ती जागा..


‘ती जागा’ मला रिकामी हवी आहे. कस बोलू? काय सांगू? मला खरंच तो विषय उफाळून आलेला आहे. अस का होत आहे? तो विषय मी ‘कोळसा’ करायचं ठरवलं. मी माझ्या कोणत्याही गोष्टीसाठी सारवासारव करीत नाही. मला तो विषय संपवून टाकायचा आहे. माझ्या भावी जोडीदाराचा त्यावर हक्क आहे. पण तो विषय आहे की अजूनही विस्तवाप्रमाणे धगधगतो आहे. हवेची झुळूक येते. आणि विस्तव पुन्हा पेटतो. ती आग भडकावतो. मला खरंच नाही सुचत आहे. डोक खरंच फुटायची वेळ आली आहे. माझ्यातील निर्णय क्षमता आणि निर्णय घेतल्यावर त्यावर अंमलात आणायची ताकत संपली आहे की काय याची शंका येत आहे.

रोज हेच. व्यायाम करतांना देखील हेच. रात्री स्वप्नातही हेच. दिवसभर मी ह्या विषयापासून दूर रहातो. मनात तो विषय फिरकतही नाही. मुळात मी स्वतःला इतक गुंतून घेतलं आहे की! मनाला समजावलं देखील. माझ्या रोजच्या जीवनात त्या विषयामुळे नैराश्य येऊ देत नाही आणि तो विषय देखील नाही. माझ्या मनात आता ‘प्रेम’ असावे. आता स्वप्न पडावी. पण जी व्यक्ती माझी होईल तिची. रोज इतकी कामे असतात. इतके कामाचे प्रश्न असतात. इतके विचार असतात, की दुसरा विचार करण्याचा प्रश्नच येत नाही. पण ही स्वप्नांची मैफिलीत अधिराज्य तो विषय. ती अजूनही स्वप्नात. बर कधी ती स्वप्नात चिडते. कधी माझ्याशी एकही शब्द बोलत नाही. मला हे खरंच समजत नाही. मी ‘सायको’ झालो की काय? खरंच स्वप्नातच अस का होते आहे? आणि अधून मधून ध्यानी मनी नसतांना ते भास होतात. अजूनही तेच सगळ होत आहे.

काय चालल! मी हार बिलकुल मानलेली नाही. पण अस का? माझी इच्छा व्हावी. मी पुनः एकदा वेडा व्हावं. एकदा मनात पुन्हा ते विचार यावेत. पण ती व्यक्ती जी माझी होईल. जी ‘ऑफिशियली’ माझी असेल. तिचा हक्क माझ्यावर आणि माझा हक्क तिच्यावर. पण ही स्वप्ने, हे अंतर्मनाला कोण समजावणार? त्या स्वप्नात रोज येणारी गेल्या दोन महिन्यांत तिचेच स्वप्न. मी चेष्टा नाही करीत. तो ‘विस्तव’ कधी ‘कोळसा’ होणार? आणि कधी राख होवून जीवनातून विरून जाणार? मी कुणालाही नाराज नाही करायचे ठरवतो. आणि मी स्वतःलाच का खुश ठेवू शकत नाही. कसली शोकांतिका आहे. हतबल वाटत आहे. मला मान्य आहे. आत्महत्या सारखे फंटुश विचार मनाला चाटून गेले आहेत. पण मी, नाही डगमगलो. कुणालाही त्रास द्यायचा नाही. जितकी ताकत आहे. तितकी ताकतीने जीवनात घडलेले ते दिवस! ते क्षण, त्या आठवणी घेऊन लढायचे. मनाला नैराश्य आणि उदास करणारे विचार दूर सारायचे.

मी माझ्या भावी जोडीदाराकडून हीच अपेक्षा करतो की, ती व्यक्ती माझ्यातच रममाण होवो. आणि नेहमी हा प्रश्न पडतो की, हीच अपेक्षा त्या व्यक्तीने माझ्याकडून केली तर? म्हणून.. ती जागा मला रिकामी हवी.. दोष माझ्यातच आहे. मी कमी पडतो आहे. पण ही स्वप्न किंवा भास तर माझ्या हातात नाहीत ना! परमेश्वराकडे हीच इच्छा आहे. त्याने ती जागा, ती प्रतिमा माझ्यातून नष्ट करावी.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.