ताप


काल मी बर्याच दिवसांनी आजारी पडलो. त्याचे काय झाले, मी परवा आमच्या कंपनीत नवीन कॅन्टीनमध्ये दुपारी जेवण केले. जेवणातील भाजीने पोट खराब केले. मग काय, व्हायचे ते झाले. पोटात काहीच राहत नव्हते. आणि त्यामुळे अशक्तपणा आला. त्यामुळे आजोबांच्या पेक्षा जास्त वाईट अवस्था. हात पाय गळून गेलेले. रात्री खूप थंडी वाजायला लागली. सकाळी लवकर उठून देखील अंग दुखत असल्यामुळे पळायला गेलो नाही. पण व्यायाम केला. व्यायाम करतांना घाम आलाच नाही. खूप त्रास झाला व्यायाम करतांना. आणि डोके इतके दुखायला लागले की बास! काही विचारूच नका.

कंपनीत आल्यावर इतकी थंडी, जणू काही हिमालयात असल्याप्रमाणे. पण अप्सराला हाय केल्यावर कमी झाले होते. पण पुन्हा थोड्या वेळाने तेच. मग डेस्कवर झोपलो. नंतर ब्रेक ओउटरूम मध्ये. एक तर काही ताकदच उरली नव्हती काल. दुपारी जेवण केलेच नाही. त्यामुळे आणखीन अशक्तपणा. तीन च्या सुमारास झोपलो असतांना, अप्सरा बाजूने गेली. त्यावेळी मी झोपलेलो डेस्कवर पण ती तिच्या त्या ‘पसारा’ मैत्रिणीला काही तरी सांगत चाललेली. उठून बघतो तर ती तिच्या डेस्कवर. काल संध्याकाळी घरी आल्यावर झोपून राहिलो. थंडी वाजत होती. गावाचा एक मित्र आला आहे माझ्याकडे. तो आला आणि मी झोपलेलो. नंतर त्याच्याशी अप्सराबद्दल सांगत बसलो होतो. त्यावेळी थंडी पळून गेलेली. पण पुन्हा काका आला. नेहमीप्रमाणे ‘स्थळ’. मग काय, पुन्हा थंडी!

पण ती पत्रिका बघितली तर सगोत्र. वा! देव किती चांगला आहे. मग काय मी काकाला वडिलांना दाखवतो. पण मला नाही वाटत की, काही होवू शकेल. कारण दोघांची गोत्र एकच आहेत. मग काय झोप गेली. आणि मस्त वाटू लागले. पण थंडी वाजताच होती. काकाने पहिले तर मला ‘ताप’. यार, मी कधीच आजारी पडत नसतो. पण यावेळी कसे काय घडले, देव जाणे. अशक्तपणामुळे घडले असावे. पण काही नाही, आज सगळे पाहिल्याप्रमाणे. आज तर उलट मला खूप गरम होत आहे. ते सोडा, मी पण काय बोर करतो आहे. काल ती काय दिसत होती. असली छान दिसत होती ना ती! काय सांगू. ती त्या काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये खूप छान दिसते. तसं म्हटलं तर ती कोणत्याही ड्रेसमध्ये छानच दिसते. पण काल काय सांगू. किती गोड आहे ती! काल तिचे ते ‘हाय’. आणि त्याहून गोड तिचे ते ‘बाय’. कालचे ते ‘बाय’ काय सांगू.

मी नुसतेच तिच्या डेस्कवर टिचकी मारून तिला हात हलवून ‘बाय’ केले. म्हणजे बोललो काहीच नाही. नुसतीच ओठांची हालचाल. आणि मग ती सुद्धा तसच! पाहून हार्टअटॅक येतो की काय अस झाले होते. आजकाल रोजच! बापरे! आताच बाजूने गेली. किती गोड हसते यार ती! मला ना, आता काय बोलावं अस झाले आहे. किती छान आहे ती. ती आजही खूपच छान दिसते आहे. काय करू? ती माझी होईल तो दिवस कधी येईल अस झाल आहे. माझे हृदयाचे ठोके चुकायला सुरवात होते ती समोर आली की. आज वडिलांना त्या स्थळाबद्दल फोन केला. आणि त्यांनीही सगोत्र नाही चालणार अस काकाला सांगायला सांगितले आहे. मस्त आहे. सोडा ते. पण आज तिला ‘हाय’ करणार तर ती तिच्या प्रोजेक्ट मधील काकू. नंतर आता आली होती त्यावेळी ती फोनवर. नुसतीच स्माईल दिली.

कधी कधी वाटते तिला सांगून टाकावे. पण घाई होईल. आणि अजून माझी ‘हाय’च्या पुढे जायची हिम्मत होत नाही आहे. प्रपोज करायचे खूप लांबची गोष्ट आहे. त्यामुळे थोडा वेळ हवा मला. असो, बाकी आजचा दिवस छान आहे. फक्त जे काही खातो त्याला चव लागत नाही आहे. चिंता नसावी. बाकी आज संध्याकाळी जातांना तिच्याशी थोडे बोलण्याची इच्छा आहे. किती लवकर संपतात यार हे आठवडे. बघा ना आज शुक्रवार! म्हणजे वाईट दोन दिवस! कसे सहन होणार?


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.