‘मी’ आणि ‘ढ’ हे समानार्थी शब्द आहेत. शैक्षणिक आयुष्यात ‘ढ’ हीच एकमेव पदवी मिळाली. समस्त आठल्ये घराण्यात मी सोडून, बाकी सगळीकडे हुशारीचा सुकाळ आहे. माझी बहीणाबाई, शालेय जीवनात चुकूनही ऐंशी टक्यांच्या खाली आली नाही. बी.इ ला स्कॉलरशीप मिळवली. एम.इ नंतर आता पीएचडी करती आहे. माझे बंधुराज त्यांच्या शालेय जीवनात नवद्दीच्या घरात. पहिला क्रमांक त्याच्यासाठी कायमचं ‘राखीव’. माझी लहान बहिण चित्रकलेत पारंगत तर आहेच. पण अभ्यासात देखील सत्तरी नेहमीची. माझा लहान भाऊ एकपाठी. कला त्याच्या अंगातच आहे. तोही सत्तरीच्या खाली कधी अजून आलेला नाही.

परवा, माझ्या कोकणातील लहान बहिणीने फोन केलेला. मला तीच्या एमएससीआयटीचा निकाल सांगत होती. ८४ टक्के मिळाले. निकाल लागण्याच्या एक दिवस आधीच मी काकूला तीच्या अभ्यासाबद्दल तक्रारी करीत होतो. असो, मी माझा बीसीएच्या परीक्षेत केलेला पराक्रम नाही सांगितलेला तिला नाहीतर, माझीच मस्करी केली असती तिने. तसे ते दु:ख पचवायला तीन दिवस लागले. खर सांगायचे झाले तर, अपेक्षेपेक्षा खुपंच जास्त मार्क्स मिळाले आहेत. दोन पेपर होते. एका विषयात शंभर पैकी भोपळा पडेल असा मी अंदाज केलेला. त्या कम्प्युटर फंडामेंटल मध्ये ३३, आणि इंग्लिश विषयात ४४. त्यातही दहा मार्कांची अपेक्षा केलेली. काय करू, अभ्यास म्हटलं की अंगावर पाल पडल्याप्रमाणे वाटते. परीक्षेच्या तासभर आधी देखील मी दोन विषय मिळून पुस्तकांची सहा पाने वाचलेली.

शाळेत असतांना कसाबसा साठी गाठायचो. कधी नापास झालो नव्हतो. यावेळी तोही पराक्रम केला. यार, अप्सरा ‘टॉपर’ आहे. हो! आता ही माहिती मी कशी मिळवली ते विचारू नका. ती दहावीच्या परीक्षेत तीच्या शाळेत ‘दुसरी’ आलेली आहे. आता कॉलेजमध्ये आणि पुढील माहिती मला नाही मिळवता आली. पण एकूणच ती देखील हुशार. पण ‘ढ’ पदवी मिळवणे सोपे असते. पण टिकवणे खुपंच अवघड असते. म्हण माहितीच असेल ‘जया अंगी ढ पण, तया यातना कठीण’. हे विष पचवणे ‘येरा गबाळ्याचे काम नोहे’. प्रवाहाविरुद्द पोहण्या सारखे असते ते. सोडा, काय बडबडतो आहे मी. ‘ढ’ची महिमा अगाध आहे. आयुष्यभर जरी प्रयत्न केला तरी, ‘ढ’च्या समुद्रात फार फार गुढघाभर पाण्यात जाता येईल. असो, पण आता ही पदवी’दान’ करून टाकावी अस मनापासून वाटत आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.