त्या तिघी


एक अशी आहे की, तिला पाहिले की पक्षातील वरच्या पासून तो खालचा नाक घासायला तयार होतो. जिच्या सल्ल्यावर पंतप्रधान निर्णय देतो. जिची आज्ञा होताच राष्ट्रपती डोळे झाकून सह्या मारते. जिच्या मुलाला अख्खा देश ‘भावी पंतप्रधान’ म्हणून पाहते. जिच्या नुसत्या नजर फिरवल्यावर सीबीआय आणि भारतीय गुप्तचर संघटना क़्वात्रोचिला क्लीन चीट देते. जिच्या आदेशाने वृत्तपत्रे आयपीएलचा घोळ बाहेर काढतात. आणि इन्कम टॅक्सवाले संघ मालकांच्या घरावर धाडी टाकतात. जिच्या नवर्याचे नाव भोपाळ वायू दुर्घटनेतील मुख्य आरोपीला देशातून बाहेर सुखरूप नेण्यात येताच एका राज्याचा मुख्यमंत्री तो गुन्हा स्वत: केला असे सांगतो. जिच्या हातात सत्ता कायम असते. मग भाववाढ असो की देशात अतिरेकी हल्ले.

दुसरी जी टेनिसच्या मैदानावर उतरताच पाहणार्यांचे हृदयाचे ठोके चुकतात. पाहणारे खेळ पहाण्यापेक्षा तिलाच जास्ती पाहतात. जिच्या रॅंकिंग आणि जय पराजयापेक्षा तिच्या व्यक्तिगत प्रश्नातच संपूर्ण मिडिया कायम गुल असायची. ती काही बोलली तरी बातमी. आणि काही नाही बोलली तरी बातमी. तिने कपडे कोणते घालावे यावर मुल्ला मौलवी जाहीर चर्चा करतात. जिचा ‘जलवा’ पाहून शोएब घायाळ झाला. आणि तिच्या निर्णयाने सारा देश.

आणि तिसरी जी कधीच ग्लॅमर मिळाल नाही. किंवा सोंदर्यवतींचे लटके झटके करीत नव्हती. जिच्या विजयाच्या बातम्या मिडीयावाले आणि वृत्तपत्रे कुठल्या तरी कोपर्यात टाकायचे. ती देशात परतली तरी कधी जल्लोष किंवा मुलाखती होत नव्हत्या. पण ती शांतपणे आपले खेळण्याचेच काम करीत होती. ना तिने कधी पेप्सी किंवा ‘पॉवर ऑफ माय एनर्जी’च्या जाहिराती केल्या. आज तिने बॅडमिंटनमध्ये एका मागून एक असे तीन ग्रांपी सलग विजेता झाली.

तिघी देखील आपाआपल्या क्षेत्रातील सर्वात उच्च स्थळी आहेत. एकीने आपल्या सत्तेचा निरंकुश वापर चालवला आहे. देशाला आणि लोकांना आत्महत्येच्या वाटेवर नेऊन सोडले आहे. दुसरीने सौंदर्याने सर्वांना आधी वेडे केले. आणि नंतर नाराज. आणि तिसरी जी तिच्या क्षेत्रात अत्युच्य शिखर गाठले. परंतु आजही  ती तेवढीच निर्मल. त्या तिघीतील कोण श्रेष्ठ? असा प्रश्न विचारण्याची गरज उरली आहे काय?


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.