त्या


काल माझ्या जुन्या कंपनीतील मैत्रिणीचा वाढदिवस होता. मला खूप वाटल होत की तिला फोन करावा पण नाही केला. मेसेज देखील नाही पाठवला. त्यात कालचा दिवस म्हणजे आपल्या देशातील लोकांचा राष्ट्रीय सण. काल बऱ्याच जणांनी राष्ट्रीय सण मोठ्या आनंदात साजरा केला. आता माझा विरोध आहे असा नाही. पण राष्ट्रीय सण असा आहे की कधीही साजरा करता येईल. त्यासाठी उगाचच ठराविक दिवस का निवडायचा? मी तर रोज हा सण साजरा करायला तयार आहे. कदाचित माझ्या भविष्याला देखील तशीच इच्छा असेल. ही त्यावेळची गोष्ट. त्यावेळी मी नवीन संगणकाचा कोर्स सुरु केला होता. त्यावेळी मी एसटी महामंडळाच्या बसने जा ये करायचो. जिल्ह्याच्या गावी सकाळी जायचो आणि संध्याकाळी घरी. त्यावेळी तिथल वातावरण खूप वेगळ होत. मुलाने मुलीकडे नुसत बघितलं किंवा मुलीने मुलाकडे तरी सुद्धा ह्या दोघांच काही तरी आहे असा समज अख्खी बस करून घ्यायची. अस गावात देखील तसच. त्यामुळे मुलीकडे पाहण्याची कधी हिम्मत झालीच नाही.

एक आवडली होती. माझ काही नसताना माझ्या मित्राने तिला जाऊन मला ती आवडते अस सांगितले होते. मग ती माझ्याकडे रोज रागात पाहायची. रागातच काय तर नुसत सहज देखील माझ्याकडे कोणी मुलगी पाहत नसायची. ती अशी माझ्याकडे का पाहते म्हणून मी माझ्या मित्राशी बोललो तर तो म्हणाला ‘तूच मला त्या दिवशी नाव विचारात होता ना?, म्हणून मी तिला जाऊन तुला ती आवडते अस सांगितलं’. मग काय जाम डोक दुखायला लागल. काही नसताना ह्या गाढवाने उद्योग केला. अस कोणी उद्योग केला. तर त्यावेळी मुली सगळ्यांसमोर त्या मुलाच्या श्रीमुखात द्यायच्या नाही तर कधी चप्पलेचा प्रसाद. मग काय दुपारी लवकर घरी निघून जायला बस स्थानकात आलो. ती तिथ तीच्या मैत्रिणी सोबत होती. आणि माझ्याकडेच बघत होती. डोक आधीच जड झालेलं त्यात  ‘त्या’ सगळ्या बघून पळून जाव की काय अस वाटायला लागल. म्हटलं भर स्थानकात मला ठोकण्याचा यांचा मनसुबा आहे की काय. आणखीन एक गोष्ट. तिची जाण्याची आणि येण्याची वेळ एकाच  असायची. ती कॉलेजच्या तिसऱ्या वर्षाला होती. आणि दिसायला खूप छान होती. तिचा स्वभाव खूप मानी होता. ती रोज माझ्या शेजारी बसून बसने प्रवास करायची. म्हणजे मला ती बसच्या तीन सीटच्या दुसऱ्या बाकावर बसते हे माहित होत.

त्यादिवशी बस मध्ये ती आली आणि माझ्याशी पहिल्यांदा ‘बसायला जागा आहे का?’ अस विचारलं. मग मी पहिल्यांदी ‘नाही’ आणि ती जाताना दिसल्यावर पुन्हा ‘हो’ अस म्हणालो. मग ताबडतोप माझी पिशवी उचलली. आणि ती बसली. तिचा माझ्या शेजारी बसण्याचा हेतू मला ठोकणे आहे असाच वाटत होता. आणि ती देखील माझ्यावर भडकायच ह्याच हेतूने आली होती. बस चालू झाली. खिडकीतून मस्त गार वारा येत होता. पण मला जाम घाम येत होता. मी माझ्या मनाची कानाखाली खाऊन घेण्याची तयारी करत होतो. थोडा वेळ झाला. पुढच्या थांब्यावर एक आजी बस मध्ये आल्या आणि तिला माझ्या बाजूला सरकायला सांगितले. मग काय आणखीनच घाम फुटला. तीन सीटच्या बाकडावर आजी, मध्ये ती आणि तीच्या शेजारी मी असे आम्ही तिघे बसलेलो होतो. रोज बसायचो पण दोघेच असायचो आणि दोघांमध्ये आमच्या पिशव्या . आज एक तर वातावरण भयानक होत. कधीही माझ्या गालात प्रसाद मिळाले अस वाटत होत. त्यात तिचा स्पर्श. वा वा!! पण कानाखाली आवाज निघाल्यावर काय होईल याचा विचार मी त्यावेळी करत होतो. ती आणि मी एकमेकांकडे चोरून पहायचो आणि नजरा नजर झाली की मी खिडकीतून बाहेर आणि ती समोर बघायची. काही तरी करून तिला शांत करावं म्हणून मीच सुरवात केली. आणि ‘तू डबा आणत नाहीस का?’ अस विचारलं. आता हे त्यावेळी कस सुचल ते देव जाणे. पण देवाची कृपा काही तरी सुचल. तीच्या डोक्यातही मला कस माराव हाच विचार चालू होता. मी जेव्हा तिच्याशी बोलायला तिच्याकडे पहिले त्यावेळी बाई साहेबांना देखील घाम फुटलेला.

कदाचित तिलाही ही पहिली वेळ असावी कोणाला अस ठोकायची. तिलाही हा प्रश्न तेवढाच आश्चर्यकारक होता. तिला वाटल होत मी तिला प्रपोझ करील की काय. आणि मी असला फालतू प्रश्न विचारला. मग काय तीला हसू आले. ‘नाही’ एवढंच म्हणाली. पुढे तीच्याशी थोड्याफार गप्पा मारल्या. पण तिचा गोड आवाज, आणि तीच सौंदर्य. किती छान. माझ्याकडची असलेली एक डेअरी मिल्क दिली. याआधी आम्ही कधीच बोललो नव्हतो. तिने तिचा स्वर थोडा उंचावून ‘का?’ अस विचारलं. मी म्हटलं तू माझ्या मित्राची मैत्रीण आहे ना म्हणून. ती म्हणाली ‘नुसत बोलल म्हणजे मैत्री असते का?’. मग मी काय बोलणार? मग तिनेच स्वतः हून ‘जष्ट मान म्हणून घेते’. अस म्हणून अर्धी डेअरी मिल्क घेतली. मी घरी आल्यावर गंगा यमुनाचा महापूर आला. मग दुसऱ्या दिवशी सकाळी मला सर्दीमुळे डोक दुखत होत. बसमध्ये जेव्हा जाग आली तेव्हा ती निळ्या रंगाचा ड्रेस घालून माझा शेजारच्या बाकड्यावर बसलेली होती. पण पुन्हा बोलायाची हिम्मत कधी झालीच नाही. आणि तिनेही कधी केली नाही. ती आणि मी रोज एकमेकांना चोरून बघायचो. मला वाटत होत तिला म्हणून टाकावं.

माझ्या बहिणाबाईला विचारलं तर ‘करिअरकडे लक्ष दे’ असा सल्ला तिने दिला. मग तीन महिन्यांनी ती जी गेली ते परत कधी दिसलीच नाही. मग दोन वर्ष असाच विचार करत बसलो. रोज तीचा विचार यायचा. नंतर नोकरी निमित्ताने पुण्यात आलो. इथ दुसरी ‘ती’ भेटल्यावर थोडा विचार कमी झाला. पण ‘ती’ आता ‘त्या’ झाल्या आहेत. आता ‘ती‘ कोण असे विचारू नका. बाई साहेब गरोदर आहेत. ‘ती’च्या पतीराजांना भेटण्याचा योग आला. छान आहे तो. म्हणजे माझ्यापेक्षा देखील. ‘ती’ ची निवड चांगली आहे. काकूंना ‘ती’ला डबा द्यायचा होता. ‘ती’ घर कुठे आहे हे तीच्या पतीराजांकडून कळल. असो आता सगळ संपल आहे. घरी आल्यावर माझ्या गंगा यमुनाचा महापूर आला होता. पण वेळेत आटोक्यात आणला. थोडा वेळ लागला स्थिती पूर्ववत करायला. असो, खर तर पुण्यात घडलेला बॉम्ब स्फोट जास्त महत्वाचा आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.