ट्रॅफीक जॅम


ट्रॅफीक जॅम काही नवीन गोष्ट नाही. पण पावसाळ्यात आमच्या पुण्यात ‘ट्रॅफीक जॅम’चा सिझन असतो. काल असंच डांगे चौकापासून ते हिंजवडीपर्यंत ट्रॅफीक जॅम होता. आमच्या कंपनीची बस रांगत रांगत कंपनीपर्यंत जायला दीड तास लागला. डांगे चौकातून बस रांगायला सुरवात झाली. सुरवातीला एवढी ट्रॅफीक का  झाली आहे ते कळेना. हायवेच्या पुलाजवळ उभे असलेले पोलीस बघितल्यावर लक्षात आले की नेमके कारण काय. त्या ठिकाणी पोलीस नसले की वाहतूक सुरळीतपणे चालू असते. पण कोणी पोलीस उभा राहिला की वाहतुकीची कोंडी झालीच म्हणून समजा.

झालं! वीस पंचवीस मिनिटे बस पुलाजवळच उभी. त्यात आमच्या पुण्यात गाड्यांना रांगेत उभा राहणे हा गुन्हा असल्याने कोणी चारचाकीवाला आपली गाडी वाकडी तिकडी उभी करणार. दुचाकीवाल्यांबद्दल बोलाव तेवढ कमीच. एका चाकाची जरी मोकळी जागा मिळाली की ते सुसाट निघालेच म्हणून समजा. कुठूनही आणि कोणत्याही बाजूने दुचाकी दामटणार. चुकून कोणी मध्ये आला की त्याला हाकलण्यासाठी कर्णकर्कश होर्न. बर, एवढे करून देखील पुढच्या चौकात पुन्हा आहेच की रांगेत. त्यात चौकातील पीएमपीएल बस प्रवासी आमच्या बस चालकाला ‘कुठे जाणार?’ म्हणून सतावत होते. बर बसवर एवढे मोठे कंपनीचे नाव आणि लोगो आहे. तरीही विचारणारे कमी नव्हतेच.

कशीबशी चौकातून कंपनीची बस निघाली. पण पुढे पुन्हा ट्रॅफीक. त्यात तो सगळा चिखल आणि खड्ड्यांचा रस्ता. बर आयटी पार्क म्हणतात. आणि इतका मोठा कर तिथल्या कंपन्यांकडून मिळतो तरी साधे रस्ते देखील नाहीत. आणि जे आहेत ते इतके अरुंद की दोन मोठ्या गाड्या जाणेही कठीण. कशीबशी रांगत रांगत बस चाललेली होती. एक चौक पुढे यायला तीस मिनिटे लागली. झालं पुन्हा एकाने चारचाकीवाल्याने अशी काय गाडी आडवी घुसवली की दोन्ही बाजूची ट्रॅफीक जॅम. कस बस तिथून गाडी कधी तेव्हा एका ठिकाणी एक मालट्रक चिखलात फसलेला दिसला. आजकाल अस रोजचंच झालं आहे. आजही कंपनीत एक तास उशीर झाला. बाकी आमच्या पुण्यात ‘ट्रॅफीक जॅम’ ला काही सोल्युशन निघेल अस सध्याला तरी काहीच वाटत नाही. मुळात रस्तेच इतके अरुंद आहेत ना! आणि त्यात शिस्त पाळावीशी वाटत नाही. आणि वाटेल तरी कशी पोलीस एवढे ‘हरामखोर’ असतांना?

आजच चौकशीच्या नावाखाली हिंजवडी चौकात एक लहान टेम्पो पोलिसांनी अडवला. आणि त्यातले चिप्सचे पुडे काढून घेतले. असो, हा आजचाच ताजा लाईव्ह प्रसंग पहिला. एकूणच पुण्यातील वाहतूक पोलिसांचे कुरण आहे. त्यात रस्त्याच्या कडेला उभी असलेली  वडापाव, भेळीच्या गाड्या. त्यांमुळे सुद्धा वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. आमच्या बिजलीनगर पुलाजवळ एक वडापावाची गाडी उभी राहते. आणि तिच्याच बाजूला पोलीसही. पण तो कधीच त्या वडापाववाल्याला हटकत नाही. पण सध्याला तरी बाजारातील कोणत्याही ‘जॅम’ पेक्षा ‘ट्रॅफीक जॅम’ जास्त चालतो आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.