वाटल की त्याला डब्यात यायचे आहे बहुतेक म्हणून मी आत झालो. हा डब्यात आला. पण माझ्या जागेवर उभा राहिला. मला खर तर खूप आश्चर्य वाटले. बहुतेक त्याला समजले असावे. मग तो स्वतहूनच मला म्हणाला की मला बघितला की लोक डब्यातून उद्या टाकतात. म्हणून जरा वेळ गेटवर उभा राहतो. मी आपला कानाला मोबाईलचे हेडफोन लावून होतो त्यामुळे सुरवातीला काय बोलला ते काही कळलं नाही. खर तर तो हिंदीत बोलत होता. पण यावेळी मला काही त्याचा राग आला नाही. मुळात त्याची पंजाबी ठेक्याची हिंदी असल्याने काही वेगळे वाटले नाही. मी नुसताच ‘बरोबर आहे’ अस हसून म्हटलं. लोकल मुळा-मुठा नदीच्या पुलावरून निघाल्यावर त्याने डब्यात जाऊन तिकीट चेक करायला सुरवात केली. आणि आश्चर्याची गोष्ट अशी की त्याने माझा पास चेक केला नाही. बहुतेक इतक्या दिवसापासूनच्या अनुभववरून त्याने चेक नसेल केला. याआधी कधी अस घडल नाही. त्याने शिवाजीनगर स्टेशनच्या आधीच चुकीच्या तिकिटावर प्रवास करणाऱ्याला पकडले. खर तर मी त्याला नेहमी असे अनेक जणांना पकडून घेवून जाताना पाहिलं आहे. आणि एकदा काही मुलांकडून लाच घेताना सुद्धा पाहिलं आहे. बाकी काहीही असो आज मला त्याच बोलण ऐकून तो ठीक वाटला. देवाच्या कृपेने कधी आतापर्यंत वीदाउट तिकीट पकडलो गेलेलो नाही.

कधी कधी मी नवीन पास काढायला विसरून जायचो. टीसी समोर असायचा, त्याच्या समोरून मी त्याच्याकडे बघत मी निघून जायचो. पण तो काही तिकीट विचारात नसायचा. आणि असल्यावर हमखास मला अडवून टीसी तिकीट विचारायचा. मला आठवत मी एकदा मनमाड पेसेंजर मध्ये एकदा झोपेमुळे माझ्या गावाच्या एक – दोन स्टेशन पुढे गेलो होतो. आणि त्यावेळी टीसीने मला उठवून तिकीट विचारले होते. तेवढाच काय तो पकडलो गेलेलो. त्यावेळी मी दहावीच्या परीक्षेनंतरच्या सुट्या संपवून पुण्याहून गावी येत होतो. पन्नास रुपयाची पावती फाडली होती. त्यावेळी पन्नास रुपये म्हणजे आजचे अडीचशे रुपये. घरी सांगितल्यावर वडिलांना मी पैसे घालवण्यापेक्षा मी न चुकता आणि नव्या ठिकाणी देखील न घाबरता मार्ग कसा काढला याचा आनंद झाला होता. त्यावेळी मी पावती फाडून पढेगाव नावाच्या एका स्टेशनवर उतरलो. स्टेशनमध्ये जाऊन मी पुण्याकडे जाणाऱ्या पेसेंजरचे तिकीट काढून घरी आलो होतो. त्यावेळी ते सगळच नवीन असल्याने थोडी भीती वाटत होती. पण जमून गेले. बाकी त्यावेळेनंतर आज पर्यंत अशी चूक केली नाही.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.