दिनक्रम


दिनक्रम ही अशी गोष्ट आहे की जी जीवन बदलून टाकते. काहीवेळा आयुष्य देखील उलथवून टाकू शकते. दिनक्रम खरं तर पाळणे खूपच अवघड गोष्ट आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून माझ्याकडून पाळला जातो आहे. खरं तर काही दिवसांपूर्वीपर्यंत मी जी गोष्ट ठरवायचो ती ठरल्याप्रमाणे होणार नाही अशीच परिस्थिती होती. पण आता बऱ्यापैकी त्यावर मात केली आहे.

दिनक्रमाचे अनेक फायदे आणि तोटे असतात. सकाळी लवकर उठणे आणि रात्री लवकर झोपण्याची सवय अनेक शारीरिक आजारांपासून वाचवू तर शकते परंतु एक उत्साही व निरोगी आयुष्य देऊ शकते! सुरवातीला मी ह्या गोष्टींवर फारसा लक्ष देत नसायचो. नोकरी करतांना तर असल्या फंदात पडायचा कधी विचार देखील आला नव्हता. परंतु, गेल्या काही दिवसात त्याचा फार फरक पडला आहे. कामाचा जोम तर वाढला आहेच परंतु स्वभावात अनेक बदल आहे. सकाळी लवकर उठण्यामुळे सकाळचा वेळ अधिक मिळू लागला आहे. आधी आठ वाजेपर्यंत उठायचो. आता सहाचा ठोक्याला उठतो. सकाळच्या वातावरणामुळे व्यायामाला देखील जोश येतो.

व्यायाम होत असल्याने आता भूक वाढली आहे व वजन कमी होत आहे. पोटाचा नगारा आता ताशा होईल याची शाश्वती वाटते आहे. 🙂 मजेचा भाग सोडला तर वेळेत कामासाठी निघत येणे व वेळेत काम होणे हे आनंददायी गोष्ट झाली आहे. सकाळी लवकर उठण्याचा अजून एक फायदा असा की सकाळची आल्हाददायी ताजी हवा मिळते. शरीर सुधृढ होण्याने आपोआप मनही ताजेतवाने राहते. थोडक्यात दिवस चांगला जातो.

एक मात्र आहे नऊ वाजले की डोळे झाकू लागतात. दहापर्यंत समाधी अवस्था प्राप्त होते. त्यात अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते. जेवणाच्या, खाण्याच्या वेळा देखील लवकर असल्याने पोटाच्या तक्रारी कमी झाल्या आहेत. खरं तर खाण्याचा विषय मीठ असल्याने त्यावर आपण नंतर बोलूयात! एकूणच दिवसाचा चेहरा मोहरा बदलला आहे. माझ्या आई वडील गेले अनेक वर्षांपासून पहाटे चार वाजता उठण्याचा व रात्री दहा वाजता झोपण्याचा दिनक्रम अव्याहत चालू आहे. पाहुयात त्यांच्या पाऊलावर पाऊल पडते का ते!


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.