दिल्ली दरबार


महाराज दिल्ली च्या दिशेने निघाले. महाराज दिल्ली मधील बडी बेगमच्या दरबारी निघाले ही बातमी अख्ख्या बारामतीच्या गडावर वार्यासारखी पसरली. दिल्लीला सोबती म्हणून महाराजांनी ‘उ’पटेल आणि बाळ राजांना सोबत घेतलं. ‘स्व’राज्याचा कारभार करण्याच्या सूचना सरदारांना केल्या. महाराज दिल्ली दरबारी निघाले. महाराजांवरील प्रेमाची पावती म्हणून, कोणी धान्यापासून तयार केलेली वाईन, कोणी ‘सकाळ’ वर्तमानपत्र, तर कोणी क्रिकेटची बॅट. महाराजांनी दिल्लीला कूच केली. महाराजांचे विमान दिल्ली मध्ये उतरले. सकाळचा गारठ्यात महाराज दहा जनपथच्या दरबाराच्या बाहेर पोहचले. बाळ राजे आनंदून ‘महाराज, हा पथ दहा लोकांसाठीच आहे का?’.

महाराज प्रसन्न मुद्रेने ‘अस का बुवा विचारलस?’. बाळ राजांनी दहा जनपथच्या पाटीकडे बोट दाखवलं. महाराज आनंदून गेले आणि ‘उ’पटेलकडे पाहत बोलले ‘पहा, हुशार आहेत की नाही बाळ राजे!’. ‘व्हाय महाराज’ उपटेल बोलला. महाराज रागाने उपटेल कडे पहात ‘काय?’ म्हणाले. ‘उ’पटेल पुन्हा ‘व्हाय व्हाय महाराज’.. महाराजांचा पार चढला. बाळ राजांच्या लक्षात आले. बाळ राजे ‘उ’पटेलांकडे पहात ‘तुम्हाला व्हय अस म्हणायचे आहे का?’ ‘उ’पटेल पुन्हा ‘व्हाय’ म्हणाले. महाराज आणि बाळ राजे दोघेही खदखदून हसू लागले. महाराज दरबाराच्या प्रवेश द्वाराजवळ पोहचले. द्वारपालाने महाराजांकडे पहात ‘माका, तुमच्या चपला हवासी’. महाराजांनी त्या द्वारापालाकडे पाहीले आणि एकदम आश्चर्याने ‘नारायण तू इथे काय करतो आहेस?’. द्वारपाल गडबडून ‘मका तुम्ही ओळखलत व्हय महाराज? मला इथे सर्वांच्या चपला गोळा करण्याचे काम मॅडमने दिले, ते करतो आहे’. ‘पण तुम्ही चपला कशाला गोळा करता आहे?’ बाळ राजांनी कुतूहलाने विचारले. द्वारपाल ‘नारायण, नारायण! ते मध्यंतरी झाले ना चपला फेकून मारायचे प्रकार. म्हणून!’.

तेवढ्यात, तोफेचा आवाज झाला. महाराजांनी चपला काढत बाळ राजेंना म्हणाले ‘बाळ, चल पटकन आत बडी बेगम यायची वेळ झाली. तू ती बोफोर्स तोफेचा आवाज ऐकलास ना!’. बाळ राजे, महाराज दरबारात आले. ते भव्य दिव्य आणि विशाल दरबार पाहून तिघेही थक्क झाले. हाय कमांडच्या कमांडोंनी महाराजांना त्यांची जागा दाखवून समोरच्या उंच असलेल्या सिंहासनच्या बाजूला असलेल्या रांगेत जावून उभे राहिले. तेवढ्यात जोरात एका द्वारपालाने ‘बा अदब बा मुलाईजा, होशियार! मल्लिका ए हिन्दुस्ता! बडी बेगम तशरिफ ला रही है’. सर्वांनी गुढग्यात वाकून आणि छातीवर हात ठेवत माना खाली घातल्या. बडी बेगम आसनस्थ झाली. बाजूला त्यांचा सिपे सालार जनाब मनमोहन खान येऊन उभे राहिले. बडी बेगमने दरबारात नजर फिरवली आणि सर्वांना हात दाखवत कामकाज सुरु करण्याची खुण केली. बडी बेगमच्या आज्ञेने मनमोहन खानने बोलायला सुरवात केली, ‘माझ्या उजव्या बाजूला असलेली सर्व आम आदमी आणि माझ्या डाव्या बाजूला असलेली सर्व सरदारांनो, ज्याचे नाव पुकारले जाईल. त्याने समोर येऊन बडी बेगमच्या प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. आज कशाला बोलावलं असेल ते तुमच्या लक्षात आलेच असेल. देशापेक्षाही मोठे प्रश्न आपल्या पुढे पडलेले आहेत’. अस ऐकताच सर्वजण सिपे सालारच्या पुढच्या मोकळ्या बाजूकडे पाहायला लागले. आणि कुजबुज सुरु झाली. सिपे सालाराच्या बाजूंला उभे असलेले सेनापती प्रणव मखरजी सर्वांना दरडावत तोंडावर एक बोट ठेवत ‘शुsss’ असे ओरडले.

सिपे सालारच्या भाषणात या गोष्टीने व्यत्यय आल्याने ते थांबले. आणि सेनापतीच्या हळूच कानात ‘घाईची असेल तर लगेच जावून या. मलाही जाम जोराची लागली आहे’ असे म्हणाले. हे ऐकताच सगळ्या दरबारात एकच हशा पिकला. बडी बेगम हे पाहून चिडली. आणि करड्या आवाजात ‘खरगोश!’ म्हणाली. हे ऐकताच संपूर्ण दरबार अजूनच जोर जोरात हसू लागला. बडी बेगम आता मात्र रागाने लाल झाली. सिंहासनावर उभी राहून रागात ‘आय से खरगोश’. ह्याने तर दरबार पुन्हा हसण्याने दणाणू लागला. सिपे सालार बडी बेगमच्या कानात काहीतरी कुजबुजला. आणि बडी बेगम सर्वांकडे पहात ‘खामोश’ म्हणाली. सर्व दरबार शांत झाला. हाय कमांडचे एक कमांडो सर्वांसमोर येऊन ‘ए राजाss’ म्हणून आरोळी ठोकली.

रांगेत सर्वात पुढे असलेला राजा बेगम समोर येऊन उभा राहिला. अचानक बॅकग्राउंड सुरु झाला. राजाने वाकून नाचायला सुरवात केली. ‘राजा को रानीसे प्यार हो गया..’ गाणे सुरु झाले. बाळ राजे हे पाहून गडबडले. महाराजांकडे पहात ‘महाराज, हा असा का वेड्यासारखा नाचतो आहे?’. महाराज हसत ‘याला मुजरा म्हणतात’. बाळ राजे पुढे काही बोलणार, तेवढ्यात बडी बेगम राजाला हात दाखवत थांबण्याची सूचना केली. आणि रागात ‘राजा को रानीसे नाही मनीसे प्यार हो गया! बरोबर ना ए राज्जा?’. राजा मान खाली घालून उभा राहिला. ‘तुमच्या या असल्या धंद्यांमुळे आमचे नाक कापले गेले, याची काही जाणीव आहे की नाही?’ बेगम म्हणाली. राजाने नुसतीच मान डोलावली. बेमान नाखूष चेहऱ्याने ‘सांगा आता यावर काय शिक्षा द्यायची?’. राजा गडबडून गेला. बेगम समोर दयेची भिक मागू लागला. बेगम हाय कमांडच्या कमांडोकडे पहात बोलली. हाय कमांड मधील एक बडी बेगम समोर येऊन बोलला ‘माफी असावी बेगम साहिबा, पण आपण काहीच करू शकत नाही. कारण आपण त्याला काही केल तर तो आपल सगळंच संपवून टाकेल. त्यामुळे ती म्हण आहे न, झाले गेल गंगेला मिळालं!’. बेगम चिंताक्रात झाली. थोडा विचार केल्यावर म्हणाली ‘यावर उपाय काय? लोकांचे लक्ष दुसरीकडे कसे वेधणार?’. अस म्हणताच सिपे सालारने वर बोट केल. बडी बेगम त्याच्याकडे पाहत बोल म्हणाली. सिपे सालार पगडी सांभाळत ‘आपण पुन्हा एकदा राष्ट्रकुल स्पर्धा आयोजित करूयात’ म्हणाला. बडी बेगम डोक्याला हात मारत ‘अरे, या गाढवाला कोणी तरी इथून घेऊन जा रे, काय तरी पांचट मारतो आहे’. कमांडोंनी त्याची उचलबांगडी करून दरबाराबाहेर नेले.

‘पाहूयात काय करता येईल ये, नेक्स्ट’ बेगम म्हणाली. दुसरा कमांडो ‘ए राजू चल आजा ये बाजू’ म्हणत बेगम समोर आला आणि मोठ्याने ‘बलमाडी, हाजीर हो’. बलमाडी समोर येताच जोरजोरात रडत ‘क्या हुआ तेरा वादा, वो कसम वो इरादा’ म्हणू लागला. सर्वांचेच डोळे पाणावले. बेगम त्याला थांबवत ‘बस कर जालीम, किती रडवशील?’ म्हणाल्या. बलमाडी हुंदके देत ‘राजा ने केल तर त्याला काय नाय. मी थोडस केल तर सगळेच खायला उठले. परवा रात्री माझ्या घराची भिंत अचानक माझ्यावर कोसळली. हा पहा किती मोठा टेंगुळ आला. पण मी काही बोललो?’ बेगम पुन्हा त्याला थांबवत ‘ठीक आहे, ठीक आहे. याच्यावर फक्त सीबीआय चौकशी. फार काय नाय. नेक्स्ट’. मुजरा करीत बलमाडी निघून गेला.

कमांडोने ‘आदर्शराव चव्हाण’ अशी आरोळी ठोकली. आदर्शराव ढेरी सांभाळत ‘तेरे बिना जिया जाये ना, तेरे बिना..’. बेगम गोंधळून ‘काय?’ म्हणाली. आदर्शराव हसून ‘नाही तुमच्यावर नाही, माझ्या गेलेल्या खुर्चीवर ते होत’. बेगम डोक्याला हात लावत ‘आता याच काय करायचे?’. पुन्हा हाय कमांड मधील एक कमांडो समोर येत ‘केंद्रीय मंत्रिपद द्या’. सगळे हे एकूण अवाक झाले. कमांडो ‘हो, हे आपल्या पक्षाची पहिली पायरी यशस्वी रित्या पार केली आहे. परंपरेत एक नवा आदर्श निर्माण केला आहे. आपल्या लातूर पॅटर्नप्रमाणे यांनाही तो न्याय मिळायला हवा’. बेगम काहीच नाही बोलली. टू बी कंटिन्यू..


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.